रुपयाच्या घसरणीला जबाबदार कोण?

भारतीय रुपयाची (Indian Rupee) घसरण सुरूच आहे. अमेरिकन डॉलर (American Dollar) ८० रुपयांवर जाऊन पोहोचला आहे. रुपयाच्या कमी होत असलेल्या किमतीचा महागाई, आयात-निर्यात यावर परिणाम होतोय. परंतु रुपयाची अशी घसरण केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन (Nirmala Sitaraman) यांना फारशी गंभीर वाटत नाही.
Depreciation of Rupee
Depreciation of RupeeAgrowon

सध्याच्या धकाधकीच्या जीवनात आपल्या अवती भवती अशा अनेक घटना घडत असतात, ज्या आपल्या जगण्याशी निगडित असूनही कळत न कळत त्या दुर्लक्षिल्या जातात. त्यांपैकी अशीच एक म्हणजे रुपयाचे अमेरिकन डॉलरमधील गडगडणे. (Depreciation of Rupee) बघता बघता डॉलरने (American Dollar) ८० रुपयांची सीमा पार केली असून, नव्वदीकडे वाटचाल सुरू केली आहे. आपल्याकडील विद्यमान महागाईला कच्च्या तेलाचे वाढते दर जबाबदार असल्याचा सर्वसाधारण समज आहे. परंतु या दराइतकाच रुपयाच्या डॉलरमधील घसरणीचा देखील वाटा असल्याचे विसरून चालणार नाही. ज्यासाठी सध्या ८० पेक्षा अधिक रुपये मोजावे लागतात तोच डॉलर देशाला स्वातंत्र्य मिळालेल्या वर्षात ३.३० रुपयाला मिळत होता, हेही लक्षात घेणे गरजेचे आहे.

Depreciation of Rupee
Crop Insurance: विम्यासाठी ई-पीक पाहणी नोंदीची अट रद्द

फार पूर्वी नव्हे अगदी अलीकडच्या काळात जानेवारीत एका डॉलरसाठी ७५ रुपये पुरेसे ठरत होते. जून ते जुलै या दोन महिन्यांच्या काळात रुपयाचे डॉलरमधील मूल्य ७ टक्क्यांनी घटलेय. रुपयाची अशी घसरण होत असली, तरी केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांना ही बाब तेवढी गंभीर वाटत नाही. चीन, थायलंड, जपान, दक्षिण कोरिया आणि अन्य आशियायी देशांच्या तुलनेत रुपयांची स्थिती चांगली असल्याचा त्यांचा दावा आहे. या दाव्यात तथ्य नाही, असे म्हणता येत नाही. तरीही हाँगकाँग (०.६ टक्के), कॅनेडियन (२ टक्के), ऑस्ट्रेलियन डॉलर (५.१ टक्के), स्वीस फ्रँक (२ टक्के) पेक्षा निश्‍चितच रुपयाच्या घसरणीचा दर अधिक आहे हेही लक्षात घेणे आवश्यक आहे.

Depreciation of Rupee
Crop Insurance : साडेअकरा लाख हेक्टर क्षेत्र पीकविमा संरक्षित

विनिमय बाजारात हस्तक्षेप करून रिझर्व्ह बँकेनेही घसरण रोखण्याचाही प्रयत्न केला, परंतु काही केल्या ती थांबायचे नाव घेत नाही. रुपयाच्या या घसरणीला सरकारी धोरणाइतकीच आंतरराष्ट्रीय आर्थिक परिस्थिती जबाबदार आहे. सर्वसामान्य वस्तूंप्रमाणे विनिमय दर (एका देशाच्या चलनाची दुसऱ्‍या देशाच्या चलनातील किंमत) मागणी व पुरवठ्यावरून ठरतो. आयातीवरून परकीय चलनाची मागणी तर निर्यातीवरून पुरवठा ठरतो. भारत एक विकासोन्मुख राष्ट्र असल्याने आयात अधिक आणि निर्यात कमी अशीच स्थिती आजवर राहिली आहे. डॉलरला आंतरराष्ट्रीय चलन म्हणून मान्यता प्राप्त झालेली असल्याने बहुतांश व्यवहार डॉलरमध्ये पार पाडले जातात.

भारताची डॉलरसाठी मागणी अधिक आणि पुरवठा त्या मानाने कमी अशी स्थिती असल्यानेच रुपयाची घसरण होतेय. आधी कोरोना नंतर रशिया-युक्रेनमधील युद्धामुळे विस्कळीत झालेली पुरवठा साखळी अजूनही पूर्वपदावर आलेली नाही. त्यामुळे सर्वच आयात वस्तूंच्या किमती वाढल्या आहेत. त्यातही कच्चे तेल, खाद्यतेले, खते, लोखंड, कोळसा, सोने यांच्या किमतीतील वाढ लक्षणीय आहे. कोरोनानंतर अर्थव्यवस्था पूर्वपदावर येऊ लागल्याने आयातीच्या मागणीतही वाढ झालीय.

भारतासारख्या गरीब देशाकडून वर्षाला ८०० ते ९०० टन सोन्याची आयात केली जाते हाही अभ्यासाचा विषय होऊ शकतो. पारंपरिक बरोबर अपारंपरिक वस्तू, सेवांच्या निर्यात वाढीसाठी पुरेसे प्रयत्न करूनही तीत म्हणावी तशी वाढ होताना दिसत नाही. अगदी अलीकडील उदाहरण द्यायचे झाले तर एप्रिलमध्ये निर्यातीत १६.६ टक्क्यांनी वाढ झालेली असताना आयातीत मात्र ५१ टक्केने वाढ झाली होती. परिणामी, व्यापारतोलात २०.१ अब्ज डॉलरची तूट राहून गेली. विद्यमान वित्तीय वर्षात चालू खात्यावरील तूट जीडीपीच्या १.२ टक्क्यावर जाण्याची शक्यता वर्तवली जातेय.

गेली अनेक वर्षे स्वस्ताईचा अनुभव घेणाऱ्‍या अमेरिका, ब्रिटन आदी प्रगत राष्ट्रांना आता महागाईचे चटके बसू लागले आहेत. अमेरिकेतील महागाईचा दर तर मागील चार दशकातील उच्चांकी (९.१ टक्के) पातळीला पोहोचलाय. फेडरल रिझर्व्हच्या सहनशील दरापेक्षा (२ टक्के) प्रत्यक्ष दर बराच वर गेल्याने तिला आवर घालण्याच्या उद्देशाने फेडरल रिझर्व्हने व्याजदरात वाढ केलीय. हाच कित्ता सर्व प्रगत देशांच्या मध्यवर्ती बँकांनी गिरवलाय. बँका, वित्तीय संस्थांनाही आपल्या व्याज दरात वाढ करणे भाग पडलंय. वाऱ्‍याच्या दिशेप्रमाणे तोंड फिरवणाऱ्‍या परकीय गुंतवणुकदारांना वाऱ्‍याची दिशा बदलल्याचे लक्षात आल्याने त्यांनी समभाग, रोखे आदींतील भारतातील आपली गुंतवणूक काढून घेण्याचा सपाटाच लावलाय. मागील नऊ महिन्यांत त्यांनी ४६ अब्ज डॉलर एवढी गुंतवणूक काढून आपल्या मायदेशी नेलीय. गुंतवणूक येते वेळी जशी डॉलरमध्ये येते तसेच ती जातेवेळी डॉलरमध्ये जाते. डॉलरच्या परतीच्या प्रवाहामुळे डॉलरसाठी मागणी वाढल्याने तो वधारलाय. परंतु रुपया मात्र घसरला आहे.

एकेकाळी (२०२१) ६४२ अब्ज डॉलरवर गेलेला परकीय चलनाचा साठा या प्रवाहामुळे घटून जूनअखेरीस ५९० अब्ज डॉलरवर आलाय. रुपयाच्या या घसरणीचा फटका सर्वसामान्याला बसतोय. कच्चे तेल, खाद्यतेले, कोळसा, खते, यंत्रे, रसायने अशा सर्वच आयात वस्तूंसाठी अधिक पैसे मोजावे लागत असल्याने आधीच असलेल्या महागाईचा आगडोंब आणखी उसळलाय. निर्मला सीतारामन यांना मात्र आयात महाग झाल्याने आयात घटून तूट नाहीशी होईल, असे वाटते. भारताची आयातीसाठीची मागणी ताठर असल्याने तशी शक्यता कमी आहे. उलटपक्षी महाग आयातीमुळे तूट वाढण्याचाच धोका अधिक आहे. निर्यात स्वस्त झाल्याने निर्यात वाढण्याची शक्यता वर्तवली जाते. परंतु या वाढीला भारतीय वस्तूंना आंतरराष्ट्रीय बाजारपेठेत असलेली स्पर्धा व अन्य देशांच्या मागणीची मर्यादा पडते. ती लवचीक असेल तर निर्यात वाढते आणि ताठर असेल तर वाढत नाही.

रुपयाची होत असलेली घसरण रोखण्याचा केंद्र सरकार आणि रिझर्व्ह बँक दोघांकडूनही प्रयत्न केला जातोय. सोन्यावरील आयात शुल्कात ५ टक्क्यांनी वाढ करून आयात कमी आणि पेट्रोलच्या निर्यात शुल्कात कपात करून निर्यात वाढवण्यासाठी सरकार प्रयत्नशील आहे. रिझर्व्ह बँकेने देशाकडील परकीय चलनाचा

प्रवाह वाढावा म्हणून अनेक उपाय योजले आहेत. तसेच रशिया, इराण आणि इतर देशांशी रुपयांतील व्यापारावर भर देऊन डॉलरवरील अवलंबित्व कमी करण्याचा बँकेकडून प्रयत्न केला जातोय. हे सगळे करत असताना देशाच्या विकासावर प्रतिकूल परिणाम होणार नाही, याची काळजी घेणे आवश्यक आहे.

(लेखक अर्थशास्त्राचे अभ्यासक आहेत.)

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com