
Turmeric Production : कीड-रोगांचा कमी प्रादुर्भाव, लागवड आणि काढणी करण्यासाठी मिळणारा पुरेसा वेळ, जंगली प्राण्यांचा त्रास नाही, नैसर्गिक आपत्तीतही नुकसान कमी, बऱ्यापैकी उत्पादन दरही चांगला म्हणून राज्यातच नव्हे, तर देशात हळदीचे क्षेत्र वाढत गेले. असे असले तरी मागील हंगामात मराठवाडा, विदर्भात हळदीचे क्षेत्र घटत असल्याचे निदर्शनास आले.
सततची अतिवृष्टी, कंदमाशी कीड, तसेच कंदसडचा वाढता प्रादुर्भाव, हळद लागवड-काढणी-प्रक्रिया यासाठी लागणारे मजूर, पीक उत्पादनाचा वाढता खर्च, घटते उत्पादन आणि मिळणारा कमी दर यामुळे राज्यात प्रामुख्याने विदर्भ-मराठवाड्यात हळद क्षेत्र घटत आहे.
या वर्षी तर ऐन काढणी करताना झालेल्या अवकाळी पावसाने अन् गारपिटीने हळदीचे मोठे नुकसान केले. त्यातच आता हळदीचे दर सातत्याने कमी होत आहेत. त्यामुळे या पिकाचा उत्पादन खर्च देखील निघत नसल्याची चर्चा शेतकऱ्यांमध्ये आहे.
जुनी शिल्लक हळद, त्यात नव्या उत्पादनाची भर पडत आहे. त्यामुळे मिळेल त्या दरात हळद विक्रीवाचून उत्पादकांकडे पर्याय नाही.
हंगामाच्या सुरुवातीला हळदीला सरासरी प्रतिक्विंटल ७५०० रुपये दर मिळाला. हा दरही कमीच होता, आता तर या दरातही घसरण चालू आहे. हळदीच्या दरावर मंदीचे सावट असल्याने विक्रीविना शिल्लक हळदीच्या समस्येने उत्पादकांना चांगलेच ग्रासले आहे.
भारत आणि हळद हे नाते अतूट आहे. हळदीच्या पेटंटची लढाई जेव्हा आपण जिंकली, तेव्हा हे नाते अधिक ठळकपणे जगापुढे आले. आजही हळदीच्या जागतिक उत्पादनात आणि बाजारात भारताचा दबदबा कायम आहे. असे असले तरी हळद उत्पादनाचे प्रगत तंत्र तसेच काढणीपश्चात व्यवस्थापनात आपण खूपच मागे आहोत.
राज्यात सेलम, वायगाव अशा काही जाती सोडल्या, तर फारसे पर्याय शेतकऱ्यांकडे नाहीत. हळदीच्या बियाण्यात भेसळीचे प्रमाण खूप वाढले आहे. देशात ५३ हून अधिक हळदीच्या जातींची लागवड होते.
त्यातील काही जाती कमी कालावधीच्या, अधिक उत्पादनक्षम आणि कुरकुमीनचे प्रमाणही अधिक असलेल्या आहेत. अशा जातींचे दर्जेदार बियाणे शेतकऱ्यांना उपलब्ध झाले पाहिजेत. गादीवाफ्यावर हळद लागवडीच्या तंत्राचा प्रसार-प्रचार सर्वत्र झाला पाहिजेत.
आपल्या देशात, राज्यात योग्य पीक नियोजनातून हळदीच्या उत्पादनात एकरी १० क्विंटलपर्यंत वाढ होऊ शकते. हळद लागवड ते काढणी आणि प्रक्रिया या कामांत यांत्रिकीकरणाचा वापर वाढला पाहिजेत. सध्या राज्यात कुकरमध्ये वाफेवर हळद शिजविली जाते.
तैवान, डेन्मार्क या देशांनी कच्च्या हळदीवरच प्रक्रियेचे तंत्र विकसित केले आहे. अशा प्रक्रियेत हळदीतील कुरकुमीनचे प्रमाणही अधिक राहत असून, असे तंत्र राज्यातील हळद उत्पादकांपर्यंत पोहोचले पाहिजेत. आपला बहुतांश व्यापार हा कच्च्या हळकुंडाचा आहे.
राज्यात सांगली, साताऱ्यासह मराठवाडा, विदर्भातही काही बाजारपेठा विकसित झाल्या असल्या, तरी हळकुंडांना रास्त दर देण्यात त्या मागे आहेत. कच्च्या स्वरूपात हळदीचा होणारा व्यापार पक्क्या मालाच्या स्वरूपात झाला, तर त्यातून मिळणारे उत्पन्न हे नेहमीपेक्षा अधिक असेल.
शेतकऱ्यांच्या पुढाकारातून हळदीच्या हळकुंडापासून ते क्रीम्स, खाद्यान्ने व औषधांपर्यंतच्या मूल्यसाखळ्या तयार होणे गरजेच्या आहेत. असे झाले तर हळद उत्पादक शेतकरी जगाच्या बाजारात आपले पाऊल अधिक भक्कमपणे ठेवू शकतील. हळद निर्यातीतही आपला वाटा मोठा आहे.
भारतातून प्रामुख्याने कच्च्या स्वरूपातील हळद (हळकुंड) निर्यात होते. हळदीचे मूल्यवर्धन करून उत्पादनांची निर्यात करणे ही आपली पुढची दिशा असायला हवी. भारतीय हळदीचा ब्रॅण्ड जगात लोकप्रिय असून, त्यास चांगली मागणी पण आहे.
जगाच्या बाजारपेठेत आपली हळद आणि मूल्यवर्धित उत्पादने व्यवस्थित पोहोचवली तर देशांतर्गत बाजारातही दर चांगले मिळतील. असे झाल्यास रुसलेली हळद हसेल आणि उत्पादकांच्या चेहऱ्यावर देखील हास्य पसरेल.
Read the latest agriculture news in Marathi and watch Agriculture videos on Agrowon. Get the latest updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Agriculture Jugad, and Farmer Success Stories.
ताज्या घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.