Kanda Chal Anudan : ‘रोहयो’तून कांदाचाळीसाठी मिळणार १ लाख ६० हजार रुपये

Agriculture Scheme : रब्बी हंगामातील कांद्याची काढणीपश्‍चात शास्त्रीय पद्धतीने साठवणूक व्यवस्था नसल्याने अनेक शेतकरी कांद्याची लगेच विक्री करतात.
Kanada Chal
Kanada ChalAgrowon

Nashik News : रब्बी हंगामातील कांद्याची काढणीपश्‍चात शास्त्रीय पद्धतीने साठवणूक व्यवस्था नसल्याने अनेक शेतकरी कांद्याची लगेच विक्री करतात. परिणामी आवक दाटून दर पडतात. त्यामुळे मोठा आर्थिक फटका बसतो. त्यामुळे कांद्याच्या बाजारभावातील चढ-उतारपासून सुरक्षा, स्थानिक बाजारपेठेत योग्य दरात पुरवठा व निर्यातीची मागणी भागविण्यासह कांदा साठवणूक क्षमता वाढविण्याची गरज होती.

ही बाब विचारात घेऊन राज्य सरकारने महात्मा गांधी राष्ट्रीय ग्रामीण रोजगार हमी योजनेअंतर्गत कांदाचाळ उभारण्यास मान्यता दिली आहे. याबाबत रोजगार हमी योजना विभागाचे अपर मुख्य सचिव नंदकुमार यांच्या स्वाक्षरीने शासननिर्णय काढण्यात आला आहे. त्यानुसार १ लाख ६० हजार रुपये मिळणार आहेत.

Kanada Chal
Onion Market Rate : अकरा गोण्या कांदा विकून उरले ११ रुपये

रोजगार हमी योजनेअंतर्गत वैयक्तिक लाभार्थ्याच्या सलग शेतावर, शेताच्या बांधावर व पडीक जमिनीवर अमृत महोत्सवी फळझाड, वृक्ष लागवड व फुलपीक लागवड कार्यक्रमाची अंमलबजावणी राज्यात करण्यात येत आहे. या योजनेतील अकुशल मजुरीच्या दरात सुधारणा केली असून १ एप्रिलपासून राज्यात मजुरीचा दर २७३ रुपये प्रति मनुष्यदिन याप्रमाणे निश्चित केला आहे.

तर कृषी विभागाच्या १२ एप्रिल रोजी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या झालेल्या बैठकीमध्ये कांदाचाळ उभारणी ‘मनरेगा’अंतर्गत समाविष्ट करण्याचा प्रस्ताव सादर करण्याचे निर्देश देण्यात आले होते. त्यानुसार कांदाचाळीचा समावेश करण्यात आला आहे.

Kanada Chal
Onion Production : कांदा उत्पादकांचे दुःख जाणून शासनाने मदत करावी

कांदा हे नाशवंत पीक असल्याने काढणीपश्‍चात साठवणूक शास्त्रीय पद्धतीने न झाल्यास ४५ ते ६० टक्क्यांपर्यंत नुकसान होते. यामध्ये प्रामुख्याने नुकसान वजनातील घट, कांद्याची सड व कोंब येणे आदी कारणांमुळे होते. त्यामुळे साठवणूक क्षमता वाढविण्यासाठी कांदाचाळ उभारणीबाबत शासन निर्णय घेण्यात आला आहे.

सद्यःस्थितीत मनरेगाचे अकुशल मजुरीचे दर २७३ रुपयांनुसार कांदाचाळ प्रकल्प उभारणीकरिता एकूण लागणारे मनुष्यदिन ३५२.४५ त्यानुसार ९६ हजार २२० रुपये इतकी मजुरी तसेच साहित्यासाठी लागणारा खर्च मजुरीवर होणाऱ्या खर्चाच्या ४० टक्क्यांच्या मर्यादेत ६४ हजार १४७ रुपये इतका खर्च आहे.

असा ‘मनरेगा’अंतर्गत मजुरी व साहित्याचा एकूण खर्च १ लाख ६० हजार ३६७ रुपये दिला जाणार आहे. तर पुढील आर्थिक वर्षात मजुरीचा दर वाढल्यास याच्यातसुद्धा वाढ होणार आहे. तर उर्वरित २ लाख ९८ हजार ३६३ रुपयांचा निधी लोकवाट्याच्या माध्यमातून प्रस्तावित आहे.

Kanada Chal
Onion Market : केंद्र, राज्य सरकारकडून कांदा उत्पादकांची थट्टा

कांदाचाळ खर्चाचे स्वरूप (रुपयांत)

अकुशल (६० टक्के)...९६,२२०

कुशल (४० टक्के)...६४,१४७

मनरेगा अंतर्गत एकूण...१,६०,३६७

अतिरिक्त कुशल खर्चासाठी लोकवाटा...२,९८,३६३

कांदाचाळीसाठी एकूण खर्च...४,५८,७३०

यांना मिळणार लाभ :

कांदा चाळीची रुंदी ३.९० मी, लांबी १२.०० मी व

उंची २.९५ मी. जमिनीपासून ते टाय लेवलपर्यंत असेल.

कांदाचाळ वैयक्तिक तसेच सामुदायीकरीत्या शेतकरी याचा लाभ घेऊ शकतात. तसेच गटशेती, महिला बचत गट यांना सामुदायिक लाभ घेता येऊ शकेल. कांदाचाळ उभारण्यासाठी पंचायत, कृषी विभाग, सार्वजनिक बांधकाम विभाग, जिल्हा परिषद बांधकाम विभाग, पणन विभाग हे सर्व विभाग कार्यान्वयीन यंत्रणा म्हणून काम पाहणार आहेत.

राज्यात कांद्याचे उत्पादन मोठ्या प्रमाणावर होते. ही बाब विचारत घेऊन साठवणूक व्यवस्था सक्षम करण्यासाठी हा निर्णय घेण्यात आला आहे. त्याचा राज्यातील कांदा उत्पादकांना निश्चित फायदा होणार आहे. त्याची कार्यवाही लवकरच सुरू होणार आहे.
- संदीपान भुमरे, मंत्री, रोजगार हमी योजना व फलोत्पादन

Read the latest agriculture news in Marathi and watch Agriculture videos on Agrowon. Get the latest updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Agriculture Jugad, and Farmer Success Stories.

ताज्या घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
www.agrowon.com