
बाळासाहेब पाटील ः ॲग्रोवन वृत्तसेवा
Maharashtra Assembly Budget Session 2023 मुंबई : अर्थसंकल्पीय अधिवेशनाच्या पहिल्या दिवशी अर्थमंत्री तथा उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (Devendra Fadanavis) यांनी सहा हजार, ३८३ कोटी ९७ लाख, २५ हजार रुपयांच्या पुरवणी मागण्या विधानसभेत मांडल्या.
यामध्ये महात्मा जोतिराव फुले कर्जमुक्ती योजनेंतर्गत (Mahatma Phule Loan Waive Scheme) प्रोत्साहन योजनेकरिता (Farmer Incentive Scheme) एक हजार कोटी, ग्रामपंचायतींच्या थकीत वीजबिलापोटी महावितरणला देण्यासाठी दोन हजार कोटी रुपये देण्यात येणार आहेत.
विधानसभेत मांडण्यात आलेल्या पुरवणी मागण्यांमध्ये पाच हजार ९७७ कोटी ४० लाख ८२ हजार रुपयांच्या महसुली लेख्यांवरील खर्चाच्या तर ४०६ कोटी ५६ लाख ४३ हजार रुपयांच्या भांडवली लेख्यांवरील खर्चाच्या पुरवणी मागण्यांचा समावेश आहे.
पुरवणी मागण्यांमध्ये गृह, ग्रामविकास, सहकार, सार्वजनिक बांधकाम विभागाला झुकते माप देण्यात आले आहेत. गृह विभाग आणि उत्पादन शुल्क विभागासाठी २ हजार ६९२ कोटी १५ लाख, चार हजार रुपयांची तरतूद केली आहे.
तसेच ग्रामविकास विभागाने महावितरणला देण्यासाठी दोन हजार, २१४ कोटी, ७२ लाख ८१ हजार, सहकार व पणन विभागाला एक हजार ३३४ कोटी, ९६ लाख, ३६ हजार रुपयांची तरतूद केली आहे.
हिवाळी अधिवेशनात अर्थमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी ५२ हजार कोटी रुपयांच्या पुरवणी मागण्या सादर केल्या होत्या. या अधिवेशनात सहा हजार ३८३ कोटींच्या पुरवणी मागण्या सादर केल्या आहेत.
यामध्ये कर्जमुक्ती योजनेतील प्रोत्साहन अनुदानासाठी एक हजार १४ कोटी रुपये देण्यात येणार आहेत. तर वस्त्रोद्योग धोरणांतर्गत प्रकल्पांना व्याज अनुदानाऐवजी भांडवली अनुदानासाठी १०० कोटी, भूविकास बँकेच्या कर्मचाऱ्यांची देणी आणि थकबाकीसाठी २२० कोटी, ९६ लाख रुपये देण्यात येणार आहेत.
महावितरणला दोन हजार कोटी
राज्यातील ग्रामपंचायतींच्या पथदिव्यांच्या वीज बिलांची महावितरणकडे मोठ्या प्रमाणात थकबाकी होती. या थकबाकीपोटी महावितरणला २ हजार २१४ कोटी, ७२ लाख ८० हजार रुपये देण्यात येणार आहेत. पुरवणी मागणीतून ही थकबाकी भरून काढण्यात येणार आहे. गेल्या अनेक वर्षांपासून ही थकबाकी होती.
एसटी महामंडळाला २६७ कोटींचे अर्थसाहाय्य
गेल्या काही दिवसांपासून एसटी कर्मचाऱ्यांच्या वेतनाचा आणि देण्याचा विषय प्रलंबित आहे. या पुरवणी मागण्यांमध्ये एसटी महामंडळाला विशेष अर्थसहाय्यापोटी २६७ कोटी ७२ लाख रुपयांची मागणी केली आहे.
अन्य प्रमुख मागण्या...
- रस्ते व पुलांच्या देखभाल दुरुस्तीसाठी ४५२ कोटी ४७ लाख
- रेल्वे सुरक्षा बांधकामे अंतर्गत महाराष्ट्र रेल्वे पायाभूत विकास महामंडळाच्या रेल्वे प्रकल्पासाठी १९० कोटी
- एकत्रित प्रोत्साहन योजनेंतर्गत लघू, मध्यम, मोठ्या व विशाल प्रकल्पांना प्रोत्साहन देण्यासाठी ७६३ कोटी ७७ लाख ११ हजार
- ग्रंथालयांना सहायक अनुदानासाठी १० कोटी, २३ लाख ४७ हजार
- अनुदानित अशासकीय व्यावसायिक शिक्षण व प्रशिक्षण संस्थांना शिक्षक व शिक्षकेत्तर कर्मचाऱ्यांच्या पीएफवरील व्याजासाठी ५५८ कोटी
शिंदे गटाला ठेंगा
पुरवणी मागण्यांमध्ये देवेंद्र फडणवीस, ग्रामविकासमंत्री गिरीश महाजन आणि सहकार मंत्री अतुल सावे आणि भाजपकडील खात्यांना ६० ते ७० टक्के पुरवणी मागण्यांद्वारे निधी देण्यात आला आहे. शिंदे गटाकडील मंत्र्यांच्या खात्यांना मात्र नामपात्र निधीची तरतूद केली आहे.
Read the latest agriculture news in Marathi and watch Agriculture videos on Agrowon. Get the latest updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Agriculture Jugad, and Farmer Success Stories.
ताज्या घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.