जिल्ह्यात नव्याने ११४ ग्रामसचिवालये बांधणार

जिल्ह्य परिषदेची स्व. आर. आर. आबा. पाटील ग्रामसचिवालय बांधकाम योजना
जिल्ह्यात नव्याने ११४ ग्रामसचिवालये बांधणार
Pune ZPAgrowon

पुणे ः जिल्ह्यातील ग्रामपंचायत इमारती अद्ययावत करण्यासाठी पुणे जिल्हा परिषदेकडून स्व. आर. आर. पाटील (R R PAtil) ग्रामसचिवालय बांधकाम योजना सुरू करण्यात आली आहे. यंदाच्या अर्थसंकल्पात ग्रामपंचायत इमारती (Grampanchayat Building) बांधण्यासाठी निधीची भरीव तरतूद केली आहे. त्यामुळे जिल्ह्यात ११४ ग्रामपंचायतींना नवी कार्यालये बांधता येणार आहे.

पुणे जिल्ह्यातील अनेक ग्रामपंचायतींना स्वतःच्या इमारती नाहीत. तसेच, इमारती बांधण्यासाठी त्यांच्याकडे पुरेसा निधी अथवा किंवा जमीन नसल्याने त्यांना ग्रामसचिवालय बांधता येत नसल्याच्या तक्रारी येत होत्या. त्या पार्श्‍वभूमीवर, पुणे जिल्हा परिषदेने स्थानिक स्वराज्य संस्थांच्या बळकटीकरणासाठी ही योजना सुरू केली आहे. जिल्हा परिषद स्वनिधीतून या ग्रामपंचायतीचे बांधकाम करण्यात येणार आहे. या बांधकामासाठी पंचायत विभागाकडून अटी व शर्ती ठेवण्यात आल्या असून, त्यानुसार ही सर्व कामे येत्या मार्च २०२३ पर्यंत पूर्ण करण्याचे उद्दिष्ट ठेवण्यात आले आहे.

ग्रामसचिवालय बांधकामासाठी जागा ही ग्रामपंचायत मालकीची असावी, याबाबतची तपासणी उपअभियंता यांनी करून घ्यावी, असे स्पष्ट करण्यात आले आहे. या योजनेत ग्रामपंचायत सचिवालयाचे नवीन काम करणेच बंधनकारक आहे. त्यामुळे दुरुस्ती किंवा वाढीव काम करता येणार नाही. मंजूर झालेली रक्कम आणि टाइप प्लॅननुसार ग्रामपंचायत कार्यालय तयार करणे बंधनकारक आहे. ई-निविदा प्रक्रिया पूर्ण करून नंतरच अंमलबजावणी करावी. काम पूर्ण झाल्यानंतर कामांचे मूल्यांकन दाखला, पूर्णत्वाचा दाखला आणि जिओ टॅगिंग फोटो द्यावे लागणार आहेत. मंजूर निधीपेक्षा अतिरिक्त लागणारा निधी संबंधित ग्रामपंचायतीने स्वःनिधी, वित्त आयोग, लोकवर्गणी, मनरेगा किंवा जिल्हा ग्राम विकास निधीतून खर्च करणे बंधनकारक करण्याची अट ग्रामपंचायतींना ठेवण्यात आली आहे, अशी माहिती जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी तथा प्रशासक आयुष प्रसाद यांनी दिली.

या ग्रामपंचायतींना बांधता येणार नवी कार्यालये

सर्वाधिक भोर तालुक्‍यातील ३८ ग्रामसचिवालयांचा समावेश आहे. जुन्नर तालुक्‍यातील १५, मुळशी १०, वेल्हे ११, आंबेगाव ७, खेडमध्ये ९, इंदापूर आणि पुरंदरमध्ये प्रत्येकी ८, मावळ आणि शिरूरमध्ये प्रत्येकी तीन, तर दौंड आणि हवेली तालुक्‍यात प्रत्येकी एक ग्रामसचिवालयाचा समावेश आहे.

Read the latest agriculture news in Marathi and watch Agriculture videos on Agrowon. Get the latest updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Agriculture Jugad, and Farmer Success Stories.

ताज्या घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
www.agrowon.com