पाणी योजनांसाठी १७० कोटी अपेक्षित

महापालिका आयुक्त विक्रम कुमार यांची माहिती
पाणी योजनांसाठी १७० कोटी अपेक्षित
Water supply scheme Agrowon

पुणे : ‘‘महापालिका हद्दीत नव्याने समाविष्ट झालेल्या सूस, म्हाळुंगे तसेच बावधनसाठी महापालिकेकडून समान पाणी योजनेप्रमाणेच (Water Scheme) पाणीपुरवठा (Water Scheme) करण्यात येणार आहे. त्यासाठीचा आराखडा सल्लागारांकडून महापालिकेस सादर करण्यात आला आहे. या योजनेसाठी १७० कोटींचा खर्च अपेक्षित आहे,’’ अशी माहिती महापालिका आयुक्त विक्रम कुमार (Vikram Kumar) यांनी दिली.‘‘ मात्र, या आराखड्यात पालिकेकडून काही बदल करण्यात येतील. त्यानंतरच अंतिम आराखड्यास मान्यता दिली जाईल. तसेच, उर्वरित गावांच्या आराखड्याचे कामही ३० जूनपर्यंत पूर्ण केले जाईल,’’ असेही आयुक्त म्हणाले.

महापालिकेत ४ वर्षांपूर्वी आलेल्या तसेच वर्षभरापूर्वी नव्याने समाविष्ट झालेल्या ११ गावांमध्ये अद्यापही महापालिकेस पुरेसा पाणीपुरवठा करणे शक्य झालेले नाही. त्यातच, नवीन २३ गावांचा पाणीप्रश्न थेट न्यायालयातच गेल्याने या गावांना टँकरने पाणी देण्याचे आदेश महापालिकेस आहेत. मात्र, त्यासाठी पालिकेस कोट्यवधींचा खर्च करावा लागेल. त्यामुळे पालिकेकडून या गावांसाठी तातडीने शहरात सुरू असलेल्या समान पाणी योजनेच्या धर्तीवर पाणी योजना राबविण्यात येईल.

पालिकेने त्यासाठी आधीच सल्लागाराची नियुक्ती केली होती. या सल्लागाराने नुकताच आराखडा पालिकेस सादर केला. त्यात बावधन, सूस, म्हाळुंगे या गावांसाठी १७० कोटींचा खर्च अपेक्षित आहे. सूस आणि म्हाळुंगेसाठी १०० कोटींचा खर्च तर बावधनसाठी ७० कोटी रुपये लागतील, असे आराखड्यात स्पष्ट केले आहे. मात्र, या आराखड्यात महापालिकेने काही बदल सुचविले आहेत. त्यानुसार सुधारित आराखडा पुढील आठवड्यात सादर केला जाणार असला तरी या प्रकल्पाच्या खर्चात फारसा फरक पडणार नसल्याचे सांगत, हा आराखडा मंजूर करून लगेचच पालिकेच्या एस्टिमेट समितीसमोर ठेवून त्यास मान्यता दिली जाणार असल्याचेही आयुक्तांनी स्पष्ट केले.

Read the latest agriculture news in Marathi and watch Agriculture videos on Agrowon. Get the latest updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Agriculture Jugad, and Farmer Success Stories.

ताज्या घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
www.agrowon.com