
Nagar News : गोपीनाथ मुंडे शेतकरी अपघात विमा योजनेअंतर्गत (Gopinath Munde Farmer Accident Insurance Scheme) कृषी विभागाच्या संगमनेर उपविभागात २०२२ मध्ये ५३ प्रस्ताव मंजूर करण्यात आले आहेत.
तर २०२३ मधील ३९ प्रस्ताव मंजुरीसाठी जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी कार्यालयाकडे पाठविण्यात आल्याची माहिती संगमनेर उपविभागीय कृषी अधिकारी सुधाकर बोराळे यांनी दिली आहे.
कृषी विभागाच्या संगमनेर उपविभागात संगमनेर, अकोले, कोपरगाव व राहाता या तालुक्यांचा समावेश होतो. शेती व्यवसाय करताना होणाऱ्या अपघातात शेतकऱ्याचा मृत्यू झाल्याने कुटुंबाचा आधार हरवतो, तर काही वेळा दिव्यांगत्व स्वीकारावे लागते.
यामुळे शेतकऱ्याच्या कुटुंबाची आर्थिक स्थिती खालावते. त्यासाठी शासनातर्फे लोकनेते गोपीनाथ मुंडे यांच्या नावाने शेतकरी अपघात विमा योजना राबविली जाते.
या योजनेत २०२२ मध्ये संगमनेर १९, अकोले १२ , कोपरगाव १० व राहाता १२ अशा ५३ प्रस्तावास मंजुरी मिळाली असून, लाभार्थी व त्यांच्या कुटुंबीयास विमा रक्कमही देण्यात आली आहे.
२०२३ साठी संगमनेर मधून १८, अकोले - ११, कोपरगाव -१, राहाता मधून ९ प्रस्ताव अहमदनगर जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी यांच्याकडे पाठविण्यात आले आहेत.
या योजनेसाठी २००९ - २०१० साली एक लाख रुपये विमा संरक्षित केला होता. मात्र या योजनेचे कल्याणकारी स्वरूप पाहता, ती रक्कम २ लाख रुपये करण्यात आली.
या अंतर्गत शेतकऱ्याचा अपघाती मृत्यू झाल्यास तसेच दोन डोळे किंवा दोन अवयव निकामी झाल्यास कुटुंबाला २ लाख रक्कम विम्याच्या स्वरूपात दिली जाईल. एक अवयव किंवा एक डोळा निकामी झाला असेल, तर १ लाख विमा दिला जाईल.
राज्याच्या महसूल नोंदीनुसार खातेदार असलेला शेतकरी व त्यांच्या कुटुंबातील वहितीधारक खातेदार म्हणून नोंद नसलेला कोणताही एक सदस्य (आई, वडील, लाभार्थ्याचे पती, पत्नी, मुलगा व अविवाहित मुलगी यापैकी कोणतीही एक व्यक्ती) अशा १० ते ७५ वर्षे वयोगटातील एकूण दोन जणांना लाभ घेता येईल.
आर्थिक अडचणीमुळे शेतकऱ्यांना विमा उतरवता न आल्याने उपचारासाठी पैसे उपलब्ध होत नाहीत, तसेच अपघातात मृत्यू झाल्यास कुटुंबाला अडचणींना सामोरे जावे लागते. या पार्श्वभूमीवर योजनेचा लाभ घेण्याचे आवाहन बोराळे यांनी केले आहे.
Read the latest agriculture news in Marathi and watch Agriculture videos on Agrowon. Get the latest updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Agriculture Jugad, and Farmer Success Stories.
ताज्या घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.