
जळगाव : जिल्ह्यात यंदा ११० टक्के पाऊस (Rain) झाला आहे. यामुळे सर्वच सिंचन प्रकल्पात (Irrigation Project) पाणीसाठा (Water Storage) पुरेसा आहे. पाणीटंचाई (Water Shortage) जाणवणार नसल्याचे चित्र तूर्त आहे. असे असले तरी जिल्हा प्रशासनाने जिल्हा परिषदेकडून संभाव्य पाणीटंचाई आराखडा तयार करवून घेतला आहे. त्यानुसार ४३२ गावांमध्ये संभाव्य पाणीटंचाई जाणवणार आहे. दोन कोटींचा टंचाई आराखडा तयार करण्यात आला आहे.
गेल्या तीन ते चार वर्षांपासून जिल्ह्यात पाऊस चांगला पडत आहे. यामुळे पाणीटंचाईची गावे कमीच असतात. यंदाही पाऊस १०० टक्क्यांवर झाला आहे. जिल्ह्यातील गिरणा, वाघूर, हतनूर या मोठ्या प्रकल्पांसह लहान प्रकल्पांमध्येही चांगला पाणीसाठा आहे.
यामुळे टंचाईची परिस्थिती नाही. मात्र आपल्याकडील उन्हाळा अतिशय कडक असतो. तापमान ४० ते ४८ अंशांदरम्यान असते. यामुळे भूगर्भातील पाण्याची पातळी खालावू शकते.
ऐनवेळी उपाययोजना करण्यापेक्षा आतापासूनच उपाययोजना केल्या म्हणून संभाव्य पाणीटंचाई आराखडा तयार करण्यात आला आहे. मागील चार वर्षांपूर्वी जिल्ह्यात दुष्काळी परिस्थिती होती. यामुळे टंचाई आराखडा १३ ते १५ कोटींच्या घरात जात होता. यंदा भरपूर पाणीसाठा आहे. पाणीटंचाईची स्थिती गृहीत धरून आराखडा अडीच कोटींपेक्षा कमी रकमेचा केला आहे.
दुसऱ्या टप्प्यात ३२० गावे
जिल्ह्यात ४३२ गावात संभाव्य पाणीटंचाई होणार आहे. पहिल्या टप्प्यात ११२ गावे, तर दुसऱ्या टप्प्यात ३२० गावांचा सामावेश आहे. या गावांसाठी २ कोटी ३३ लाखांचा टंचाई आराखडा आहे.
या गावांमध्ये कूपनलिका तयार करणे, नवीन विंधन विहीर, नळ योजनांची विशेष दुरुस्ती, तात्पुरत्या पूरक नळ योजना घेणे, खासगी विहीर अधिग्रहीत करणे, विहीर खोली करणे, गाळ काढणे, बुडक्या घेणे, टँकर, बैलगाडीने पाणीपुरवठा करणे आदी उपाययोजना करण्यात आल्या आहेत.
चोपडा, जामनेरला सर्वाधिक गावे
सर्वाधिक टंचाईग्रस्त गावे चोपडा तालुक्यात ७६, त्या खालोखाल जामनेर तालुक्यात ७५ गावे आहेत. सर्वांत कमी गावे जळगाव तालुक्यात सात, रावेर व भुसावळ तालुक्यांत ८ गावे आहेत.
ही आहेत संभाव्य पाणीटंचाईग्रस्त गावांची संख्या
तालुका गावे
जळगाव ७
भडगाव १७
भुसावळ ८
बोदवड १२
चाळीसगाव ३४
चोपडा ७६
धरणगाव २८
एरंडोल १५
जामनेर ७५
मुक्ताईनगर १९
पाचोरा २५
पारोळा २८
रावेर ८
यावल १२
एकूण ४३२
Read the latest agriculture news in Marathi and watch Agriculture videos on Agrowon. Get the latest updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Agriculture Jugad, and Farmer Success Stories.
ताज्या घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.