
आमडदे (ता. भडगाव) : राज्य शासनाने महात्मा जोतिबा फुले कर्जमुक्ती योजनेंतर्गत (Mahatma Jotiba Phule Loan Waive Scheme) नियमित कर्जफेड (Regular Loan Repayment) करणाऱ्या शेतकऱ्यांच्या याद्या प्रसिद्ध केल्या. यात अनेक नियमित कर्ज परतफेड करणाऱ्या शेतकऱ्यांची नावे नसल्याच्या तक्रारी आहेत.
ज्या शेतकऱ्यांची नावे याद्यांमध्ये आहेत. अशा शेतकऱ्यांच्या खात्यावर ५० हजार रुपये जमा झालेले नाहीत. तक्रारदार शेतकऱ्यांची नावे पहिल्या यादीत आलेली आहेत. मात्र त्यांच्या खात्यात अनुदानाची रक्कम मात्र पडलेली नाही.याबाबत भडगाव तालुक्यातील शेतकऱ्यांनी तहसीलदारांची भेट घेऊन व्यथा मांडली.
राज्यातील महाविकास आघाडी सरकारने सत्तेवर आल्यानंतर शेतकऱ्यांसाठी महात्मा जोतिबा फुले कर्जमुक्ती योजनेची घोषणा केली होती. या योजनेंतर्गत दोन लाखांच्या आतील मुद्दल व व्याज रक्कम थकबाकीदारांना माफ करण्यात आली होती.
तर दोन वर्षांच्या कालखंडानंतर तत्कालीन महाविकास आघाडी सरकारने मुदतीत पीक कर्जफेड करणाऱ्या शेतकऱ्यांना रुपये ५० हजारापर्यंत अनुदान देण्याची घोषणा केली होती. नियमितपणे कर्जफेड करणाऱ्या शेतकऱ्यांची संख्या जिल्ह्यात ५७ हजार २३१ इतकी आहे.
शेतकऱ्यांची क्रूर चेष्टा शासनाच्यावतीने केली जात आहे. योजनेचे लाभार्थी असूनही लाभ मिळत नाही. त्यासाठी शासनाचे दरवाजे शेतकऱ्यांना ठोठावे लागत आहेत. शेतीची कामे सोडून शेतकऱ्यांना तहसीलदारांच्या कार्यालयात रोज फेरफटका मारावा लागत आहे.
तहसीलदारांनी त्वरित यावर कारवाई करावी व योजनेच्या लाभार्थ्यांच्या खात्यावर सन्मानपूर्वक प्रोत्साहनपर अनुदान वितरित केले जावे, ही शेतकरी वर्गातून मागणी होत आहे.
त्यावर त्वरित निर्णय न झाल्यास शेतकरी आंदोलनाच्या पवित्र्यात आहेत. वेळप्रसंगी तहसील परिसरामध्ये उपोषणाला बसण्याची तयारी संबंधित शेतकऱ्यांनी दर्शवलेली आहे. याप्रसंगी राजेंद्र देसले, नितीन भोसले, विष्णू भोसले यांनी शेतकऱ्यांच्यावतीने तहसीलदारांना निवेदनपर अर्ज केलेला आहे.
भडगाव तालुक्यात तीन हजारांवर कर्जखाती...
प्रोत्साहनपर लाभ योजनेंतर्गत शेतकऱ्यांना लाभ मिळण्यासाठी विशिष्ट क्रमांकांची यादी २३ डिसेंबरला प्रसिद्ध होऊन ५७ हजार २३१ शेतकऱ्यांची नावे प्रसिद्ध झाली आहेत. विशिष्ट क्रमांकाच्या यादीमध्ये जिल्हा सहकारी बँकेचे आजपर्यंत एकूण ४५ हजार ८८ व राष्ट्रीयकृत बँकांचे १२ हजार १४३, असे एकूण ५७ हजार १३१ कर्जखाती आली आहेत. एकट्या चाळीसगाव तालुक्यात ३ हजार ६७ कर्जखाती आहेत.
Read the latest agriculture news in Marathi and watch Agriculture videos on Agrowon. Get the latest updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Agriculture Jugad, and Farmer Success Stories.
ताज्या घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.