
Nagpur News : महात्मा जोतिबा फुले शेतकरी कर्जमुक्ती योजनेतील पात्र लाभार्थ्यांना मिळणारे प्रोत्साहनपर अनुदान केवळ १० मिनिटांत बॅंकेकडे वळते करण्यात आले. जिल्ह्यातील २ हजार ३६२ लाभार्थ्यांच्या खात्यात ५० हजारांपर्यंत प्रोत्साहन राशी मिळणार आहे.
बॅंकेच्या खात्यात ११ कोटी ६ लाख ७४ हजार २२१ रुपये बॅंकेच्या खात्यात जमा झाले असल्याची माहिती बॅंकेचे मुख्य कार्यकारी अधिकारी यांनी दिली. नागपूर जिल्हा मध्यवर्ती सहकारी बॅंकेतून कर्ज घेतलेल्या शेतकऱ्यांच्या खात्यात प्रोत्साहनपर अनुदान जमा झाल्या नसल्याच्या तक्रारी प्रदेशाध्यक्ष बावनकुळे यांच्याकडे आल्या होत्या.
त्यानुसार बॅंकेच्या महाल येथील मुख्य कार्यालयात बावनकुळे यांनी कर्जमाफी व प्रोत्साहन निधी याबाबतची माहिती बॅंक अधिकाऱ्यांकडून जाणून घेतली.
यावेळी अधिकाऱ्यांनी अडचणींचा पाढाच वाचला. अडचणी समजून घेत बावनकुळे यांनी सहकार विभागाचे अतिरिक्त मुख्य सचिव अनूप कुमार व सहकार आयुक्त अनिल कवडे यांच्याशी दूरध्वनीवरून संपर्क केला व शेतकऱ्याच्या अडचणी सोडविण्यासाठी तातडीने प्रोत्साहन अनुदान जारी करण्याची विनंती केली.
यावर अतिरिक्त मुख्य सचिवांनी अनुदान जारी केले जाणार असल्याचे सांगितले. काही वेळ बॅंकेच्या अधिकाऱ्यांशी शेतकऱ्यांच्या समस्येबाबत बोलत असतानाच १० मिनिटांच्या आतच मध्यवर्ती बॅंकेतून कर्ज घेतलेल्या शेतकऱ्यांना अनुदान बॅंकेकडे वळते करण्यात आल्याची बातमी बॅंकेचे मुख्य कार्यकारी अधिकारी सी.आर. नाईक यांनी दिली.
आतापर्यंत २ हजार ५९४ खातेधारकांना लाभ
२०१७-१८ ते २०१९-२० या तीन वर्षांच्या कालावधीत कर्ज घेऊन कोणतेही दोन वर्षे परतफेड करणाऱ्या शेतकऱ्यांना ५० हजार रुपयांची प्रोत्साहन राशी देण्याचा निर्णय सरकारने घेतला होता. या योजनेचे नागपूर जिल्ह्यातून ७ हजार ३७३ शेतकरी पात्र ठरले होते.
तर, मध्यवर्ती सहकारी बॅंकेचे २ हजार ६५० पात्र खातेधारक प्रोत्साहनपर राशीच्या प्रतीक्षेत होते. त्यापैकी २३५ शेतकऱ्यांना योजनेचा लाभ काही दिवसांपूर्वी मिळाला होता.
Read the latest agriculture news in Marathi and watch Agriculture videos on Agrowon. Get the latest updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Agriculture Jugad, and Farmer Success Stories.
ताज्या घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.