
Agriculture Irrigation सोलापूर ः नीरा-देवघर प्रकल्पाला सुधारित प्रशासकीय मान्यता देण्यात आली आहे. या प्रकल्पातून बंदिस्त जलवाहिनीतून पाणीपुरवठ्याचे नियोजन निश्चित यशस्वी होईल.
र्वरित निधीकरिता केंद्र सरकारला प्रस्ताव सादर करण्यात येईल. यामुळे माळशिरस तालुक्यातील दुष्काळी २२ गावांना पाणी मिळेल.
याबरोबरच फलटण आणि माळशिरस तालुक्यातील सुमारे २४ हजार ५२० हेक्टर क्षेत्र ओलिताखाली येण्यास मदत होईल. त्यामुळे या सर्व कामांना गती द्यावी, असे निर्देश उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिले आहेत.
लोकसभेच्या माढा मतदारसंघातील प्रलंबित उपसा सिंचन योजना, महावितरण कंपनीसंबंधित विविध कामे यासह विविध योजनांची आढावा बैठक नुकतीच फडणवीस यांच्या अध्यक्षतेखाली मंत्रालयात झाली.
या वेळी खासदार रणजितसिंह नाईक-निंबाळकर, आमदार शहाजी पाटील, जयकुमार गोरे, वित्त विभागाचे अपर मुख्य सचिव मनोज सैनिक, जलसंपदा विभागाचे अपर मुख्य सचिव दीपक कपूर, उपमुख्यमंत्री कार्यालयाचे प्रधान सचिव डॉ. श्रीकर परदेशी, ऊर्जा विभागाच्या प्रधान सचिव आभा शुक्ला, नियोजन विभागाचे प्रधान सचिव राजगोपाल देवरा, विधी व न्याय विभागाचे प्रधान सचिव नीरज धोटे, कृष्णा खोरे विकास महामंडळाचे कार्यकारी संचालक अतुल कपोले आदी उपस्थित होते.
फडणवीस म्हणाले, ‘‘कृष्णा-भीमा स्थिरीकरण प्रकल्प दुष्काळी तालुक्यांसाठी महत्त्वपूर्ण आहे. त्यासाठी जागतिक बँक अर्थसहाय करेल. त्यासाठी जलसंपदा विभागाने विविध बाबींची पूर्तता तत्काळ करून घ्यावी.
उरमोडी धरणाची सुधारित प्रशासकीय मान्यता मंजूर झाली आहे. बोगद्याचे काम पूर्ण झाले आहे. प्रकल्पातील उर्वरित त्रुटींची दुरुस्ती महिनाभरात पूर्ण करावी.
शिवाय उरमोडी ते वाठार किरोली याठिकाणी बंदिस्त जलवाहिनीचे कामही हाती घ्यावे. यामुळे माण, खटाव या दुष्काळी भागांना मोठा दिलासा मिळेल.’’
‘‘टेंभू योजनेची पाणी वाटप प्रक्रिया तत्काळ पूर्ण करून माण व खटावसाठी योजना राबवावी. शिवाय सांगोला उपसा सिंचन योजनेचा आराखडा तयार करावा. या योजनेचा प्रस्ताव १ मार्चला देऊन प्रशासकीय मान्यता झाल्यानंतर एप्रिलपासून काम सुरू करावे.
शिवाय नीरा-देवधर प्रकल्पातील पाण्याचे फेरनियोजन करून पाणी उपलब्ध झाल्यास एक टीएमसी पाणी सांगोला तालुक्याला द्यावे.
यामुळे सांगोला टँकरमुक्त होण्यास मदत होईल,’’ असे फडणवीस यांनी सांगितले. दहिगाव उपसा सिंचन योजनेच्या निविदा येत्या १० दिवसांत काढून काम त्वरित सुरू करण्याच्या सूचनाही त्यांनी दिल्या.
आतापर्यंत २८७ रोहित्रे बसविली आहेत. ६९ रोहित्रे १५ दिवसांत बसविली जातील. याशिवाय फलटण तालुक्यांत तीन नवीन वीज उपकेंद्र निर्माणाधीन आहेत. तीही लवकरच कार्यान्वित होतील, अशी माहिती शुक्ला यांनी दिली.
या वेळी खासदार निंबाळकर यांनी सातारा जिल्ह्यासाठी जादा रोहित्रांची मागणी केली. शिवाय सोलापूर-पुणे महामार्गावरील टेंभुर्णी, मोडनिंब यासह चार ठिकाणी प्रस्तावित असलेले ट्रामा केअर सेंटर उभारण्याची मागणी त्यांनी केली.
'सीना-माढा'त नवी गावे येणार
सीना-माढा उपसिंचन प्रकल्पात समावेश नसलेल्या माढा तालुक्यातील बावी, तुळशी, परितेवाडी, अंजनगाव या गावांचा समावेश होण्याबाबत सर्वेक्षण करून अहवाल सादर करावा.
खैराव-मानेगाव उपसासिंचन योजनेत मानेगाव, धानोरे, कापसेवाडी, बुदुकवाडी, हटकरवाडी, जामगाव इत्यादी गावांना लाभ मिळण्याबाबत सुद्धा अहवाल सादर करण्याच्या सूचना फडणवीस यांनी केल्या.
Read the latest agriculture news in Marathi and watch Agriculture videos on Agrowon. Get the latest updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Agriculture Jugad, and Farmer Success Stories.
ताज्या घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.