
Sangli News : सांगली तालुक्यात उन्हाळ्याची तीव्रता दिवसेंदिवस वाढत आहे. परंतु तालुक्यातील ताकारी, टेंभू व आरफळ योजनांच्या लाभक्षेत्रात पाण्याची मोठ्या प्रमाणात उपलब्धता असल्याने येथे जनावरांच्या चाऱ्याची कमतरता नाही.
मात्र सिंचन योजनांच्या (Irrigation Scheme) पाण्यापासून वंचित असणाऱ्या क्षेत्रातील शेतकऱ्यांना मात्र चाराटंचाईचा सामना करावा लागत आहे.
कडेगाव हा कायम दुष्काळी तालुका म्हणून ओळखला जात होता. परंतु तालुक्यात ताकारी, टेंभू, आरफळ या सिंचन योजनांचे पाणी आल्याने येथे सध्या हरित क्रांती झाली आहे.
सिंचन योजनांच्या लाभक्षेत्रात मोठ्या प्रमाणात पाण्याची उपलब्धता झाली. त्यामुळे जनावरांच्या चाऱ्याचीही मोठ्या प्रमाणात उपलब्धता आहे. तालुक्यातील शेतकरी पशुपालनाकडे शेतीपूरक व्यवसाय म्हणून पाहत आहेत.
सध्या उन्हाळ्याची तीव्रता वाढू लागल्याने जे क्षेत्र सिंचन योजनांच्या पाण्यापासून वंचित राहिले आहे, अशा ठिकाणी पाणी टंचाई निर्माण झाल्याने येथील पशुपालक चिंताग्रस्त आहेत. येथील शेतकऱ्यांना पशुधन जगविण्यासाठी मका, हत्तीघास, ऊस, मूरघास आदी प्रकारचा चारा वाढीव दराने विकत घ्यावा लागत आहे.
तालुक्यातील ‘टेंभू’च्या अंतर्गत कडेगाव, शाळगाव, चिंचणी, हिंगणगाव, शिवाजीनगर, कोतीज, करांडेवाडी या सात तलावांपैकी शिवाजीनगर व हिंगणगाव हे दोन ‘टेंभू’चे अनुक्रमे टप्पे असल्याने या दोन्ही तलावांत सध्या मुबलक पाणी आहे.
मात्र अन्य तलावांची पातळी खालावली गेली आहे. मागील महिन्यात या तलावांत काही प्रमाणात ‘टेंभू’चे पाणी सोडण्यात आले होते. परंतु वाढत्या उन्हाळ्याच्या पार्श्वभूमीवर हे पाणी काही दिवसांत लगेच संपुष्टात येण्याची शक्यता आहे. त्यामुळे या तलावांच्या लाभक्षेत्रातील पिके व चाऱ्याचा प्रश्न गंभीर होण्याचा धोका आहे.
कडेगाव तालुका पशुधन आकडेवारी
गाई - १७१५१
म्हशी - ३८३०६
शेळ्या - २०५२९
मेंढ्या - ५१८२
तालुक्यातील चाऱ्याचे दर पुढीलप्रमाणे
मका - १२०० रुपये गुंठा
हत्तीघास - १००० रुपये गुंठा
ऊस - ४००० रुपये गुंठा
मूरघास- ७००० रुपये टन
Read the latest agriculture news in Marathi and watch Agriculture videos on Agrowon. Get the latest updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Agriculture Jugad, and Farmer Success Stories.
ताज्या घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.