Ajit Pawar News
Ajit Pawar NewsAgrowon

‘बीड पॅटर्न’साठी पाठपुरावा सुरूच

उपमुख्यमंत्री अजित पवार याची ग्वाही

पुणे ः पंतप्रधान पीकविमा योजनेत (Crop Insurance Scheme) बदल करावा तसेच ‘बीड पॅटर्न’ (Beed Pattern) राज्यभर लागू व्हावा यासाठी केंद्र शासनाकडे पाठपुरावा सुरूच आहे. या मुद्द्यावर याच आठवड्यात पुन्हा बैठक घेतली जाईल, अशी ग्वाही उपमुख्यमंत्री अजित पवार (Ajit Pawar) यांनी दिली.


पुणे विभागाच्या खरीप हंगाम (Kharif Season) पूर्वतयारीच्या आढावा बैठकीत ते बोलत होते. कृषिमंत्री दादा भुसे (Dada Bhuse), सहकारमंत्री बाळासाहेब पाटील, कृषी राज्यमंत्री डॉ. विश्‍वजित कदम, जलसंधारण राज्यमंत्री दत्तात्रय भरणे, कृषी विभागाचे प्रधान सचिव एकनाथ डवले, विभागीय आयुक्त सौरभ राव, कृषी आयुक्त धीरज कुमार तसेच कोल्हापूर, पुणे, सांगली, सातारा, सोलापूर, नगर या जिल्ह्यांतील विविध खात्यांचे वरिष्ठ अधिकारी व लोकप्रतिनिधी यावेळी उपस्थित होते.

‘विकेल ते पिकेल’ ही संकल्पना डोळ्यासमोर ठेवत नियोजन करावे, शेतकऱ्यांना दर्जेदार बियाणे, खते उपलब्ध होण्यासाठी नियोजन करावे, त्यासाठी गुणनियंत्रण विभागाने दक्षता घ्यावी, खोड भुंगेऱ्यांपासून डाळिंब बागा वाचविण्यासाठी व ऊस क्षेत्रात खोडवा व पाचट व्यवस्थापनाबाबत मार्गदर्शन करावे, फलोत्पादनाबाबत केंद्रीय निधीचा पुरेपूर वापर करावा, अशा सूचना उपमुख्यमंत्र्यांनी अधिकाऱ्यांना केल्या.

पुणे विभागाचे खरीप क्षेत्र साडे तेरा लाख हेक्टरचे आहे. खरिपात विभागाकरीता पीककर्ज पुरवठ्याचे उद्दिष्ट १० हजार २०२ कोटींचे आहे. तसेच, १४ हजार टन खतांचा साठा संरक्षित केला जाईल, असे बैठकीत सांगण्यात आले. डॉ. बाबासाहेब आंबेडकर कृषी स्वावलंबन योजना व बिरसा मुंडा कृषी क्रांती योजनेच्या अखर्चित निधीवर यावेळी चर्चा झाली. हा निधी पुन्हा वापरण्यास मान्यता देण्याबाबत राज्य शासनाने तयारी दर्शविली आहे.

कृषिमंत्री भुसे म्हणाले, ‘‘डाळिंब बागांमधील कीड नियंत्रणासाठी मोहिमेचे नियोजन केले जात आहे. डोंगराळ भागात वेळेत खते व बियाणे पुरवठ्यासाठी तयारी केली जात आहे. खते वेळेवर उपलब्ध करून देण्याची विनंती केंद्रालाही करण्यात आली आहे. शेतकऱ्यांना यंदा बियाणे पाकिट देण्याचाही विचार आहे,’’ असे सांगितले. ऊस क्षेत्र जास्तीत जास्त ठिबकवर आणावे, कृषी योजनांमध्ये महिलांना प्राधान्य द्यावे, सातबारा उताऱ्यावर महिला शेतकऱ्यांची नावे लावण्यासाठी महसूल विभागाने मोहीम राबवावी, अशा सूचनाही कृषिमंत्र्यांनी केल्या.

चौकट ---
असे आहे खरिपाचे विभागीय नियोजन
-खताचा ३१ हजार ३७० टन पुरवठा
-४ हजार ३६६ टन खत साठा संरक्षित
-बियाण्यांचा ४९ हजार ४२७ क्विंटल पुरवठा
-गुणनियंत्रणासाठी ६४ भरारी पथके
-शेतकऱ्यांसाठी ६९ तक्रार निवारण केंद्रे
- रिसोर्स बॅंक उपक्रमात ११७७ शेतकऱ्यांची
मदत
- पीककर्ज पुरवठ्यासाठी १० हजार २०२ कोटींचे लक्ष्यांक

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com