
Latest Agriculture Scheme : राज्यातील कांदा उत्पादक शेतकऱ्यांना दिलासा देण्यासाठी राज्य सरकारने महत्त्वाचा निर्णय घेतला आहे. कांदा उत्पादक शेतकऱ्यांना कांदा चाळ उभारण्यासाठी एक लाख ६० हजार रुपयांचे अनुदान देण्यात येणार आहे.
महात्मा गांधी ग्रामीण रोजगार हमी योजनेंतर्गत कांदा चाळीसाठी शेतकऱ्यांना हे अनुदान देण्यात येणार आहे. यासंदर्भात शासन निर्णय निर्गमित करण्यात आल्याची रोजगार हमी योजना आणि फलोत्पादन मंत्री संदिपान भुमरे यांनी दिली आहे.
भुमरे म्हणाले की, रांगडा कांद्याची साठवणूक क्षमता चांगली असल्याने तो सुकवून साठविला जाऊ शकतो. मात्र कांदा साठविण्यासाठी अद्यायावत गोदाम उपलब्ध नसल्याने खरीप हंगामातील कांदा काढला की लगेच विकावा लागतो. स्थानिक बाजारपेठेची व निर्यातीची मागणी भागविण्यासाठी कांद्याची साठवणूक क्षमता वाढविणे आवश्यक असल्याचे भुमरे म्हणाले
कांदा हे जीवंत पीक असून त्याचे मंदपणे श्वसन चालू असते. तसेच त्यामधील पाण्याचे उत्सर्जनही होत असते. त्यामुळे कांद्याची योग्य पध्दतीने साठवणूक न केल्यास ४० ते ४५ टक्क्यांपर्यंत नुकसान होण्याची शक्यता असते.
वजनातील घट, कांद्याची सड व कोंब येणे अशा प्रमुख कारणांमुळे कांद्याचे नुकसान होते. असे नुकसान टाळण्यासाठी कांद्याची शास्त्रोक्त पध्दतीने साठवणूक करणे गरजेचे आहे. त्यासाठी कांदा चाळीच्या माध्यमातून कांदा पिकाची साठवणूक आवश्यक असल्याचे भुमरे म्हणाले.
मनरेगा अंतर्गत मिळणार अनुदान
भुमरे म्हणाले की, मनरेगा अंतर्गत अकुशल मनुष्यबळासाठी ६० टक्के प्रमाणे ९६ हजार २२० रुपये इतकी मजुरी तसेच साहित्यासाठी लागणारा खर्च कुशल मनुष्यबळासाठी ४० टक्केच्या मर्यादेत म्हणजे ६४ हजार १४७ रुपये आणि अधिक साहित्याचा खर्च असे एकूण एक लाख ६० हजार ३६७ रूपये इतके अनुदान मिळणार आहे.
उर्वरित रक्कम २ लाख ९८ हजार ३६३ रुपये इतका निधी लोकवाटाच्या माध्यमातून उपलब्ध होणार असून कांदाचाळीसाठी एकूण खर्च चार लाख ५८ हजार ७३० रुपये येणार आहे.
गटशेती, महिला बचत गटांना सामुदायिक लाभ
खरीप व रब्बी हंगामामध्ये कांदा पिकाचे उत्पादन होते. राज्यात साधारण १३६.६८ लाख मेट्रिक टन इतक्या कांद्याचे उत्पादन घेतले जाते. त्यासाठी साधारणपणे एकूण ९.४५ लाख हेक्टर क्षेत्र कांदा पिकाखाली आहे. कांदा साठवण करण्याच्या गोदामासाठी रुंदी ३.९० मी. लांबी १२.०० मी. एकूण उंची - २.९५ मी. (जमीनीपासून ते टाय लेवलपर्यंत) याप्रमाणे आकारमान असते.
साधारण ०१ हेक्टर धारण क्षेत्रावर २५ मेट्रिक टन कांदा उत्पादन होते. कांदाचाळ योजनेचा वैयक्तिक किंवा सामुदायिकरित्या शेतकरी याचा लाभ घेऊ शकतात. तसेच गटशेती, महिला बचत गट यांना सामुदायिक लाभ घेता येऊ शकतो.
Read the latest agriculture news in Marathi and watch Agriculture videos on Agrowon. Get the latest updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Agriculture Jugad, and Farmer Success Stories.
ताज्या घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.