Moringa Cultivation
Moringa CultivationAgrowon

Moringa Cultivation : उस्मानाबादला शेवगा लागवड योजनेत पावणेदोन कोटींचा गैरव्यवहार

या योजनेसाठी दोन वर्षात सुमारे दीडशे शेतकऱ्यांची निवड करण्यात आली. पण या योजनेत बोगस लाभार्थी निवडण्यासह लागवड न करताच अनुदान वाटल्याचा प्रकार उघडकीस आला आहे.

उस्मानाबाद ः उस्मानाबाद जिल्ह्यात महात्मा गांधी राष्ट्रीय ग्रामीण रोजगार हमी योजनेच्या फळबाग लागवडीअंतर्गत (Horticulture Scheme) शेतकऱ्यांसाठी शेवगा लागवड योजना (Moringa Cultivation Scheme) राबवण्यात आली. या योजनेसाठी दोन वर्षात सुमारे दीडशे शेतकऱ्यांची निवड करण्यात आली. पण या योजनेत बोगस लाभार्थी निवडण्यासह लागवड न करताच अनुदान (Subsidy) वाटल्याचा प्रकार उघडकीस आला आहे. या संपूर्ण प्रकरणात सुमारे पावणेदोन कोटी रुपयांचा गैरव्यवहार झाल्याची प्राथमिक माहिती आहे.

महात्मा गांधी राष्ट्रीय ग्रामीण रोजगार हमी योजनेअंतर्गत उस्मानाबाद जिल्ह्यात डाळिंब, द्राक्ष, संत्रा, आंबा, सीताफळ, पेरू, चिंच, बोर या फळपिकांबरोबर खास शेवगा लागवडीसाठी प्रोत्साहन योजना राबवण्यात येत आहे. या योजनेतून फळबाग लागवडीसाठी जमीन तयार करण्यापासून ते अगदी फळबाग संगोपनापर्यंत तीन वर्षांसाठी शंभर टक्के अनुदान देण्यात येते.

Moringa Cultivation
Agriculture Produce Export : गहू आणि तुकडा तांदळावरची निर्यात बंदी उठवा

त्यात शेवगा लागवडीसाठी एक हेक्टरसाठी तीन वर्षांत जवळपास ५ लाख ३९ हजार रुपये इतके अनुदान मिळते. या योजनेच्या लाभासाठी लागवडीचा आराखडा, सात-बारा उतारा, अल्पभूधारक असल्याचे प्रमाणपत्र, जाॅबकार्ड आणि संबंधित ग्रामपंचायतीचा ठराव आवश्यक आहे. पण मागणीप्रमाणे सविस्तर प्रस्ताव देऊनही

विविध कारणे देऊन प्रस्ताव नाकारण्यात येत असल्याचा प्रकार घडला. या सगळ्याबाबत संशय आल्यानंतर इर्ला (ता.जि. उस्मानाबाद) येथील शेतकरी नंदकिशोर क्षीरसागर यांनी पहिल्यांदा या संबंधीची तक्रार जिल्हाधिकाऱ्यांकडे केल्यानंतर गैरव्यवहाराचा सगळा प्रकार उघडकीस आला.

Moringa Cultivation
Agriculture Entrepreneur : कृषी उत्पादक आता उद्योजक व्हावा

दीडशे लाभार्थी, पावणेदोन कोटी खर्च

उस्मानाबाद तालुक्यात रोजगार हमी योजनेतून २०२१-२२ या आर्थिक वर्षात शेवगा लागवडीसाठी सुमारे १२६ आणि २०२२-२३ या वर्षासाठी २८ अशा १५४ लाभार्थ्यांच्या प्रस्तावांना मंजुरी दिली गेली. या दोन्ही वर्षांत अकुशल कामावर १ कोटी ६१ लाख, तर कुशल कामावर १६ लाख २४ हजार असे १ कोटी ७७ लाख खर्च करण्यात आले आहेत.

तर यंदाच्या वर्षी ९ लाख ५३ हजार रुपये खर्च झाले आहेत. याप्रमाणे या योजनेवर एकूण एक कोटी ८६ लाख ७७ हजार रुपये खर्ची पडले आहेत, पण यापैकी अनेक शेतकऱ्यांनी प्रत्यक्ष शेवगा लागवड केली नसल्याचे निदर्शनास आले आहे. शिवाय हा प्रकार फक्त एकट्या उस्मानाबाद तालुक्यापुरता आहे. अन्य तालुक्यात काय, हाही संशोधनाचा विषय आहे.

..असा झाला गैरव्यवहार

- पंचायत समितीस्तरावरील अधिकारी-कर्मचारी आणि ग्रामपंचायत स्तरावरील पदाधिकाऱ्यांच्या संगनमताने प्रकार.

- लाभार्थ्यांच्या निवडी बोगस दाखवण्यात आल्या.

- अनेक लाभार्थींनी शेवग्याची लागवड न करताच त्यांच्या बँक खात्यावर अनुदान जमा करण्यात आले.

- अनेक शेतकऱ्यांकडे अल्पभूधारकाचे प्रमाणपत्र नाही.

- काही प्रस्तावांना ग्रामपंचायतीचे ठराव नाहीत.

- पण अर्थपूर्ण वाटाघाटीमुळे अर्धवट प्रस्ताव परिपूर्ण झाले.

- या प्रस्तावांना सरसकट कार्यारंभ आदेश देण्यात आले.

माझा स्वतःचा परिपूर्ण प्रस्ताव देऊनही नाकारण्यात आला. पैसे देणाऱ्यांचे प्रस्ताव मात्र त्रुटीसह मान्य करण्यात आले. वरिष्ठांनाही या बाबत माहिती दिली, पण कोणीच त्याबाबत दखल घेत नाही. त्यामुळेच मी स्वतः या संपूर्ण प्रकरणाची माहिती घेऊन तक्रार केली.
नंदकिशोर क्षीरसागर, तक्रारदार शेतकरी, इर्ला, जि. उस्मानाबाद

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com