पोल्ट्री कंपन्यांचा कारभार ईस्ट इंडिया कंपनीसारखा

पोल्ट्री उत्पादक शेतकऱ्यांची खासगी कंपन्यांकडून नाडवणुक होत असल्याची दखल केंद्रीय पशुसंवर्धन राज्यमंत्री संजीव बालियान यांनी घेतली आहे.
पोल्ट्री कंपन्यांचा कारभार ईस्ट इंडिया कंपनीसारखा
poultryAgrowon

पोल्ट्री उत्पादक (poultry Company) शेतकऱ्यांची खासगी कंपन्यांकडून नाडवणुक होत असल्याची दखल केंद्रीय पशुसंवर्धन राज्यमंत्री संजीव बालियान (sanjeev baliyan) यांनी घेतली आहे. या कंपन्यांना ब्रिटिश ईस्ट इंडिया कंपनीसारखं काम करायचं आहे का, अशी टिप्पणीही त्यांनी केली. खासगी कंपन्यांनी आपल्या कारभारात सुधारणा केली नाही तर सरकारला हस्तक्षेप करावा लागेल, असा इशारा त्यांनी दिला.

शेतकऱ्यांसाठी पूरक व्यवसाय म्हणून पोल्ट्री व्यवसायाकडे (कुक्कुटपालन) पाहिलं जातं. मात्र मागील काही दिवसांपासून या व्यवसायावर संक्रांत आली आहे. खासगी कंपन्यांकडून पोल्ट्री उत्पादक शेतकऱ्यांना कमी भाव दिला जात असल्याने ते अडचणीत आले आहेत.

या पार्श्वभुमीवर केंद्रीय पशुसंवर्धन, मत्स्यव्यवसाय आणि दुग्धव्यवसाय राज्यमंत्री संजीव बालियान यांनी बुधवारी (ता. १) खासगी कंपन्यांची झाडाझडती घेतली. ते म्हणाले, "खासगी कंपन्यांकडून पोल्ट्री उत्पादकांना योग्य किंमत मिळत नसेल तर त्यात सरकारला हस्तक्षेप करावा लागेल."

या समस्येवर लवकरात लवकर तोडगा काढण्यासाठी आणि बाजारपेठ सुनिश्चित करण्यासाठी पोल्ट्री व्यवसायाशी संबंधित सर्व घटकांची बैठक बोलवावी, अशी सूचना त्यांनी आपल्या विभागातील अधिकाऱ्यांना दिल्या.

सीआयआय आणि पशुसंवर्धन व दुग्धव्यवसाय विभाग यांच्या वतीने आयोजित चर्चासत्रात बालियान बोलत होते. ते म्हणाले, "जर लहान पोल्ट्री उत्पादकांचं शोषण होत असेल तर आम्हाला (भारत सरकार) यात हस्तक्षेप करावा लागेल. पोल्ट्री उद्योगात कार्यरत कंपन्यांसोबतच पोल्ट्री उत्पादक शेतकऱ्यांच्या समस्यांकडेही लक्ष देणं आवश्यक आहे."

लुधियाना स्थित गुरू अंगद देव पशुवैद्यकीय आणि पशुविज्ञान विद्यापीठाने २००५ साली केलेल्या अभ्यासाचा दाखला देत बालियान म्हणाले की, खासगी कंपन्यांशी करार करून ब्रॉयलर पोल्ट्री व्यवसाय करणाऱ्या शेतकऱ्यांना उत्पादन खर्चापेक्षा खूपच कमी मोबदला दिला जातो.

``शेतकऱ्यांना प्रति किलो ११.१५ रूपये उत्पादनखर्च येत असताना त्यांना फक्त प्रति किलो ६.४१ रुपये परतावा मिळाला. त्यामुळे शेतकऱ्यांचं किलोमागे ४.७५ रुपयांचं नुकसान झालं. खासगी कंपन्यांना 'ईस्ट इंडिया कंपनी'प्रमाणे काम करायचं आहे का?" असा सवाल बालियान यांनी केला. पोल्ट्रीमधील चुकीची विक्री पध्दत आणि कमी किंमतीमुळे गेल्या दहा वर्षांत एकही यशस्वी पोल्ट्री फार्म समोर आलेला नाही, यावर त्यांनी बोट ठेवलं.

पोल्ट्री फेडरेशन ऑफ इंडिया (PFI) च्या कार्यकारिणीने सांगितलं होतं की, उत्पादन खर्च वाढलेा असून तो प्रति पक्षी २८.५३ रुपये झाला आहे. शेतकऱ्यांना मात्र १४ ते १६ रुपये प्रति पक्षी दर मिळत आहे. यावर बालियान म्हणाले की, खासगी कंपन्यांनी उत्पादन खर्च काढण्यासाठी एक सूत्र तयार केले पाहिजे, अन्यथा पोल्ट्री उत्पादकांना त्रास सहन करावा लागेल.

सोयाबीनचे दर वाढले असतील तर पर्यायी कच्चा माल बनवण्यासाठी काही उपाय असू शकतो का, पोल्ट्री फीड कमी खर्चात उपलब्ध करून देण्यासाठी शास्त्रज्ञांनी उपाय योजावेत, असे आवाहनही केंद्री मंत्र्यांनी यावेळी केले.

Read the latest agriculture news in Marathi and watch Agriculture videos on Agrowon. Get the latest updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Agriculture Jugad, and Farmer Success Stories.

ताज्या घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
www.agrowon.com