कृषी कर्जाच्या विम्याची आवश्यकता

कृषी यंत्रे, वाहने, गोदाम, हरितगृह, पशुपालनातील विविध जनावरे व पक्षी, त्यासाठी बांधलेले शेड अशा साऱ्या घटकांचा विमा काढणे अत्यंत आवश्यक असते. मात्र विम्याची आवश्यक, तो कोणी काढावा आणि एकूणच फायद्याविषयी माहिती घेऊ.
Agriculture Loan
Agriculture Loan Agrowon

मागील एका लेखामध्ये आपण कृषी कर्ज आणि त्याच्या प्रकाराविषयी माहिती घेतली आहे. कोणतीही बॅंक ज्या वेळी एखाद्या कृषी प्रकल्पासाठी कर्जपुरवठा करते, त्यावेळी तिला त्या कर्जातून उत्पन्न झालेल्या मालमत्ता, पिके, यंत्रे, शेड किंवा बांधकाम, पशुपक्षी यांच्या शाश्वततेची काही प्रमाणात तरी खात्री मिळणे आवश्यक असते. मात्र कितीही काळजी घेतली तरी विविध नैसर्गिक आपत्ती किंवा रोगराई यामुळे नुकसान होऊ शकते. अशा वेळी काही प्रमाणात तरी नुकसान भरपाई मिळण्यासाठी विमा संरक्षण अत्यावश्यक ठरते. त्यामुळे बँका किंवा वित्तीय संस्था अशा मालमत्तेच्या विम्याचा आग्रह धरतात. नैसर्गिक आपत्ती म्हणजे आग, भूकंप, पूर, वादळ, अतिवृष्टी यामुळे यंत्रे, इमारत, पशुपक्षी यांची हानी होऊ शकते. यांचा विमा असल्यास त्याची भरपाई मिळते. प्रकल्प काहीसा अडखळला तरी पुढे सुरळीत चालू राहतो. जनावरांचा विमा असल्यास जनावराच्या मृत्यूनंतर विमा संरक्षण मिळते. मिळालेल्या रकमेतून पुन्हा जनावरांची खरेदी करून प्रकल्प पुढे चालू राहतो. कर्जदाराची काहीही चूक नसताना निर्माण झालेल्या आपत्तीमुळे होणाऱ्या मालमत्तेच्या सुरक्षितेसाठी विमा हे वरदान ठरू शकते.

Crop Insurance
Crop InsuranceAgrowon

विमा कशाचा काढतात?

मध्यम मुदत कर्ज किंवा खेळते भांडवल (कॅश क्रेडिट)

१. इलेक्ट्रिक मोटर आणि पंप सेट

२. हरितगृह, शेडनेट व त्याअंतर्गत विविध यंत्रे.

३. पॅकहाउस, प्रीकूलिंग, शीतगृह यांचे बांधकाम आणि यंत्रे.

४. ट्रॅक्टर, ट्रॉली आणि अन्य अवजारे.

५. कुक्कुटपालन - शेड, पिंजरे, साहित्य, यंत्रे आणि पक्षी

६. दुग्ध व्यवसाय - शेड, साहित्य, यंत्रे आणि जनावरे.

७. बँकेच्या कर्जातून निर्माण झालेल्या स्थिर आणि अस्थिर अशा सर्व मालमत्तेचा विमा आवश्यक असतो. उदा. विक्रेत्यांसाठी मालाच्या साठवणीसाठी आवश्यक गोदामे व त्यातील मालाचा विमा घ्यावा लागतो.

विम्याविषयी महत्त्वाचे :

१. विमा काढण्याची जबाबदारी ही कर्जदाराची, मात्र बँका कर्जदाराच्या वतीने विमा काढतात.

२. विमा पॉलिसी कर्जदाराच्या नावे असून, बँकेचेही नाव त्यावर असते. (Policy assigned to Bank)

३. विमा हा एका वर्षासाठी असतो. विमा पॉलिसीचे मुदतपूर्व नूतनीकरण आवश्यक असते. बँक नूतनीकरण करत असली तरी कर्जदारांनीही आपल्या पॉलिसीचे नूतनीकरण झाले आहे की नाही, याची खात्री करून घ्यावी.

४. जनावरांचा विमा काढल्यानंतर जनावरांच्या कानावर टॅग किंवा बिल्ला लावला जातो. तो टॅग किंवा बिल्ला कानावर असावा.

५. कोणत्याही आपत्तीमध्ये जनावराच्या मृत्यू झाल्यावर बँक आणि विमा कंपनीला त्वरित कळवावे. जनावराच्या मृत्यूनंतर फोटो, पशुवैद्यकीय अहवाल आणि टॅग किंवा बिल्ला विमा कंपनीला सादर करावा लागतो.

७. ट्रॅक्टर, जीप, ट्रक किंवा इतर वाहने बँक कर्जातून घेतलेली असल्यास त्या वाहनावर बँकेचे नाव लिहिले जाते. (उदा. This Vehicle is Hypothecated to ----- Bank). गोदाम, शेड, बांधकाम या ठिकाणी बँकेचा बोर्ड लावतात. हा बोर्डही विम्याच्या दृष्टीने आवश्यक असतो.

Rain Crop Damage
Rain Crop DamageAgrowon

पीकविमा

पंतप्रधान पीकविमा योजना (PMFBY) ही शासनाची पीकविमा योजना आहे. नैसर्गिक आपत्तीमुळे पिकाच्या होणाऱ्या नुकसानीमध्ये विम्याचे संरक्षण पुरवते. पीक कर्ज घेणाऱ्या शेतकरी, कर्जदारांसाठी हा पीकविमा सक्तीचा आहे. मात्र जे शेतकरी पीककर्ज घेत नाहीत, त्यांच्यासाठी पीकविमा हा ऐच्छिक आहे.

पीक विम्याचा हप्ता (Insurance premium)

खरीप पिके - धान्य आणि तेलबिया : २%

रब्बी पिके - धान्य आणि तेलबिया : १.५%

नगदी पिके आणि फळबागा पीककर्ज : ५%

ही योजना क्षेत्राधारीत असून, विम्याचे एकक हे गाव किंवा ग्रामपंचायत क्षेत्रातील प्रमुख व अन्य पिके असे असते.

या पिकांची हानी ही त्या क्षेत्रातील नैसर्गिक आपत्तीनुसार ठरवली जाते.

१. एखाद्या अधिक्षेत्रामध्ये प्रामुख्याने ज्या पिकांचा विमा आहे, त्याची पेरणी अथवा लागवड ही नैसर्गिक घटनेमुळे होऊच न शकल्यास एकूण विमा रकमेच्या २५ टक्के नुकसान भरपाई त्या विभागात मिळते.

२. वादळ, अतिवृष्टी, पूर, गैरमोसमी पाऊस अशा एखाद्या स्थानिक नैसर्गिक आपत्तीमुळे पिकाचे नुकसान झाल्यास वैयक्तिक शेतकरी किंवा कर्जदारानुसार नुकसानभरपाई ठरवली जाते.

३. सर्व पिकासाठी ही नुकसान भरपाई पिकाच्या जोखमीनुसार (Crop Risk) ही ७०%, ८०%, ९०% उपलब्ध आहे.

४. पिकाची नुकसान भरपाई ही पिकाचे थ्रेश होल्ड (Thresh hold Yield) उत्पादनानुसार ठरविली जाते.

Pollyhouse Damage
Pollyhouse DamageAgrowon

विमा ः कर्जदार, बॅंक दोघांचीही जबाबदारी

नाना आज बॅंकेत ट्रॅक्टरच घेऊन आले होते. तो बँकेच्या दारात उभा करून आत शिरतानाच त्यांना तानाजी भेटला. थोडी ख्यालीखुशाली झाल्यानंतर दोघेही बँक अधिकाऱ्याकडे गेले. त्यांना आपल्या ट्रॅक्टरच्या विम्याबाबत विचारणा केली. कारण त्यांच्या विम्याची मुदत दोन दिवसानंतर संपणार होती. त्यावर बँक अधिकारी म्हणाले, ‘‘बरे झाले नाना, आजच तुमच्या ट्रॅक्टरच्या विम्याचे नूतनीकरण करून टाकू.’’ त्यांनी त्याची प्रक्रिया सुरू केली. बोलताना सहजच म्हणाले, ‘‘तुमच्याप्रमाणेच बँकेची पण जबाबदारी असते विमा नूतनीकरणाची.’’ तानाजी लगबगीने पुढे आला. म्हणाला, ‘‘माझ्या दोन गायींच्या कानांतील विम्याचे बिल्ले हरविले आहेत.’’ त्यावर बँक अधिकारी म्हणाले, ‘‘बरे झाले, तुम्हीच आलात. गायींना नवीन बिल्ले लावण्याविषयी विमा कंपनीला कळवून टाकू. दोन ते तीन दिवसांत नवीन बिल्ले लावून जातील. आपल्या मालमत्तेच्या विम्याविषयी कर्जदारांनी अशीच जागरूकता दाखविणे गरजेचे आहे. कारण हे बॅंकेबरोबरच तुमच्याही फायद्याचे असते.’’

Read the latest agriculture news in Marathi and watch Agriculture videos on Agrowon. Get the latest updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Agriculture Jugad, and Farmer Success Stories.

ताज्या घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
www.agrowon.com