अनुदानित अवजारांच्या फेरविक्रीवर येणार बंधने

संगनमतातून अवजारांमध्ये अफरातफरीचा संशय
अनुदानित अवजारांच्या फेरविक्रीवर येणार बंधने
Agriculture ToolsAgrowon

पुणे ः केंद्र व राज्याच्या कृषी यांत्रिकीकरण योजनेतून (Agricultural Mechanization scheme) उपलब्ध असलेल्या अनुदानित अवजारांमध्ये (Subsidize Tools) मोठ्या प्रमाणात अफरातफरी होत असल्याचा संशय आहे. त्यामुळे राज्य शासनाकडून अनुदानित अवजारांच्या फेरविक्रीवर (Resell Of Agroculture Tools) बंधने आणली जाणार आहेत.

“यांत्रिकीकरणाच्या योजना आम्ही काळजीपूर्वक राबवितो आहोत. मात्र उत्पादक किंवा विक्रेत्यांच्या संगनमतातून शेतकऱ्यांची पिळवणूक होऊ नये, यासाठी काही कडक अटी लागू केल्या जाणार आहेत. एकदा घेतलेल्या अवजारांची ५-६ वर्षे विक्री करता येऊ नये. तसेच ट्रॅक्टर नसल्यास ट्रॅक्टरचलित अवजाराला अनुदान न देण्याचा निर्णय घेतला जाणार आहे,” अशी माहिती कृषी विभागाच्या सूत्रांनी दिली.

राज्याच्या काही भागांमध्ये विक्रेत्यांच्या संगनमताने एकच अवजार विविध शेतकऱ्याला विकल्याचे दाखवून अनुदान लाटले जात असल्याचा संशय आहे. शेतकऱ्याने अनुदानावर घेतलेले अवजार इतराला विकण्याबाबत सध्या कोणताही नियम अस्तित्वात नाही. त्याचाच फायदा विक्रेते घेत आहेत. “आम्ही अवजार शेतकऱ्याला विकले; पण शेतकऱ्याने त्याचे पुढे काय केले,” अशी साळसूद भूमिका विक्रेते घेऊ शकतात. ट्रॅक्टर नसतानाही सध्या सर्रासपणे अवजारे अनुदानावर मिळत आहेत. हीच अवजारे बाजारात पुन्हा विक्रीला येत असल्याचा कृषी विभागातील कर्मचाऱ्यांचा संशय आहे.

.. या गडबडी होत असल्याचा संशय
- अवजार उत्पादक, विक्रेते व कृषी कर्मचाऱ्यांचे काही जिल्ह्यांत संगनमत.
- एकाच यंत्राला दोन बिले आकारून दोन वेळा विक्री दाखवली जाते.
- खोटी बिले आकारून जीएसटी प्रत्यक्षात भरलाच जात नाही.
- कृषी विभागाच्या मार्गदर्शक सूचना पोकळ असल्याने गैरव्यवहाराला चालना.
- परराज्यांतील अनुदानित अवजारांवर अनुदान उचलले जाते
- एकच डाळ मिल, मळणी यंत्रे विविध जिल्ह्यांमध्ये विकल्याचे दाखवले जाते.
- यंत्रावर पक्क्या स्वरूपाची नोंद केली जात नाही.
- बनावट आरसी बुकचा वापर करून ट्रॅक्टर अनुदान लाटले जाते.
- विक्रेत्यांची नोंदणी, अवजारांचे मुळ किंवा अवजारांची मानके याची एकत्रित नोंद नाही.
- कोणत्या शेतकऱ्याला कोणते अवजार दिले, याची माहिती शोधता येत नाही.

राज्यातील शेतकऱ्यांच्या समृद्धीसाठी सरकारी योजनांमधून अवजार अनुदान वाटले जात आहे. मात्र त्याचा गैरफायदा घेतला जात असल्यास शेतकरी, विक्रेते, उत्पादक यांना स्थितीनुसार जबाबदार धरले जाईल. अवजारांच्या फेरविक्रीवर बंधने आणली जातील. कंपन्या व विक्रेत्यांची नोंदणीदेखील आता सक्तीची केली जाईल.
दिलीप झेंडे, कृषी संचालक, निविष्ठा व गुणनियंत्रण विभाग

Read the latest agriculture news in Marathi and watch Agriculture videos on Agrowon. Get the latest updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Agriculture Jugad, and Farmer Success Stories.

ताज्या घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
www.agrowon.com