Agriculture Warehouse : गोदामामध्येच करा शेतीमाल साठवणूक...

Warehouse Corporation : शेतकऱ्यांनी वखार महामंडळाच्या सुविधेचा फायदा घेणे आवश्यक आहे. वखार महामंडळाने गुणवत्तापूर्ण गोदामांची उभारणी करून शेतकऱ्यांना शेतीमाल साठवणुकीची उत्कृष्ट सुविधा उपलब्ध करून दिली असून, महाराष्ट्र राज्य सहकारी बँकेसोबत करार करून ९ टक्के व्याजदराने कर्जसुविधासुद्धा उपलब्ध करून दिले आहे.
Agriculture Warehouse
Agriculture WarehouseAgrowon

मिलिंद आकरे, हेमंत जगताप

Maharashtra State Warehouse Corporation : महाराष्ट्र राज्य वखार महामंडळाच्या गोदामात शेतीमाल ठेवताना शासनाने मासिक भाड्याचे दर ठरविले आहेत. हे दर अत्यंत कमी आहेत. शेतकऱ्यांनी शेतीमाल घरात ठेवण्यापेक्षा महाराष्ट्र राज्य वखार महामंडळाच्या गोदामात ठेवल्यास अत्यल्प भाड्यात म्हणजेच सुमारे ७ रुपये प्रति महिना प्रति पोते इतक्या कमी भाड्यात संपूर्ण शेतीमालाचा सांभाळ, विमा संरक्षण, उंदीर, किडे, मुंग्या व बुरशी पासून संरक्षण करण्यात येते.

तसेच शेतकऱ्यांनी शेतीमाल वखार महामंडळाच्या गोदामात ठेवल्यास ५० टक्के गोदाम भाड्यात सूट मिळते. शेतकरी कंपनी असल्यास गोदाम भाड्यात २५ टक्के सूट मिळते. त्यानुसार गोदाम भाड्याचा हिशेब केल्यास सुमारे ४ ते ५ रुपये मासिक भाड्यात शेतीमालाचे संरक्षण होऊ शकते.

यात सर्व खर्च जसे की संपूर्ण शेतीमालाचा सांभाळ, विमा संरक्षण, उंदीर, किडे, मुंग्या व बुरशीपासून संरक्षण इत्यादींचा समावेश आहे. इतक्या कमी खर्चात जर आपल्या धान्याचे महिनाभर संरक्षण होत असेल तर शेतकऱ्यांनी ही संधी सोडू नये.

गोदामातील साठवणूक फायदेशीर

१) ज्या काळात सर्व शेतकरी एकाच वेळेस पिकाची काढणी करतात, त्याच वेळेस बाजारात धान्याचे दर कमी असतात. परंतु तेथून पुढील ३ ते ६ महिन्यांत हे दर वाढल्याचे मागील कित्येक वर्षांपासून केलेल्या अभ्यासावरून व निरीक्षणांवरून लक्षात आलेले आहे. क्वचितच हे दर समान पातळीवर अथवा सरासरीपेक्षा कमी पातळीवर गेल्याचे दिसेल.

परंतु ही परिस्थिती प्रत्येक वेळेस येईलच असे नाही. घरात शेतीमाल ठेवणे धोक्याचे असते. घरांमध्ये शेतकरी धान्याची पोती ५ ते ६ थरांवर थर रचून ठेवतात. कीटक व बुरशीपासून संरक्षण होण्यासाठी विविध कीडनाशकांची फवारणी, गोळ्या या धान्याच्या जवळपास ठेवतात.

घरामध्ये लहान मुलांची वर्दळ असते. दुर्दैवाने अशा परिस्थितीत काही अप्रिय घटनासुद्धा घडू शकते. अशा विविध घटना घडलेल्या आपल्या निदर्शनास किंवा ऐकिवात यापूर्वी आल्या असतील. त्यामुळे शेतकऱ्यांनी आपला शेतीमाल घरात साठवून ठेवण्यापेक्षा गोदामात सुरक्षित ठेवून निश्‍चिंत व्हावे.

Agriculture Warehouse
Agriculture Warehouse : गोदाम उभारणीपुर्वी नियोजन आवश्यक

२) आवश्यकता असल्यास त्यावर शेतीमाल तारण कर्ज घेण्यास हरकत नाही. कारण ज्या वेळेस पिकाची काढणी सुरू होते, तेव्हा शेतीमालाचे बाजारभाव पडतात. त्याच वेळेस दिवाळी, बैलपोळा यासारखे सण असतात.

शेतकऱ्यांनी शेतीसाठी पीक कर्जाव्यतिरिक्त कृषी निविष्ठा विक्रेत्याकडून उधारीवर खते, कीटकनाशके व बियाणे घेतलेले असतात. यासाठी तत्काळ व वेळेवर पैशांची आवश्यकता असते. याकरिता वखार महामंडळाच्या गोदामासारखी सुरक्षित जागा कुठेही सापडणार नाही.

३) शेतकऱ्यांनी वखार महामंडळाच्या सुविधेचा फायदा घेणे आवश्यक आहे. वखार महामंडळाने गुणवत्तापूर्ण गोदामांची उभारणी करून शेतकऱ्यांना शेतीमाल साठवणुकीची उत्कृष्ट सुविधा उपलब्ध करून दिली असून, महाराष्ट्र राज्य सहकारी बँकेसोबत करार करून ९ टक्के व्याजदराने कर्जसुविधा सुद्धा उपलब्ध करून दिले आहे. हे कर्ज १ तास ते १ दिवसात उपलब्ध करून देण्यात येते. यापुढील काळात वखार महामंडळाच्या गोदामातूनच शेतीमाल विक्री करण्याचे महामंडळाचे भविष्यातील नियोजन असेल.

४) उंदीर व घुशींपासून संरक्षण होण्यासाठी वखार महामंडळाच्या गोदामाची उंची जमिनीपासून सुमारे ३ फुटांपर्यंत असते. गोदामाला पायऱ्या नसतात. त्यामुळे सहजासहजी उंदीर किंवा घुशी गोदामात प्रवेश करू शकत नाही.

चारही बाजूंना गोदामाच्या छतावरून आलेले पाणी पाइपच्या साह्याने जमिनीलगत व गोदामाच्या भिंतीलगत तयार केलेल्या गटर व्यवस्थेतून काढून दिले जाते, जेणेकरून गोदामाला ओलाव्यामुळे कोणतेही नुकसान होत नाही. पर्यायाने गोदामातील धान्यसुद्धा ओलाव्यापासून सुरक्षित राहते.

५) प्रत्येक पोत्यांच्या थराखाली गोदामातील जमिनीलगत ड्रेनेज किंवा प्लॅस्टिकचा कागद अंथरला जातो जेणेकरून दमट हवामान किंवा पावसाळ्यातील आर्द्र हवामानामुळे धान्यामध्ये जमिनीतील ओलावा शोषला जात नाही त्यामुळे सुद्धा धान्याचे संरक्षण होते.

६) गोदामाच्या छताला हवा खेळती राहण्यासाठी व प्रकाश गोदामात येण्यासाठी व्हेंटिलेटर्स बसविलेले असतात. गोदामातील खिडक्या समोरासमोर असल्याने हवा खेळती राहते. या खिडक्यांना जाळ्या बसविल्याने बाहेरील पक्षी गोदामात येऊन साठविलेल्या धान्याला नुकसान पोहोचवू शकत नाही.

७) महामंडळामार्फत गोदाम आणि गोदामातील शेतीमालाचा आग, चोरी व कर्मचाऱ्याकडून गैरवापर या तीन कारणांसाठी विम्याचे संरक्षण दिले जाते. आगी पासून संरक्षण व्हावे यासाठी आगरोधक यंत्रणासुद्धा गोदामात उपलब्ध आहे.

या सर्व सोईसुविधा व संरक्षणासाठी शेतकऱ्यांना फक्त एक पोत्यासाठी ७ रुपये पेक्षाही कमी पैसे खर्च करून मिळतात. त्यामुळे शेतकऱ्यांनी आपला शेतमाल वखार महामंडळाच्या गोदामातच ठेवण्यासाठी आग्रही असावे. यात शेतकरी कंपन्या व सहकारी संस्थांनी पुढाकार घेतल्यास नक्कीच या सुविधेचा फायदा शेतकऱ्याला मिळेल.

शेतीमाल तारण पावती

शेतकऱ्यांनी व्यापारी वृत्ती जोपासणे आवश्यक असून सद्यःस्थितीत वखार महामंडळाने शेतकऱ्यांसाठी बांधलेल्या गोदामांचा वापर शेतकऱ्यांसाठी मोठ्या प्रमाणावर न होता शेतकऱ्यांची कागदपत्रे वापरून व्यापारी वर्ग या सुविधेचा फायदा मोठ्या प्रमाणावर घेत असल्याचे चित्र दिसून येते.

१) शेतीमाल तारण योजनेची सुविधा कृषी उत्पन्न बाजार समिती तसेच विविध सहकारी संस्थांमार्फत सुद्धा देण्यात येते. धान्य किंवा शेतीमालाची पुरवठा साखळी लहान व शाश्वत करण्यासाठी गोदाम व्यवस्थेचा मोठा सहभाग यापुढील काळात राहणार आहे.

२) आपण गोदाम व्यवस्थेचा अभ्यास केला तर असे निदर्शनास येईल, की महाराष्ट्र राज्य वखार महामंडळाची गोदाम सुविधा ही कृषी उत्पन्न बाजार समितीच्या लगत किंवा आवारात उभारलेली आहे. कृषी उत्पन्न बाजार समित्यांचे गोदामसुद्धा बाजार आवारातच उभारलेले आहे. या सर्व व्यवस्थेचा उपयोग शेतकरीसुद्धा घेऊ शकतो, किंबहुना ही व्यवस्था शेतकऱ्यांसाठी आहे.

Agriculture Warehouse
Agriculture Warehouse : लक्षात घ्या गोदाम योजनेचे फायदे...

३) शेतकऱ्यांनी शेतीमाल शेतातून काढून वाळवून व स्वच्छ करून कृषी उत्पन्न बाजार समितीत विकावयास आणला, परंतु शेतातून शेतीमाल बाजारात आणताना जो बाजारभाव अपेक्षित होता तो दर मिळाला नाही तर तो शेतीमाल तत्काळ न विकता पुन्हा घरी घेऊन जाणे व्यवहार्य नाही.

त्याऐवजी शेतकऱ्यांनी तोच शेतीमाल कृषी उत्पन्न बाजार समितीच्या आवारातील महाराष्ट्र राज्य वखार महामंडळाच्या गोदामात प्राधान्याने ठेवावा किंवा कृषी उत्पन्न बाजार समितीच्या गोदामात ठेवावा. त्यावर आवश्यकता असल्यास ९ टक्के दराने तारण कर्ज घ्यावे किंवा महाराष्ट्र राज्य वखार महामंडळाने दिलेली वखार पावती किंवा गोदाम पावती कृषी उत्पन्न बाजार समितीकडे गहाण ठेवून त्यावर ६ टक्के दराने आवश्यकता असल्यास तारण कर्ज घ्यावे.

त्यानंतरच्या काळात पुढील ३ ते ६ महिने किंवा बाजारभावाच्या अंदाजानुसार शेतीमाल गोदामातच ठेऊन बाजारभावाच्या वाढीच्या कलानुसार शेतीमाल विक्रीचा निर्णय घेऊन योग्य दर मिळाल्यास सर्व शेतीमाल एकदम अथवा टप्प्याटप्प्याने विकावा.

४) शेतकरी, शेतकरी कंपनी व सहकारी संस्थांनी यापुढील काळात या प्रकारच्या पुरवठा साखळीचा अभ्यास करून त्याचा अवलंब करावा. शेतकरी प्रामुख्याने हमाली, वाहतूक खर्च व तारण कर्जावरील व्याज या प्रकारच्या खर्चाला घाबरून शेतमाल तारण योजनेकडे वळत नसल्याचे चित्र आहे.

राज्यात विदर्भ व मराठवाड्यात अनेक सहकारी पतसंस्था शेतमाल तारण क्षेत्रात उतरल्या आहेत. एक तासात त्यांच्या मार्फत साठवणूक केलेल्या शेतीमालावर अर्थसाह्य देण्यात येत असून, याचा व्याजदर सुमारे १४ ते १८ टक्क्यांपर्यंत आहे. एवढे असूनही त्यांना प्रचंड प्रतिसाद मिळत आहे.

त्यामुळे यापुढील काळात ज्या शेतकरी कंपन्यांनी व सहकारी संस्थांनी स्वत:ची गोदामे वेगवेगळ्या योजनांमधून उभारली असतील त्यांनी शेतीमाल तारण अथवा गोदाम पावती योजना व्यवसाय सुरू करावा. राज्यात महाराष्ट्र सहकार विकास महामंडळ याकरिता मार्गदर्शन करीत असून, आजपर्यंत मोठ्या प्रमाणावर महामंडळाकडे शेतकरी कंपन्या व सहकारी संस्था या गोदाम पावती अथवा शेतीमाल तारण व्यवसाय सुरू करण्यासाठी भेट देत आहे.

५) विविध कार्यकारी संस्थाकरीता महामंडळ जागतिक बँकेच्या मदतीने गोदाम पावती योजना विषयक स्मार्ट प्रकल्प राबवीत असून, त्यास उत्तम प्रतिसाद मिळत आहे. महामंडळाकडे या प्रकल्पात सहभाग घेण्यासाठी ३० जून २०२३ ही अंतिम मुदत आहे.

गोदाम पावती व्यवसाय उभारून त्यातून उत्पन्न मिळविण्याच्या अनुषंगाने राज्यातील विविध कार्यकारी सहकारी संस्था, शेतकरी कंपन्यांनी यात लवकरात लवकर सहभागी व्हावे.

संपर्क - प्रशांत चासकर, ९९७०३६४१३०, (शेतीमाल तारण व्यवस्थापन सेवा तज्ज्ञ, प्रकल्प अंमलबजावणी कक्ष, एमसीडीसी, स्मार्ट महाराष्ट्र सहकार विकास महामंडळ मर्या., पुणे)

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com