
जळगाव, ता. १४ ः तीन वर्षांच्या प्रतीक्षेनंतर प्रथमच नियमित कर्जफेड (Loan Repayment) करणाऱ्या शेतकऱ्यांना प्रोत्साहन योजनेचा लाभ राज्य शासन देणार आहे. पहिल्या टप्प्यात १६ हजारांपेक्षा अधिक शेतकऱ्यांना याचा लाभ होईल, अशी माहिती जिल्हा उपनिबंधक संतोष बिडवई यांनी दिली. त्यात जिल्हा बँकेने अपलोड केलेल्या शेतकरी यादीनुसार पहिल्या टप्प्यात १६ हजार ६७९ पात्र शेतकऱ्यांची यादी जळगाव जिल्हा सहकार विभागास उपलब्ध झाली आहे.
केंद्र सरकारप्रमाणेच तत्कालीन फडणवीस शासनाने २०१७-१८ मध्ये जळगाव जिल्ह्यातील नियमित पीककर्ज परतफेड करणाऱ्या सुमारे एक लाखाहून अधिक शेतकऱ्यांना १०५ कोटी रुपये प्रोत्साहन योजनेचा लाभ दिला होता.
२०१९ नंतरच्या सत्तारूढ महाविकास आघाडी शासनाने कर्जमाफीसह नियमित कर्जफेड करणाऱ्या शेतकऱ्यांना प्रोत्साहन योजनेचा लाभ देण्याचे जाहीर केले. अर्थसंकल्पात जाहीर करूनही प्रोत्साहन योजनेसाठी आर्थिक तरतूदच नसल्याने तीन वर्षांपासून राज्य सरकारने शेतकऱ्यांच्या तोंडाला प्रोत्साहनाची पानेच पुसली होती.
जून २०२२ अखेर राज्यात सत्तांतर होऊन शिंदे-फडणवीस सरकारने नियमित कर्जफेड करणाऱ्या शेतकऱ्यांना सप्टेंबरअखेर प्रोत्साहन योजनेंतर्गत लाभ देण्याचे जाहीर केले होते. शासन निर्देशानुसार जिल्हा बँकेकडून जिल्ह्यातील पात्र शेतकऱ्यांच्या याद्या अपलोड करण्यात आल्या होत्या. या याद्यांची पडताळणी सहकार विभागाकडून करण्यात आली असून, नियमित कर्जफेड करणाऱ्या २०१९ मधील पात्र शेतकऱ्यांना टप्प्याटप्प्याने प्रोत्साहन लाभ देण्यात येणार आहे.
चार लाख शेतकऱ्यांना बारावा हप्ता
केंद्र सरकारकडून प्रधानमंत्री शेतकरी सन्मान योजनेंतर्गत दोन हजार रुपये याप्रमाणे तीन समान हप्त्यांत वार्षिक सहा हजार रुपये नोंदणी झालेल्या लाभार्थी शेतकऱ्यांच्या संबंधित बँक खात्यावर डीबीटीद्वारे लाभ दिला जातो. त्यानुसार बारावा हप्ता लवकरच शेतकऱ्यांच्या खात्यात वर्ग केला जाणार आहे. जळगाव जिल्ह्यातील सुमारे चार लाख ७४ हजार शेतकऱ्यांची पीएम किसान योजनेंतर्गत नोंदणी झालेली आहे. त्यांपैकी अद्याप ३४ हजार शेतकऱ्यांची ई-केवायसी नोंदणी अद्ययावत करणे बाकी आहे.
तालुकानिहाय अनुदानास पात्र शेतकरी
तालुका शेतकरी
जळगाव १ हजार २९३
अमळनेर २ हजार २३८
भडगाव ९१५
भुसावळ ९४२
बोदवड ३०२
चाळीसगाव १ हजार ३३१
चोपडा १ हजार २८४
धरणगाव १ हजार ७८९
एरंडोल १ हजार ४३०
जामनेर ८११
मुक्ताईनगर १९३
पाचोरा १ हजार २८९
पारोळा १ हजार ५१४
रावेर ३४५
यावल ९८३
एकूण १६ हजार ६७९
Read the latest agriculture news in Marathi and watch Agriculture videos on Agrowon. Get the latest updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Agriculture Jugad, and Farmer Success Stories.
ताज्या घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.