बंदिस्त पाइपलाइनमधून नव्हे, डोळ्यांतूनच वाहते पाणी

शेतकऱ्यांची भावना; वरुड-मोर्शीत सिंचनाचा प्रयोग फसला
Water Scheme
Water SchemeAgrowon

अमरावती ः ‘‘पाटबंधारे विभागाचे अभियंताच नाही, तर ज्या कंपनीला कामाचे कंत्राट देण्यात आले त्यांना काम सुरू असताना आम्ही तांत्रिक चुकांबाबत वारंवार कल्पना देत होतो, परंतु त्यांनी आमचीच अक्‍कल काढत तुम्हाला काय समजते, अशा शब्दांत आम्हाला झिडकारले. आज त्यांच्या चुकांची शिक्षा आम्ही भोगत आहे. चार वर्षात बंदिस्त पाइपने नाही, पण डोळ्यांतून अनेकदा पाणी वाहिले,’’ अशा शब्दांत चुडामणी पाणी वापर संस्थेच्या शेतकऱ्यांनी आपल्या भावना व्यक्‍त केल्या.

अमरावती जिल्ह्यातील वरुड-मोर्शी हे तालुके संत्रा लागवडीसाठी पुढारलेले आहेत. राज्याच्या दीड लाखांपैकी एक लाख हेक्‍टर क्षेत्र या भागात आहे. त्यामुळेच याला विदर्भाचा कॅलिफोर्निया असेही म्हटले जाते. परंतु संत्रा फळबागांसाठी पाण्याचा उपसा होत गेला. परिणामी, पाणीपातळी खालावली. त्यामुळे हा भाग ड्रायझोन घोषित करून बोअरवेलवर बंदी घालण्यात आली. त्यामुळे शेतकऱ्यांना सिंचन प्रकल्प हाच एकमेव पर्याय बागा जगविण्यासाठी उरला आहे.

लाखो रुपयांचा खर्च करून शेतकऱ्यांनी सिंचन प्रकल्पातून आपल्या शिवारापर्यंत पाइपलाइनने पाणी आणले. तत्कालीन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या काळात नागठाणा-२ प्रकल्पावरून बंदिस्त सिंचन योजनेतून शेतीला पाण्याची घोषणा करण्यात आली. राज्यातील हा पहिला पथदर्शी प्रकल्प होता. त्यासाठी शेतकऱ्यांनी चुडामणी पाणी वापर संस्था २०१७ मध्ये स्थापन केली. त्यासाठी सहा कोटी रुपयांच्या या प्रस्तावित योजनेच्या कामासाठी ६ जून २०१७ मध्ये कार्यारंभ आदेश देण्यात आला. मात्र त्याच काळात प्रकल्प आराखड्यात अनेक प्रकारचे बदल करण्यात आले. परिणामी, प्रकल्पाची किंमत वाढली असताना जुन्याच दरात काम करण्यात आले.

काम करणाऱ्या कंपनीकडे पाटबंधारे विभागाने त्या वेळी सहा कोटी ८४ लाख रुपयांत किती काम होईल, अशी विचारणा केली. सुरुवातीला चार झोनमध्ये काम करण्याचे प्रस्तावित होते. झोन-४ हा लहान आहे. त्यामुळे या भागात पाणी आधी पोहोचल्यास इतर भागात सहज पोहोचेल, अशी भूमिका मांडत या कामाला सुरुवात करण्याचे ठरले. मात्र तांत्रिक बाबींकडे सातत्याने दुर्लक्ष करण्यात आले. त्यामुळे १८० आउटलेट तयार असताना ९० आउटलेटमध्ये पाणी पोहोचत नसल्याचे वास्तव खुद्द शासकीय अहवालात मांडण्यात आले आहे.

अपेक्षित पाण्याचा प्रवाहच नाही

३० टक्‍के आउटलेटमध्ये अपेक्षित पाण्याचा प्रवाह नाही. केवळ २० टक्‍के पाइपलाइनमधूनच योग्य दाबाने पाणीपुरवठा होत असल्याचे शेतकरी सांगतात. साडेपाच ते सहा लिटर प्रतिसेकंद पाण्याचा विसर्ग होणे अपेक्षित आहे. परंतु तो मिळतच नाही. यातून ५५० शेतकरी या प्रकल्पांतर्गत लाभार्थी होतील. ७५० हेक्‍टर क्षेत्र बारमाही सिंचनाखाली येणार आहे.

असे आहेत वितरण टॅंक

झोन-१ मध्ये सात

झोन-२ मध्ये सहा

झोन-३ मध्ये ४

झोन-४ मध्ये ४

पाइपलाइनची लेव्हल चुकल्यास पाणी चढत नाही. त्यासाठी पाइपलाइनसाठीचे खोदकाम योग्य प्रमाणात आणि समान उंचीवर होणे अपेक्षित होते. परंतु त्याकडे दुर्लक्ष करण्यात आले. हायड्रॉलिक ग्रॅडीयंट लाइन (पाणी सोडल्यानंतर कोणत्या लेव्हलपर्यंत चढेल), डायनामिक गॅड्रीयंट लाइन (बंद अवस्थेत पाणी कोणत्या लेव्हलपर्यंत चढेल ही दर्शविणारी), योग्य ठिकाणी एअर व्हॉल्व्ह नसणे, पाइपलाइन टाकताना एकाच पोझिशनमध्ये न टाकणे, डिझाइन चुकीचे अशा अनेक तांत्रिक चुका या प्रकल्पात आहेत.

हा प्रकल्प पूर्णत्वास गेल्यास या भागात हरितक्रांती घडेल. परंतु कंपनी आणि पाटबंधारे विभागाच्या उदासीनतेचा फटका शेतकऱ्यांना बसत आहे. या प्रकरणी तारांकित प्रश्‍न उपस्थित करून शेतकऱ्यांना न्याय दिला जाईल.
देवेंद्र भुयार, आमदार, वरुड-मोर्शी मतदार संघ

Read the latest agriculture news in Marathi and watch Agriculture videos on Agrowon. Get the latest updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Agriculture Jugad, and Farmer Success Stories.

ताज्या घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
www.agrowon.com