गहू निर्यातः तुला न मला घाल कुत्र्याला...

आजघडीला बंदरांवर किमान १७ लाख टन गहू पडून आहे. आता लवकरच पाऊस सुरू होण्याची शक्यता आहे. त्यामुळे हा गहू पावसात भिजून खराब होण्याची भीती आहे.
गहू निर्यातः तुला न मला घाल कुत्र्याला...
Wheat Export BanAgrowon

निर्यातबंदीच्या (Export Ban) निर्णयानंतर विविध बंदरांवर अडकून पडलेल्या गव्हाचा (Wheat Export Ban) प्रश्न अजूनही सुटलेला नाही. केंद्र सरकारने १३ एप्रिल रोजी गहू निर्यातबंदीचा निर्णय जाहीर केला. त्याआधी ज्यांचे निर्यातीचे करार झालेले आहेत ते व्यवहार पूर्ण केले जातील, असे सरकारने स्पष्ट केले होते. त्यानुसार निर्यातबंदीनंतर सुमारे ४ लाख ६९ हजार टन गहू निर्यातीला परवानगी देण्यात आली. परंतु आजघडीला बंदरांवर किमान १७ लाख टन गहू पडून आहे. आता लवकरच पाऊस (Rainy Season) सुरू होण्याची शक्यता आहे. त्यामुळे हा गहू पावसात भिजून खराब होण्याची भीती आहे.

निर्यातबंदीमुळे मे महिन्यातील गहू निर्यात ११.३ लाख टनावर घसरली. एप्रिल महिन्यात १४.६ लाख टन इतकी विक्रमी गहू निर्यात झाली होती. भारत हा जगातील दुसऱ्या क्रमांकाचा गहू उत्पादक देश आहे. उष्णतेच्या लाटेमुळे देशातील उत्पादन मोठ्या प्रमाणावर घटल्यामुळे आणि गव्हाच्या किंमती वाढल्याने सरकारने १३ मे रोजी गव्हावर निर्यातबंदी लागू केली. पण ज्या व्यवहारांमध्ये लेटर ऑफ क्रेडीट (एलसी) जारी करण्यात आले आहेत त्यांना या बंदीतून वगळण्यात आले.

तसेच भारत सरकारने ज्या देशांना अन्नसुरक्षेसाठी गहू पुरवण्याची परवानगी दिली आहे, त्यांना गहू निर्यात करण्यास मुभा देण्यात आली होती. परंतु अजूनही किमान १७ लाख टन गहू वेगवेगळ्या बंदरांवर अडकून पडला आहे, अशी महिती सूत्रांनी दिली.

यंदा सुरूवातीला केंद्र सरकारने गहू निर्यातीसाठी प्रोत्साहन दिल्यामुळे मोठ्या प्रमाणावर गहू निर्यातीचे करार झाले. गेल्या वर्षी ७२ लाख टन गहू निर्यात करण्यात आला होता. यंदा जागतिक बाजारातील गव्हाची टंचाई आणि दरातील तेजी लक्षात घेता निर्यात ८० ते १०० लाख टन इतकी राहील, असा अंदाज होता. परंतु देशातील अन्नसुरक्षेचे कारण सांगत केंद्र सरकारने गहू निर्यातीवर बंदीच घातली.

गुजरातमधील कांडला आणि मुंद्रा या दोन बंदरांवरच सगळ्यात जास्त गव्हाचा साठा अडकून पडला आहे. या दोन ठिकाणी मिळून एकूण १३ लाख टन गहू आहे. सरकारने अन्नसुरक्षा अबाधित राखण्यासाठी गव्हाच्या निर्यातीवर बंदी घातली. परंतु जर बंदरांवर अडकून पडलेला गहू पावसामुळे भिजून गेला तर त्यात कोणाचाच फायदा होणार नाही, असे निर्यातदारांनी सांगितले.

हा गहू बंदरांमधून उचलून परत देशांतर्गत बाजारात विक्रीसाठी नेणे आर्थिकदृष्ट्या व्यवहार्य नाही. कारण गहू लोडिंग आणि वाहतुकीचा खर्च व्यापाऱ्यांना सोसावा लागेल. भारत सरकारने अपवाद म्हणून ज्या देशांना सरकारी पातळीवर निर्यात करण्यास परवानगी दिली आहे, त्यांच्यासाठी बंदरांवर अडकून पडलेला गहू वापरावा, अशी निर्यातीशी संबंधित डिलर्सची मागणी आहे. विविध देशांनी भारताकडे अन्नसुरक्षेसाठी गव्हाची मागणी केली आहे. त्याचे प्रमाण १५ लाख टनाच्या घरात आहे.

Read the latest agriculture news in Marathi and watch Agriculture videos on Agrowon. Get the latest updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Agriculture Jugad, and Farmer Success Stories.

ताज्या घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
www.agrowon.com