ऑनलाइन विक्रीसाठी अपेडा प्लॅटफार्म उभारणार-विनोद कुमार विद्यार्थी

भारतात कृषी क्षेत्राची (Agriculture) कामगिरी दमदार राहिली. पंतप्रधान नरेंद्र मोदी (Narendra Modi) यांनी दिलेले प्रोत्साहन आणि अपेडाने कृषिविषयक उपक्रमांमध्ये घेतलेला पुढाकार याला त्याचे श्रेय जाते.
APEDA
APEDAAgrowon

शेतीमालाच्या निर्यातीसंदर्भात अपेडाची भूमिका अत्यंत मोलाची आहे. देशातील १३८ कोटी नागरिकांची गरज भागविल्यानंतर उर्वरित शेतीमालाच्या निर्यातीवर भर देण्यात आला आहे. त्यासाठी अनेक प्रोत्साहनपर योजनांची अंमलबजावणी अपेडा करत आहे. भारतीय उत्पादनांची माहिती सुलभरीत्या देश आणि जागतिक पातळीवर उपलब्ध व्हावी, यासाठी अपेडा प्रयत्न करत असते. तसेच खासगी कंपन्यांप्रमाणे अपेडाही आता ऑनलाईन विक्री प्लॅटफार्म उपलब्ध करून देणार आहे. अपेडाच्या उपक्रमांविषयी महाव्यवस्थापक विनोद कुमार विद्यार्थी यांच्याशी साधलेला हा संवाद.

शेतीमालाच्या निर्यातीत अपेडाची भूमिका काय आहे?

शेतीमालाच्या निर्यातीला प्रोत्साहन आणि चालना देण्यासाठी अपेडाचं काम विविध स्तरांवर चालू आहे. अपेडा पुढील १६ श्रेणींतील उत्पादनांच्या निर्यातीसाठी (Agriculture Export) प्रयत्न करते ः फळे-भाजीपाला, मांस-मांस उत्पादने, डेअरी उत्पादने, बिस्कीट-बेकरी उत्पादने, मध-गूळ व साखर उत्पादने, कोका-कोका उत्पादने- सर्व प्रकारचे चॉकलेट्स, अल्कोहोलिक व नॉन अल्कोहोलिक पेये, तृणधान्य-तृणधान्य उत्पादने, भुईमूग-शेंगदाणे-वॉलनट, लोणची-पापड-चटण्या, गवारगम, फुलशेती उत्पादने, औषधी वनस्पती, राइस ब्रान डीओसी, ग्रीन पेपर आदींचा त्यात समावेश आहे. भारताची कृषी निर्यातीची स्थिती चांगली आहे.

जागतिक पातळीवर कृषी क्षेत्रात मोठे चढ-उतार दिसून येत आहेत. कोरोनाकाळात इतर सारे उद्योग-व्यवसाय ठप्प झाले होते. त्या वेळी भारतीय शेतकरी मात्र राबत होते. अर्थव्यवस्थेला कृषी क्षेत्रानं तारलं. परंतु त्यावेळी जगातील इतर देशांत शेतीकामांवर प्रतिकूल परिणाम झाला होता. त्यामुळे अनेक देशांत पिकांची उत्पादकता घटली.

भारतात मात्र कृषी क्षेत्राची (Agriculture) कामगिरी दमदार राहिली. पंतप्रधान नरेंद्र मोदी (Narendra Modi) यांनी दिलेले प्रोत्साहन आणि अपेडाने कृषिविषयक उपक्रमांमध्ये घेतलेला पुढाकार याला त्याचे श्रेय जाते. आज जीडीपीमध्ये कृषी क्षेत्राचा वाटा २० टक्क्यांहून अधिक आहे. खूप काळानंतर हे घडलं आहे.

भौगोलिक मानांकन असलेल्या पिकांच्या निर्यातीबाबत काय सांगाल?

- आतापर्यंत कृषी क्षेत्रातील दीडशे उत्पादनांना भौगोलिक मानांकन (Geographical Indication) मिळालं आहे. त्यातील १२३ उत्पादने अपेडाने अधिसूचित केले आहेत. या उत्पादनांच्या निर्यातीसाठी अपेडा कार्यशाळांच्या माध्यमातून जागृती करीत आहे. ज्या देशांमध्ये कृषी प्रदर्शन असेल, तिथे भारतीय उत्पादनांचे स्टॉल्स लावण्यावर भर देण्यात येतो. देशात आंब्याच्या १२ वाणांना भौगोलिक मानांकन आहे. यंदाच्या हंगामात युरोपियन देश आणि इतर देशांतील भारतीय दूतावासांना हे आंबे पाठवण्यात आले. आंब्याला जागतिक बाजारपेठ मिळावी, यासाठी अपेडा प्रयत्नशील आहे.

वनस्पतिजन्य अन्नपदार्थांबाबत अपेडाची भूमिका काय आहे?

- जागतिक स्तरावर सुरक्षित अन्नाच्या बाबतीत जागरुकता वाढीस लागली आहे. आरोग्यविषयक तक्रारी वाढत असल्याने हे घडत आहे. त्यामुळे भारतातच नाही तर जगभरात वनस्पतिजन्य अन्नपदार्थांना (प्लॅंट बेस्ड फूड) मागणी आहे. त्यामुळे या संकल्पनेवर भारतात देखील काम व्हावे, असा आमचा प्रयत्न आहे. देशात प्रोटीन क्‍लस्टर बनविण्यासाठी अपेडा सरकारला शिफारस करणार आहे. शेतीमालाचे मूल्यवर्धन व्हावे, हा त्यामागचा उद्देश आहे.

केंद्र सरकार देखील अन्न साखळीतील (Food Chain) या नव्या घडामोडींबद्दल जागरूक आहे. या माध्यमातून डाळींचे मूल्यवर्धन करण्याची मोठी संधी आहे. त्याळे कडधान्य उत्पादक शेतकऱ्यांचं हित साधलं जाईल. जगभरात मांसाहाराविषयी नकारात्मकता वाढत आहे. जनावरांपासून मानवाला होणाऱ्या आजारांबद्दलही अनेकांना काळजी वाटतेय. त्यांना वनस्पतीजन्य अन्नपदार्थाच्या माध्यमातून प्रोटिनयुक्त पर्याय उपलब्ध करुन देता येतील.

मांस न खाता त्यासारखाच फ्लेवर व प्रोटीन त्यातून मिळेल. व्हेगन उत्पादनांना अमेरिका, युरोपात निर्यातीच्या (Export) अनेक संधी आहेत. तिथे शाकाहाराकडे वळणाऱ्या लोकांची संख्या लक्षणीय आहे. काम, श्रम करताना जितक्‍या कॅलरी जळतात, त्या भरून निघाल्या पाहिजेत. तेवढ्या कॅलरी अन्नातून मिळाल्या पाहिजेत. अन्‍यथा, आजाराला आमंत्रण मिळते. आरोग्य चांगलं राहण्यासाठी पोषणयुक्त आहार अत्यंत महत्त्वाचा आहे.

जैविक शेतीमालाविषयी काय सांगाल?

मुगलांच्या सत्ताकाळात देशाची अर्थव्यवस्था कृषी क्षेत्रावर अवलंबून होती. त्या वेळी अर्थव्यवस्थेची प्रकृती चांगली होती. त्यानंतर आलेल्या इंग्रजांनी एकल पीक पध्दतीला प्रोत्साहन दिले. त्यामध्ये त्यांच्यासाठी गरजेच्या असलेल्या कापसाचा विस्तार करण्यात आला. इंग्रजांच्या धोरणामुळे देशाची अर्थव्यवस्था डळमळीत झाली. इंग्रजांनी देश सोडला तेव्हा देशाचा जीडीपी (GDP) २.५० टक्के इतका अत्यल्प होता. म्हणजे खऱ्या अर्थाने देशाचं शोषण इंग्रजांनी केलं.

आपल्या देशात केवळ पिकांचीच नव्हे तर मातीचीही प्रचंड विविधता आहे. परंतु गेल्या काही काळात रसायनांचा अतिरेकी वापर मातीच्या ऱ्हासाचं कारण बनला आहे. त्यामुळे मातीची सुपीकताच धोक्‍यात आली. त्यामुळे पूर्वीसारख्याच वैदीक तसेच जनावरांवर आधारित शेतीला प्रोत्साहन देण्याची गरज आहे. त्यातून सेंद्रिय शेतीमालाच्या (Organic Produce) उत्पादनाला चालना मिळेल. जैविक निविष्ठांचे अनेक फायदे आहेत.

नायट्रोजन, फॉस्फरस या घटकांना या निविष्ठा सावकाश रिलीज (मुक्‍त) करतात. रासायनिक घटकांचा वापर केला तर त्यातील घटक एकमद सक्रिय होतात आणि पिकाला पाण्याची तत्काळ गरज भासते. नाही तर पीक जळून जाते. माती ही बायोलॉजिक मशिन नाही; त्यात सूक्ष्म अन्नजीव अधिवास करतात. परिणामी ती सजीव आहे. त्यामुळे तिची काळजी घेण्याची गरज आहे. या सर्व बाबींचा विचार करून केंद्र सरकार जैविक शेतीला प्रोत्साहन देत आहे.

अपेडाच्या प्रस्तावित योजना काय आहेत?

- निर्यातक्षम शेतीमालाच्या उत्पादनाला प्रोत्साहन देण्यासाठी अपेडा अनुदानात्मक योजना राबवते. त्यामध्ये पॅक हाउस आणि इतर घटकांसाठी दोन कोटी रुपयांपर्यंतचे अनुदान दिले जाते. प्रक्रिया उद्योगाची उभारणी करणाऱ्या उद्योजकांना यंत्रसामग्रीसाठी दोन कोटी रुपये, प्रयोगशाळेसाठी एक कोटी रूपये, प्रयोगशाळा अपग्रेड करण्यासाठी ५० लाख रुपये अनुदान दिले जाते. त्यासोबतच देशांतर्गत बाजारपेठेत विविध उत्पादनांचे प्रमोशन करण्यासाठीही अपेडा अनुदान देते. शेतकऱ्यांनी ट्रेसनेटवर नोंदणी केल्यास त्यांना जागतिक स्तरावर बाजारपेठ उपलब्ध होईल. त्यावरील माहितीचा उपयोग देशांतर्गंत बाजारपेठेसाठीही होईल. या योजनांचा लाभ घेण्यासाठी दर्जेदार व निर्यातक्षम उत्पादन घेणाऱ्या शेतकऱ्यांनी पुढे आले पाहिजे.

ऑनलाइन विक्रीसाठी काही करण्याचे नियोजन आहे का?

- खासगी कंपन्यांकडून अनेक उत्पादनांच्या विक्रीसाठी ऑनलाइन प्लॅटफार्म उपलब्ध करून देण्यात आले आहेत. त्याची हाताळणी सुलभ असते. त्यामुळे कोणालाही त्या प्लॅटफॉर्मवरून सहजपणे खरेदी करता येते. अशाच प्रकारचा ऑनलाइन प्लॅटफार्म अपेडा लवकरच उपलब्ध करुन देणार आहे. त्याचे काम अंतिम टप्प्यात आहे. बांबूपासून तयार केलेल्या वस्तू तसेच इतर शेती उत्पादनांपासून तयार केलेल्या वस्तू या प्लॅटफार्मवर उपलब्ध करून दिल्या जातील. या वस्तू तयार करण्याचे प्रशिक्षणदेखील अपेडाकडून दिले जाईल. ऑनलाइन प्लॅटफॉर्ममुळे गावखेड्यातील युवकांना रोजगार मिळेल. या प्लॅटफॉर्मला ग्राहकांचा चांगला प्रतिसाद मिळेल, अशी अपेक्षा आहे.

संत्रा निर्यातीबद्दल अपेडाची भूमिका काय आहे?

महाराष्ट्रात सुमारे दीड लाख हेक्टरवर संत्र्याचं पीक घेतलं जातं. त्यापैकी एक लाख हेक्टरवरील लागवड ही एकट्या विदर्भात आहे. त्यामुळे संत्रा हे विदर्भाचं मुख्य फळपीक मानलं जातं. केंद्रीय मंत्री नितीन गडकरी (Nitin Gadkari) यांनी संत्रा निर्यातीसाठी वारंवार पाठपुरावा केला. त्याला प्रतिसाद देत अपेडाकडूनही या भागात संत्रा निर्यातीसाठी सुविधा पुरविण्यावर भर देण्यात आला आहे. त्यासाठी संत्रा क्लस्टर तयार करण्यात आलं आहे. संत्रा उत्पादक संघाने आता पुढं आलं पाहिजे.

Read the latest agriculture news in Marathi and watch Agriculture videos on Agrowon. Get the latest updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Agriculture Jugad, and Farmer Success Stories.

ताज्या घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
www.agrowon.com