केरळ कृषी विद्यापिठाला ड्रोन तंत्रज्ञानासाठी ६५ लाखांचा निधी मंजूर

केरळ कृषी विद्यापीठाने (Keral Agriculture University) ड्रोन आधारित तंत्रज्ञानावर संशोधन व प्रात्यक्षिकांचे काम हाती घेतले आहे.
Agriculture University
Agriculture UniversityAgrowon

देशभरातील शेतकऱ्यांमध्ये सध्या ड्रोनची (Drone In Agriculture) मोठी क्रेझ आहे. शेतीच्या अनेक कामांसाठी ड्रोनचा वापर करता येतो. विशेषतः पिकावर फवारणी करण्यासाठी त्याचा मोठा उपयोग होतो. केरळ कृषी विद्यापीठाने (Keral Agriculture University) ड्रोन आधारित तंत्रज्ञानावर संशोधन व प्रात्यक्षिकांचे काम हाती घेतले आहे.

कृषी विभागाने त्यासाठी विद्यापीठाला ६५ लाख रूपयांचा निधी मंजूर केला आहे. ड्रोन आधारित तंत्रज्ञानावर संशोधन करण्यासाठी ३५ लाख रुपयांची तरतूद करण्यात आली आहे, तर उर्वरित ३० लाख रुपयांचा निधी केरळमधील वायनाड, पलक्कड, कोल्लम आणि कोट्टायम येथील कृषी विज्ञान केंद्रांच्या माध्यमातून पिक प्रात्यक्षिके घेण्यासाठी राखून ठेवण्यात आला आहे.

शेतीमध्ये दिवसेंदिवस ड्रोन तंत्रज्ञानाचा वापर वाढत आहेत. केरळ कृषी विद्यापीठाने २०१९ साली ड्रोनच्या विविध चाचण्या घेउन फवारणीचे निकष निश्चित केले. सुरुवातीला भातावरिल जैविक नियंत्रण आणि अन्नद्रव्यांच्या चाचण्या घेण्यात आल्या.

जैविक नियंत्रणासाठी स्यूडोमोनस फ्लोरोसन्स या जैविक घटकाचा आणि संपूर्णा या पाण्यात विरघळणाऱ्या सुक्ष्मअन्नद्रव्याचा वापर करण्यात आला. विद्यापीठाने २०२० पासून विविध पिकांमध्ये फवारणीच्या चाचण्या सुरू केल्या. नागरी उड्डाण मंत्रालयाने केलेल्या मार्गदर्शक सूचनांचे पालन करण्यात आले. विद्यापीठाने प्रामुख्याने भात पिकासाठी चाचण्या घेण्यावर भर दिला.

राज्यातील कृषि विज्ञान केंद्रांनी प्रात्यक्षिकांची जबाबदारी पार पाडली. प्रत्यक्ष शेतावर जाऊन ही प्रात्यक्षिके घेण्यात आली. ड्रोनद्वारे संपूर्णा या सुक्ष्मअन्नद्रव्याची फवारणी करण्यात आली. त्यामुळे उत्पादनात २०-२२ टक्के वाढ झाल्याचे दिसून आले. तसेच पल्लकड जिल्ह्यातील भातशेतीमध्ये राईसबग किडीच्या नियंत्रणासाठी बेव्हेरिया बॅसियाना या जैविक बुरशीची ड्रोनद्वारे फवारणी करण्यात आली. त्यामुळे किडीची संख्या ८० टक्क्याने घटली.

ड्रोनमुळे फवारणीचा वेग वाढतो. मजुरांकडून केलेल्या फवारणीपेक्षा ड्रोनद्वारे २४ पट अधिक वेगाने फवारणी करता येते. तसेच मजुरीवरील खर्चातही बचत होते. आतापर्यंत केरळमधील सुमारे १६,५८० एकर क्षेत्रावरील भात शेतीमध्ये ड्रोनचा वापर करण्यात आला. ड्रोनद्वारे जैविक घटकांची आणि पाण्यात विरघळणाऱ्या सुक्ष्मअन्नद्रव्यांची फवारणी करण्यात आली. गेल्या वर्षी त्रिशुर जिल्ह्यामध्ये केरळ कृषी विद्यापीठाने ड्रोनद्वारे फवारणी करुन भातावरील करपा रोगावर नियंत्रण मिळवले होते.

केरळ कृषी विद्यापीठाच्या या कामाची कृषी विभागाने दखल घेतली. ड्रोन आधारित तंत्रज्ञानावर संशोधन आणि प्रात्यक्षिकासाठी निधी देण्यात आला आहे. ``या निधीमुळे ड्रोनच्या क्षेत्रात केरळ कृषी विद्यापीठाच्या संशोधन आणि विस्तार क्षमतेला नव्याने चालना मिळेल,`` असे कुलगुरू आर. चंद्रबाबू म्हणाले. या निधीचा उपयोग अननस, केळी, आले, हळद आणि टॅपिओका सारख्या पिकांमध्ये ड्रोनच्या चाचण्या वाढविण्यासाठी केला जाईल, असे त्यांनी सांगितले.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com