सेंद्रिय उत्पादनासाठी ‘जैविक भारत’ लोगो बंधनकारक

सेंद्रिय उत्पादनासाठी ‘जैविक भारत’ लोगो बंधनकारक
सेंद्रिय उत्पादनासाठी ‘जैविक भारत’ लोगो बंधनकारक

सध्या मांसाहारी आणि शाकाहारी अन्नपदार्थांच्या पॅकेटवर अनुक्रमे लाल आणि हिरवा ठिपका हे चिन्ह असणे बंधनकारक आहे. मात्र, त्यातून तो पदार्थ सेंद्रिय आहे की नाही, ते समजत नाही. ते स्पष्टपणे समजण्यासाठी भारतीय अन्न सुरक्षा आणि प्रमाणीकरण प्राधिकरण (FSSAI) या संस्थेने जैविक भारत हा लोगो तयार केला आहे. यापुढे सेंद्रिय उत्पादनाच्या विक्रीसाठी हा लोगो मिळवणे व छापणे बंधनकारक असणार आहे. आरोग्याविषयी जागरुकता वाढत असल्याने ग्राहकांची सेंद्रिय उत्पादनांना मागणीही वाढत आहे. मात्र, सेंद्रिय उत्पादने वेगळी लक्षात येण्यासाठी कोणतीही तरतूद नसल्याने ग्राहकांची अडचण होते. हे टाळण्यासाठी भारतीय शासनाने पुढाकार घेतला असून, भारतीय अन्न सुरक्षा आणि प्रमाणीकरण प्राधिकरण (एफएसएसएआय) या अधिकृत संस्थेने त्याचा खास लोगो तयार केला आहे. येथून पुढे सेंद्रिय पदार्थांच्या विक्रीसाठी हा लोगो बंधनकारक आहे. या नियमाचे उल्लंघन करणाऱ्या उत्पादक, वितरकांचा परवाना आणि नोंदणी रद्द करण्यात येईल. बाजारपेठेमध्ये खोटी सेंद्रिय उत्पादने असल्याच्या तक्रारी सातत्याने येत असल्याने संस्थेने हा निर्णय घेतला आहे.

हा लोगो मिळवण्यासाठी सेंद्रिय शेतीचे सर्व निकष पूर्ण करणे आवश्यक आहे. संस्थेचे उपसंचालक व्ही. के. पांचाल यांनी सांगितले, की सेंद्रिय उत्पादनांच्या प्रमाणिकरण करणाऱ्या ‘नॅशनल प्रोग्रॅम फॉर ऑरगॅनिक प्रोडक्शन’ (एनपीओपी) आणि ‘पार्टिसिपेटरी गॅरंटी सिस्टिम फॉर इंडिया’ (पीजीएस -इंडिया) या दोन यंत्रणा आहेत. त्या उत्पादक आणि वितरकांना प्रमाणपत्र देतात. या नव्या लोगोमुळे ग्राहकांना सेंद्रिय उत्पादन ओळखणे सोपे होणार आहे.

सेंद्रिय उत्पादनांची विक्री करणाऱ्या व्यक्ती किंवा कंपनीला या दोन्ही संस्थांकडून प्रमाणपत्र मिळवावे लागेल. त्यानंतर हे प्रमाणपत्र एफएसएसएआयकडे देऊन लोगो उत्पादनावर छापण्याची परवानगी मिळवावी लागेल. पॅकेजिंग व लेबलिंगच्या २०११ च्या नियमानुसार अन्य बाबीही नोंदवणे बंधनकारक असेल. सेंद्रिय उत्पादनांची विक्री या लोगोशिवाय करणाऱ्या उत्पादकांची तक्रार ग्राहकांना एफएसएसएआय संस्थेकडे करता येईल. असा असेल लोगो हिरव्या वर्तुळामध्ये झाडाचे पान व त्यावर बरोबरची खूण असे या लोगोचे स्वरुप आहे. त्यातील वर्तुळ हे जागतिक निर्मळ चांगुलपणाचे, तर झाडाचे पान हे निसर्गाचे आणि बरोबरचे चिन्ह हे संस्थेने प्रमाणित केल्याचे सुचवत असल्याचे एफएसएसएआयच्या प्रवक्त्यांनी सांगितले. शेतीपद्धतीमध्ये हे बदल अपेक्षित

 • शेतजमिनीचे रासायनिक कीटकनाशके आणि तणनाशक मुक्त अशा सेंद्रिय शेती पद्धतीचा अवलंब करणे अत्यंत आवश्यक.
 • शेतीमध्ये वापरले जाणारा प्रत्येक घटक किंवा निविष्ठा या नैसर्गिक असाव्यात.
 • जनुकीय सुधारित निविष्ठा किंवा विकिरण तंत्राचा वापर केलेले घटक वापरू नयेत.
 • भौतिक, जैविक आणि यांत्रिक घटकांच्या एकात्मिक वापर संपूर्ण शेतीमध्ये आवश्यक.
 • शेजारच्या किंवा अन्य कोणत्याही प्रकारे प्रदूषण होण्याची शक्यता नसावी.
 • शाश्वत शेती पद्धतीचा शेतीमध्ये वापर करणे बंधनकारक.
 • Read the latest agriculture news in Marathi and watch Agriculture videos on Agrowon. Get the latest updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Agriculture Jugad, and Farmer Success Stories.

  ताज्या घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

  Related Stories

  No stories found.
  Agrowon
  www.agrowon.com