चावा घेणाऱ्या माश्यांना आकर्षित करणारे चिकटसापळे विकसित

चावा घेऊन रक्त शोषणाऱ्या माश्यांना आकर्षित करणारे अधिक कार्यक्षम असे चिकट सापळे अमेरिकी कृषी सेवेतील कीटकशास्त्रज्ञाने विकसित केले आहेत. माश्यांच्या चाव्यामुळे जनावरांमध्ये निर्माण होणारा ताण कमी होईल. तसेच माश्यांद्वारे होणाऱ्या रोगाच्या प्रसारालाही बऱ्यापैकी आळा बसू शकेल.
चावा घेणाऱ्या माश्यांना आकर्षित करणारे चिकटसापळे विकसित
चावा घेणाऱ्या माश्यांना आकर्षित करणारे चिकटसापळे विकसित

पशुपालनामध्ये चावा घेणाऱ्या आणि रक्त शोषणाऱ्या माश्यांमुळे जनावरांमध्ये मोठ्या प्रमाणात ताण निर्माण होतो. अतिताणाच्या स्थितीमध्ये जनावरांचे वजन कमी राहणे, दूध उत्पादनामध्ये घट आणि अन्य काही विपरीत परिणाम दिसून येतात. अशा माश्यांपैकी स्टेबल फ्लाइज या माश्या अधिक नुकसानकारक असून, वार्षिक सुमारे २ अब्ज डॉलरइतक्या मूल्याचे नुकसान करतात. या माश्यांच्या नियंत्रणासाठी रासायनिकसह विविध पद्धतीचा अवलंब केला जात असला, तरी पशुपालनामध्ये तीव्र किंवा अधिक विषारी रसायनांचा वापर करण्यावर अनेक मर्यादा व बंधने येतात. उर्वरित कार्यक्षम नियंत्रण पर्याय फारच अल्प राहतात. त्यातून या माश्यांचे नियंत्रण करण्यामध्ये अनेक अडचणी येत असल्याची माहिती अमेरिकी कृषी संशोधन सेवेतील कीटकशास्त्रज्ञ जेरी झू यांनी दिली. या रक्तशोषक माश्यांचा सामना करण्यासाठी झू आणि त्यांच्या लिंकन येथील अॅग्रोइकोसिस्टिम मॅनेजमेंट संशोधन केंद्रातील गटाने वेगवेगळ्या पर्यायांचा अभ्यास केला. अभ्यासातून त्यांनी माश्यांना आकर्षित करण्याच्या काही नावीन्यपूर्ण पद्धती शोधल्या आहेत. ही आकर्षके एका उद्योग भागीदाराच्या साह्याने अत्यंत चिकट अशा पृष्ठभागावर लावून त्यापासून चिकट सापळे विकसित केले आहेत. या आधुनिक चिकट पद्धतीमुळे सापळ्याची कार्यक्षमता दुपटीने वाढली असल्याचा दावा झू करतात.  

चिकट सापळ्याचा वापर किडींना पकडण्यासाठी करणे हे नवीन नसले तरी पारंपरिक सापळ्यांमध्ये केवळ रंगाद्वारे कीटकांना आकर्षित केले जाते. विशिष्ट माश्यांना आकर्षित करण्याची रसायने आम्ही विकसित केली असून, त्यांचा वापर चिकट सापळ्यामध्ये केला आहे. या रसायनांना सेमियोकेमिकल्स किंवा सिग्नल केमिकल्स म्हणून ओळखले जाते. - जेरी झू, संशोधक आणि कीटकशास्त्रज्ञ

फायदे ः

  • स्टेबल माश्यांना आकर्षित करणारी रसायने निसर्गतः पिकांचे अवशेष, काढणीपश्‍चात शिल्लक राहणारे घटक किंवा गायींच्या पचनसंस्था आणि शेण व खतांमध्ये यामध्ये असतात. या गंधांकडे आकर्षित होऊन अंडी घालण्यासाठी किंवा खाद्यासाठी माश्या तिकडे धाव घेतात. नव्याने विकसित केलेल्या सापळ्यामध्ये या रसायनांचा गंध अधिक तीव्र असल्याने माश्या मूळ जनावरे किंवा त्यांच्या अवशेषापेक्षा या सापळ्याकडेच अधिक आकर्षित होतात. त्यावरील चिकट द्रव्यांना चिकटतात. त्यामुळे माश्यांमुळे पसरणाऱ्या वेगवेगळ्या रोगांना (उदा. ट्रायपॅनोसोमायसिस, बेस्नोईटिओसिस आणि लंपी स्कीन डिसीझ) आळा बसण्यास मदत होते.
  • या चिकटसापळ्यामुळे माश्यांचा चावा आणि त्याचा जनावरांमध्ये निर्माण होणारा ताण सुमारे ८० टक्क्यांपर्यंत कमी होऊ शकतो. त्याच प्रमाणे -अन्य कोणत्याही माश्या किंवा कीटक गोठ्यामध्ये आल्यास तेही चिकट सापळ्याला चिकटणार आहेत. त्यामुळे गोठ्यामध्ये कीटकांचे आगमन आणि सर्वेक्षण करणेही शक्य होईल.
  • हे सापळे तुलनेने स्वस्त आणि वापरण्यास सोपे आहेत. हे नवे तंत्र गोठ्यासोबतच शेतीमध्येही वापरणे शक्य आहे. पूर्वी अशा गंध सापळ्यांसाठी आकर्षके किंवा गंधगोळ्या (ल्युअर) आणि ती लावण्याची व्यवस्था असा दोन बाबी खरेदी कराव्या लागत. दोन्हींचा एकत्रित खर्च अधिक होई. तसेच त्यातील गंधगोळ्या दर ठरावीक दिवसांनंतर बदलाव्या लागत.
  • Read the latest agriculture news in Marathi and watch Agriculture videos on Agrowon. Get the latest updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Agriculture Jugad, and Farmer Success Stories.

    ताज्या घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

    Related Stories

    No stories found.