सोयाबीन पेरणीसाठी बीबीएफ तंत्र फायदेशीर

सोयाबीनसाठी बीबीएफ तंत्र फायदेशीर
सोयाबीनसाठी बीबीएफ तंत्र फायदेशीर

रुंद वरंबा सरी पद्धतीत सोयाबीन पेरणी वरंब्यावर करण्यात येते. दोन्ही बाजूने सरी पाडण्यात येते. कमी पर्जन्यमानात या सऱ्यांमध्ये पावसाचे पाणी साठून जमिनीत मुरते. जमिनीत ओलावा अधिक काळ टिकून राहतो. तसेच अतिरीक्त पावसाच्या काळात या सऱ्यांमधून जास्तीच्या पाण्याचा निचरा होतो. सोयाबीनला पाण्याचा ताण बसल्याने उत्पादनात घट दिसून येते. अशा वेळेस मूलस्थानी जलसंधारण फायद्याचे ठरते. बऱ्याच वेळेस अधिक पाऊस झाल्याने मध्यम ते भारी जमिनीत पाणी साचून पिकांचे नुकसान होते. त्यामुळे सोयाबीनसाठी रुंद वरंबा व सरी पद्धती (बीबीएफ) जलसंधारण तसेच अतिरीक्त पाण्याचा निचरा होण्याच्या दृष्टीने उपयुक्त आहे. रुंद वरंबा सरी(बीबीएफ) पद्धतीचे फायदे ः १) पावसाचे पाणी सऱ्यांमध्ये मुरते, त्यामुळे मूलस्थानी जलसंवर्धन होऊन पावसाच्या दीर्घकालीन खंड काळात याचा लाभ होतो. २) अधिक पाऊस झाल्यास अधिकचे पाणी योग्य पद्धतीने निचरा होण्यास रूंद वरंब्यासोबतच्या दोन्ही बाजूकडील सऱ्यांमुळे मदत होते. ३) या पद्धतीमुळे चांगली मशागत होऊन बियाण्यांसाठी चांगले वरंबे तयार होतात. गादी वाफे किंवा वरंब्यामध्ये हवा खेळती राहून पाणी व हवा यांचे योग्य प्रमाण राखले जाते. बियाण्याची उगवण चांगली होते. पिकाची पुढील वाढ जोमदारपणे होते. ४) बीबीएफ यंत्राच्या सहाय्याने आवश्‍यक रुंदींचे वरंबे दोन्ही बाजूने सऱ्यांसह तयार करणे, पेरणी करणे व खते देणे अशी विविध कामे एकाच वेळी करता येतात. ५) मजुरांची तसेच उर्जेची (४० ते ६० टक्के) बचत होते. ६) परिस्थितीनुसार सरासरी ५ ते ७ हेक्‍टर क्षेत्र प्रतिदिन पेरणी करता येते. ७) पारंपरिक पद्धतीच्या (सपाट वाफे पद्धत) तुलनेत सरासरी २० ते २५ टक्के पर्यंत अधिक जलसंधारण आणि २० ते २५ टक्के पर्यंत उत्पादनात वाढ होते. ७) आंतरमशागत करणे शक्‍य होते. तण नियंत्रणाच्या दृष्टीने उगवणपूर्व तणनाशकांचा वापर केल्यास प्रभावी तण नियंत्रण होते. ८) सोयाबीन तसेच कपाशी, तूर, हळद, आले या पिकांचीही लागवड या पद्धतीने करता येते. लागवड पद्धत ः १) योग्य खोलीवर व प्रमाणामध्ये बियाणांची खतासह रूंद वरंबा सरी पद्धतीने विविध पिकांची पेरणी करण्यासाठी बीबीएफ (रूंद वरंबा सरी) यंत्र विकसित केले आहे. याशिवाय कपाशी, तूर, हळद, आले या पिकांची लागवड या पद्धतीने करता येते. रब्बी हंगामात भुईमूग व हरभरा लागवड या यंत्राने करता येते. २) बीबीएफ यंत्राच्या सहाय्याने पिकानुसार योग्य रुंदीचे वरंबे (६० ते १५० सेंमी.) तयार करून जास्त अंतरावरील पिकाच्या दोन ओळी तर कमी अंतरावरील पिकाच्या चार ओळी रुंद वरंब्यावर येतील यानुसार नियोजन करून वरंब्यावर लागवड करता येते. ३) सपाट वाफे पद्धतीच्या तुलनेत रुंद वरंबा सरी पध्दतीमुळे सोयाबीन उगवण दोन दिवस अगोदर तसेच जोमदार झाल्याचे प्रयोगाने सिद्ध झाले आहे. रुंद वरंबे तयार करण्याची पद्धत ः १) बीबीएफ यंत्र ट्रॅक्‍टरचलीत आहे. २) रुंद वरंबा सरी यंत्रामध्ये ३० ते ४५ सें. मी. अंतराच्या बदलासह चार फण आणि ३० ते ६० सें. मी. रुंदीच्या सरीच्या बदलासह १५० ते २०० सें. मी. अंतरावर कमी जास्त करता येणारे दोन सरीचे फाळ आहेत. ३) यंत्राद्वारे गरजेनुसार ६० सें. मी.ते १६५ सें. मी. रुंद वरंबा तयार करून त्यावर पिकाच्या ३० ते ४५ सें. मी. अंतरावरील २ ते ४ ओळी घेता येतात. ४) तयार झालेल्या रुंद वरंब्यावर टोकणयंत्राच्या सहाय्याने बियाणे व खते पेरणी करता येतात. यंत्रामध्ये पिकाच्या दोन ओळी व दोन रोपांमधील अंतर शिफारस केलेल्या अंतरानुसार कमी-जास्त करता येते. हेक्‍टरी आवश्‍यक झाडांची संख्या ठेवता येते. ५) एका रुंद वरंब्यावर सोयाबीन पिकाच्या चार ओळी घेता येतात. यासाठी दोन ओळीतील अंतर ४५ सें. मी. ठेवावे, बीबीएफ यंत्राच्या फणांतील अंतर त्यानुसार कमी-जास्त करावे. त्यानुसार आवश्‍यक रुंद वरंबे तयार होण्यासाठी ठराविक अंतरावर खुणा करून (म्हणजेच दोन फाळात आवश्‍यक अंतर ठेवावे) त्यावर ट्रॅक्‍टरला जोडलेले बीबीएफ यंत्र बाजूने चालवावे. या वेळी सरीच्या फाळामुळे तयार होणाऱ्या दोन्ही बाजूच्या सरी या (आवश्‍यकतेनुसार) ३० ते ४५ सेंमी रुंदीच्या पडतात. त्या गरजेनुसार कमी जास्त रुंदीच्या ठेवता येतात. ६) ट्रॅक्‍टरचलीत बीबीएफ यंत्र आंतरमशागतीसाठी वापरता येते. यामध्ये पेरणीचे फण काढून तेथे आंतरमशागतीसाठी व तण नियंत्रणासाठी व्ही आकाराची पास बसवता येते. हे फण पिकाच्या दोन ओळींच्यामध्ये बसवावे लागतात. तसेच सरीमध्ये रिजर ठेवून आंतरमशागत होते. या शिवाय स्वतंत्र आंतरमशागत यंत्र वापरता येते. जेव्हा एका वरंब्यावर सोयाबीन पिकाच्या चार ओळी (३० सें. मी. अंतर) घ्यावयाच्या असतील तेव्हा सरी घेण्यासाठीच्या खुणा १५० सें. मी. (१.५ मीटर) अंतरावर ठेवून (म्हणजेच दोन फाळातील अंतर १५० सें. मी. ठेवावे) ट्रॅक्‍टरचलीत बीबीएफ यंत्र (फाळाचा मध्य खुणेवर घेऊन) चालवावे. यामुळे १३५ सें. मी. अंतराचा रुंद वरंबा तयार होतो. त्यावर सोयाबीन पिकाच्या चार ओळी ४५ सें. मी. अंतरावर घेता येतात. या वेळी सरीच्या फाळामुळे तयार होणाऱ्या दोन्ही बाजूच्या सरी या ३० सें. मी. रुंदीच्या पडतात. ७) कमी ओलाव्याच्या स्थितीत रुंद वरंबा सरी लागवड अवजाराच्या सहाय्याने पेरणी करताना अवजारामध्ये पेरणीमागे मातीने बियाणे झाकण्याच्या दृष्टीने लोखंडी पास, लोखंडी साखळ किंवा लोखंडी दांड्याचा उपयोग करता येतो. बीबीएफ यंत्राचे भाग : १) बीबीएफ यंत्रासोबत पेरणीयंत्र, बियाणे व खताची पेटी विविध कप्प्यासह उपलब्ध आहे. २) दोन फाळ, चार छोटे पेरणीचे फण, आधार देणारी दोन चाके आणि ही संपूर्ण यंत्रणा चालविणारे चाक उपलब्ध आहेत. ३) हे यंत्र चालवण्यासाठी ३५ ते ४५-५० अश्वशक्तीचे ट्रॅक्‍टर पुरेसे आहे. ४) बीबीएफ यंत्राची लांबी २२५० मि. मी. रुंदी ११३३ मि.मी. आणि उंची साधारण ८६८ मि. मी. असून त्याची चौकट ही २२५० मि.मी. लांब, ४८० मि. मी. रुंद असून वजन अंदाजे २८५ किलो एवढे आहे. संशोधनाचे निष्कर्ष ः बीबीएफ पद्धतीमध्ये वरंब्यावर सोयाबीनच्या चार ओळी ४५ सें. मी. अंतरावर पेरता येतात. कोरडवाहू शेती संशोधन केंद्रामध्ये २०१४ पासून या पद्धतीवर संशोधनात्मक प्रयोग तसेच प्रात्यक्षिक घेण्यात आली. बीबीएफ पद्धतीमुळे २० ते २५ टक्के अतिरीक्त मूलस्थानी जलसंधारण होऊन पीक उत्पादनात २५ ते ३० टक्के वाढ दिसून आली. पावसाच्या खंडकाळात जमिनीत पिकाच्या मुळाजवळ ओलावा दीर्घकाळ टिकून राहतो. कोरडवाहू परिस्थितीत सोयाबीन पिकाचे उत्पादनात स्थिरता आणण्याच्या दृष्टीने रुंद वरंबा सरी पद्धतीने पेरणी करणे पारंपरिक पद्धतीपेक्षा फायद्याचे दिसून आलेले आहे. संपर्क ः डॉ. मदन पेंडके, ९८९०४३३८०३ (अखिल भारतीय समन्वयीत कोरडवाहू शेती संशोधन प्रकल्प, वसंतराव नाईक मराठवाडा कृषी विद्यापीठ, परभणी )

Read the latest agriculture news in Marathi and watch Agriculture videos on Agrowon. Get the latest updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Agriculture Jugad, and Farmer Success Stories.

ताज्या घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
www.agrowon.com