मध्य प्रदेशात जैविक नियंत्रकाद्वारे जल तणांचे यशस्वी नियंत्रण

पाण्याचे स्रोत आणि जलाशयांमध्ये वेगाने वाढणाऱ्या सॅलव्हिनिया मोलेस्टा या नेचेवर्गीय तणांमुळे मोठी समस्या निर्माण होत आहे. मध्य प्रदेशातील २० हेक्टर क्षेत्रावरील तलावातील या तणांचे नियंत्रण कॅर्तोबॅगोस सॅलिव्हिनिई या प्रजातीच्या भुंगेऱ्यांनी सुमारे ११ महिन्यांमध्ये शाश्वतरित्या केले.
मध्य प्रदेशात जैविक नियंत्रकाद्वारे जल तणांचे यशस्वी नियंत्रण
मध्य प्रदेशात जैविक नियंत्रकाद्वारे जल तणांचे यशस्वी नियंत्रण

पाण्याचे स्रोत आणि जलाशयांमध्ये वेगाने वाढणाऱ्या सॅलव्हिनिया मोलेस्टा या नेचेवर्गीय तणांमुळे मोठी समस्या निर्माण होत आहे. पाण्याची उपलब्धतेसोबतच जलचरांच्या संख्येमध्येही घट होते. या तणाच्या निर्मूलनासाठी यांत्रिक पद्धतीपेक्षा जैविक नियंत्रण अत्यंत फायदेशीर असल्याचे स्पष्ट झाले आहे. मध्य प्रदेशातील २० हेक्टर क्षेत्रावरील तलावातील या तणांचे नियंत्रण कॅर्तोबॅगोस सॅलिव्हिनिई या प्रजातीच्या भुंगेऱ्यांनी सुमारे ११ महिन्यांमध्ये शाश्वतरित्या केले. पाण्यामध्ये वेगाने वाढून स्थानिक वनस्पती आणि जलचरांसाठी हानिकारक ठरणारी नेचेवर्गीय वनस्पती ही मूळ आग्नेय ब्राझील येथील जल तण आहे. तिला इंग्रजीमध्ये ‘सॅलव्हिनिया मोलेस्टा’ या नावाने ओळखली जाते. गेल्या ६० वर्षामध्ये तिचा प्रसार जगभरामध्ये झाला असून, ती जगातील १०० सर्वाधिक हानिकारक प्रजातींमध्येही नोंदवली गेली आहे. भारतात सर्वात प्रथम या तणाची नोंद केरळ आणि दक्षिण भारतातील काही राज्यांमध्ये झाली. त्यानंतर ती ओडिशा, उत्तराखंड आणि महाराष्ट्रातही आढळली. मध्य आणि उत्तर भारतातील काही जलाशये आणि पाण्याच्या स्रोतांमध्ये या जल वनस्पती आढळली असून, ती वेगाने वाढू लागली आहे. नुकतेच या वनस्पतीचा तीव्र आढळ मध्यप्रदेशातील जबलपूर आणि कटनी जिल्ह्यातील बेतूल आणि आसपासच्या तीन ते चार गावांतील पाणी साठ्यामध्ये दिसून आला. बेतूल येथील सारणी भागातील सातपूरा जलाशयामध्ये मोठ्या प्रमाणात ही वनस्पती पसरू लागल्याचे स्पष्ट झाले. या जलाशयावर आधारित जलविद्युत ऊर्जा निर्मिती केंद्र असून, भविष्यात या तणामुळे केवळ पाणी, मत्स्य उत्पादनासह ऊर्जा निर्मितीमध्येही अडचणी निर्माण होण्याची शक्यता होती. या जलाशयावर शेतीसह आधारित चेस्टनट सारखी अन्य काही पिकेही अवलंबून आहेत. जलपर्णी वनस्पतींची समस्या ः जल वनस्पतींच्या तणनियंत्रणासाठी रासायनिक तणनाशकांचा वापर करता येत नाही. तशी लेबल क्लेम प्राप्त तणनाशके उपलब्ध नाहीत. रासायनिक तणनाशकांचा वापरामुळे पाणी आणि पर्यावरणाचे प्रदूषण ही वेगळीच समस्या उद्भवू शकते. जलाशयातील वनस्पती बाहेर काढण्यासाठी यांत्रिक पद्धतीचा अवलंब करावा लागतो. ते प्रचंड खर्चिक ठरते. कारण एकदा तणे काढली तरी ती दर काही टप्प्यानंतर पुन्हा पुन्हा वाढत राहतात. त्यातही माणसांच्या किंवा यंत्राच्या साह्याने तणे बाहेर काढण्याचे काम प्रादुर्भावाच्या सुरुवातीच्या अवस्थेतच व्यावहारिक ठरू शकते. एकदा ही तणे पाण्यामध्ये स्थिरावली की ती काढणे अत्यंत मुश्कील होत जाते. यातून निघणाऱ्या हेक्टरी सुमारे ८० टनापेक्षा अधिक बायोमासची विल्हेवाट लावण्याची एक वेगळीच समस्या निर्माण होते. त्यामुळे जलपर्णी व जल तणाच्या नियंत्रणासाठी प्रामुख्याने जैविक घटकांचा वापर करण्यासाठी प्राधान्य दिले जाते. जैविक घटक हे पर्यावरणपूरक असून, त्यातून बऱ्यापैकी स्थिरपणे व सतत नियंत्रण होत राहण्याची शक्यता असते. जैविक नियंत्रण केरळमध्ये झालेल्या अभ्यासामध्ये सॅलव्हिनिया मोलेस्टा या तणाविरुद्ध काम करणारा एक कीटक (शा. नाव - Cyrtobagous saliviniae) अत्यंत उपयुक्त आढळला आहे. प्रथम १९८० मध्ये केरळमधील थ्रिसूर येथून हे कीटक गोळा करून त्यांचा वापर केरळमधील अन्य जलाशयांमध्ये करण्यात आला. भारतीय कृषी संशोधन परिषदेच्या जबलपूर (मध्य प्रदेश) येथील तण संशोधन संचालनालयाच्या वतीने हे कीटक मध्य प्रदेशामध्ये आणून, त्यांच्या कार्यक्षमतेचा अभ्यास करण्यात आला. त्यात हे कीटक कमाल आणि किमान तापमानामधील चढउतार आणि अन्य वातावरणीय परिस्थितीमध्ये कार्यक्षम असल्याचे दिसून आले. त्यांची उपयुक्तता लक्षात आल्यानंतर त्यांच्या प्रजनन आणि गुणनावर लक्ष केंद्रित करण्यात आले आहे. असे झाले जल तणांचे नियंत्रण जैविक घटक म्हणून किटकांचा प्राथमिक वापर करण्यासाठी कटनी जिल्ह्यातील पदूआ गावातील सरपंच आणि ग्रामस्थांशी चर्चा करण्यात आली. या गावातील २० हेक्टर क्षेत्रावरील तलावामध्ये गेल्या तीन वर्षापासून सॅलव्हिनिया या तणांचा वेगाने प्रसार होत होता. एक दोन वेळा माणसांच्या साह्याने हे तण तलावातून बाहेर काढण्याचेही काम केले गेले. मात्र पुन्हा पुन्हा होत असलेल्या वाढीमुळे ग्रामस्थ हैराण झाले होते. सॅलव्हिनिया तण प्रादुर्भावग्रस्त तलावामध्ये डिसेंबर २०१९ मध्ये कॅर्तोबॅगोस सॅलिव्हिनिई या किटकांचे २००० प्रौढ भुंगेरे सोडण्यात आले. भुंगेरे सोडल्यानंतर त्यांनी हे तण खायला सुरुवात केली. तसेच त्यांचे प्रजननही वेगाने सुरू झाले. पहिल्या सहा महिन्यामध्ये किटकांचे अस्तित्व तितकेसे स्पष्टपणे जाणवले नाही. मात्र, एकदा त्यांच्या संख्येत वाढ झाल्यानंतर त्यांनी जल तणांचा पाडलेला फडशा दिसू लागला. किटकांच्या संख्येमध्ये होणारे बदल ८, ११ आणि १८ महिन्यानंतर नोंदवण्यात आले. त्यानुसार त्यांची संख्या वाढून तणाचे नियंत्रण अनुक्रमे ५० टक्के, ८० टक्के आणि १०० टक्के प्रमाणात झाल्याचे स्पष्ट झाले. या कीटकाचे वैशिष्ट्य म्हणजे त्याचे भुंगेरे हे तणाच्या मुख्य फुटवा आणि नव्या वाढीवर हल्ला करतात, तर त्याची अळी फुटवे आणि मुळे पोखरत जाते. त्यामुळे तणांच्या नव्या प्रसार व नवी वाढही रोखला जातो. केवळ ११ महिन्यामध्ये या कीटकांची संख्या प्रति वर्गमीटर १२५.५ प्रौढांपर्यंत पोचली. त्यानंतर तणांचे प्रमाण वेगाने कमी होऊ लागल्यानंतर तणाच्या घटत्या घनतेसोबत किटकांच्या संख्येतही आपोआप घट होत गेली. म्हणजेच या किटकांचे तणाच्या प्रमाणानुसार आपोआप संतुलन झाले. पुढे या किटकांचा अन्य कोणताही त्रास आजूबाजूच्या जलाशयामध्ये किंवा पिकांवर होत नसल्याचे स्पष्ट झाले. तसेच तणांचे काही अंश पाण्यात शिल्लक राहिले असले तरी त्यातील पुनरुत्पादनक्षम अवयव अळी व भुंगेऱ्यांनी आधीच नष्ट केलेले असल्याने त्यातून नवी वाढ किंवा प्रसार अजिबात होत नाही. मानव किंवा यांत्रिक पद्धतीच्या तुलनेमध्ये थोडे सावकाश नियंत्रण होत असले तरी जैविक घटकांद्वारे शाश्वत व पर्यावरणपूरक नियंत्रण होत असल्याचे शास्त्रज्ञांनी सांगितले. (स्रोत ः तण संशोधन संचालनालय, जबलपूर, मध्यप्रदेश)

Read the latest agriculture news in Marathi and watch Agriculture videos on Agrowon. Get the latest updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Agriculture Jugad, and Farmer Success Stories.

ताज्या घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
www.agrowon.com