मळणी यंत्र वापरताना घ्यावयाची खबरदारी

अलीकडे मळणीसाठी यंत्रांचा वापर वाढला आहे. यंत्रामुळे माणसांचे श्रम कमी झाले असून, वेळही वाचत आहे. मात्र अपघाताचे प्रमाण वाढले. ते कमी करण्यासाठी योग्य ती काळजी घेतली पाहिजे.
मळणी यंत्र वापरताना घ्यावयाची खबरदारी
मळणी यंत्र वापरताना घ्यावयाची खबरदारी

खरिपातील बहुतांश पिके काढणीच्या अंतिम टप्प्यात आहेत. काही पिकांची काढणीपश्‍चात कामे सुरू असून, त्यात मळणी हे अत्यंत महत्त्वाचे काम असते. पारंपरिक पद्धतीमध्ये हाताने झोडून, बैलाद्वारे किंवा पारंपरिक पद्धतीने लोंब्या, ओंब्या किंवा शेंगांतून दाणे वेगळे केले जात. मात्र अलीकडे या कामासाठी यंत्रांचा वापर वाढला आहे. यंत्रामुळे माणसांचे श्रम कमी झाले असून, वेळही वाचत आहे. पूर्वी ज्या कामांना महिन्यांचा कालावधी लागत असे, ती आता काही दिवसांत पूर्ण होत आहे. मळणी यंत्राची (थ्रेशर) कार्यक्षमताही वाढत चालली आहे. अशा वेळी यंत्रांमुळे होणाऱ्या अपघातांचे प्रमाणही वाढलेले दिसते. कोणताही अपघात हा माणसांच्या जीवितहानी (मृत्यू) किंवा जीवितावर कायमस्वरूपी परिणाम करणारा (कायमचे अपंगत्व) असू शकतो. त्यामुळे मळणी यंत्रासोबत काम करताना प्रत्येकाने जागरूक राहून काही खबरदारी घेतली पाहिजे. योग्य यंत्राची निवड ः मळणी यंत्र (थ्रेशर) खरेदी करताना ते भारतीय प्रमाणीकरण यंत्रणेद्वारे तपासलेले व आयएसआय मार्किंग केलेले आहे का, यावर प्रथम लक्ष द्यावे. त्यात त्यावर काम करणाऱ्या माणसांच्या सुरक्षिततेच्या दृष्टीने योग्य त्या काळजी व संरक्षक आवरणे दिलेली आहेत का, हे पाहावे. ज्याच्या फीड ड्रेनची लांबी किमान ९०० मिमी व रुंदी (ड्रमच्या तोंडाजवळ) किमान २२० मिमी आहे, त्याच्या वरील आच्छादनाची लांबी किमान ४५० मिमी असली पाहिजे. त्यामुळे हात धुऱ्यापर्यंत सहज पोहोचू शकत नाही. झाकलेल्या भागाची उचल १०० ते ३०० मिमी असावी. थ्रेशरसह ५-१० अंशांच्या कोनात स्टफिंग शूट वरच्या दिशेने झुकवून पीक सहजपणे थ्रेशरमध्ये टाकता येते. फीड ड्रेनमध्ये कुठेही टोकदार कोन असू नयेत. मळणी यंत्रात पिके टाकण्याची पद्धत ः एखाद्या व्यक्तीद्वारे मळणी यंत्रामध्ये पीक टाकण्याचे काम केले जाते. अनेकदा थ्रेशरमध्ये पटकन पीक टाकण्याचा प्रयत्न केला जातो. या घाईमुळे कधी कधी अपघात होतात. म्हणून थ्रेशरमध्ये पीक टाकण्यासाठी दोन व्यक्ती असाव्यात. एका व्यक्तीने खालून पीक उचलून द्यावे आणि दुसऱ्या व्यक्तीने ते मशिनमध्ये टाकावे. थ्रेशरमध्ये पीक टाकणारी व्यक्ती सपाट आणि मजबूत जागेवर उभी असावी. खाट, धान्याच्या पोते, पिकांच्या गाठी किंवा टायर इ. उभे राहून काम करताना शरीराचे संतुलन बिघडून तोल जाऊ शकतो. अशी व्यक्ती सरळ यंत्रावर पडण्याचा धोका असतो. अनेक वेळा काही व्यक्ती अधिक उंचीवर उभी राहून किंवा ट्रॅक्टरच्या ट्रॉलीमधून थेट थ्रेशरमध्ये पीक टाकण्याचा प्रयत्न करतात. हातांचा वापर करण्याऐवजी पायाने ढकलून पीक थ्रेशरमध्ये ढकलण्याचा प्रयत्न करते. अशा वेळी तोल जाण्याचा धोका जास्त असते. पिकासोबत हात किंवा पाय आत खेचला जाऊन अपघात होऊ शकतो. सोयाबीन, हरभरा, मसूर, बाजरी इ. झुडपी पिके मळताना विशेष काळजी घ्यावी. काटेरी पिके मळताना अनेकदा शेतकरी हाताला जुन्या कापडाचा तुकडा किंवा पोते गुंडाळतात. हेही धोक्याचे असते. कारण टाकण्याच्या प्रक्रियेमध्ये कापड, पोते यांचे धागे, पट्टी किंवा लोंबणारे भाग बहुतेकदा थ्रेशरच्या धुराकडे खेचले जाऊ शकतात. त्यामुळे हात आत जाऊन अपघात होऊ शकतो. हातात रबरी किंवा चामड्याचे हातमोजे घालावेत. थ्रेशर चालवणाऱ्यांचे कपडे ही अंगाभोवती घट्ट असावेत. सैल कपडे उदा. कुर्ता, धोतर, महिलांची साडी किंवा लांब केस इ. पट्ट्या किंवा मशिनच्या अन्य हलत्या भागांमध्ये अडकून गंभीर अपघात होऊ शकतो. थ्रेशरवर काम करताना स्त्रियांनी केस आणि साड्या घट्ट बांधाव्यात. जेव्हा थ्रेशर बेल्ट-पुली वापरून ट्रॅक्टर किंवा अन्य कोणत्याही ऊर्जा स्रोतांद्वारे चालवले जातात, तेव्हा हलणारे भाग लाकडी चौकटीने किंवा लोखंडी जाळीने झाकावेत. तिकडे लहान मुले जाणार नाहीत, याची विशेष काळजी घ्या. जास्त थकवा देतो अपघाताला आमंत्रण ः सलग काम करून वेगाने काम संपवण्याकडे साऱ्यांचा (मशिनचालक, मालक आणि शेतकरी यांचा) कल असतो. मात्र सलग विशेषतः रात्री उशिरापर्यंत काम करणे शक्यतो टाळावे. कोणत्याही स्थितीमध्ये थकल्यावर काही काळ तरी विश्रांती घ्यावी. शक्य असल्यास यंत्रावर काम करणाऱ्या व्यक्ती दर काही काळानंतर बदलून आराम द्यावा. किंवा वेगळे काम द्यावे. थकवा, झोप आल्यामुळे अपघात होण्याची प्रमाण जास्त असते. थकलेल्या स्थितीत मळणी यंत्रात पिकांच्या फांद्या भरण्याचे काम करू नये. थ्रेशरच्या स्टफिंग शूटची उंची आपल्या कोपराच्या उंचीइतकीच असावी. त्यापेक्षा स्टफिंग शूटची उंची जास्त असताना सतत हात उंचावून टाकावे लागते. ही उंची फारच कमी असल्यास कंबरेतून वाकून दीर्घकाळ काम करावे लागते. या दोन्ही बाबतीत जास्त थकवा जाणवतो. थ्रेशरवर ३-४ तासांपेक्षा अधिक काळ सलग काम करू नका. यंत्राची योग्य तपासणी आवश्यक ः थ्रेशर सुरू करण्यापूर्वी त्याची तपासणी करून घ्यावी. विशेषतः थ्रेशरच्या आत फिरणारे लोखंडी भाग, ड्रममधील भाग सैल नाहीत, त्यांचे आवाज येत नाहीत ना, घासले जात नाहीत ना, हे लक्षपूर्वक पाहावे. अनेक वेळा सतत होणाऱ्या घर्षणामुळे आग लागू शकते. विजेवर चालणाऱ्या थ्रेशर संदर्भात विद्युत तारा, जोड उघडे राहणार नाहीत, याची काळजी घ्यावी. या वायरी फार ताणू नयेत. त्यातून अपघात होऊन विजेचा धक्का बसणे किंवा आग लागणे अशा घटना उद्‌भवू शकतात. विजेचा शेतात किंवा कोठारात उघडे ठेवू नका जिथे थ्रेशर चालू आहे. जर एखादी व्यक्ती वायरच्या संपर्कात आली तर विद्युतदाबामुळे करंट लागू शकतो व कोठारात आग लागू शकते. वैभव जाधव, ९९७०९९११०८ (कृषी अभियांत्रिकी आणि तंत्रज्ञान महाविद्यालय, जळगाव जामोद, जि. बुलडाणा)  

Read the latest agriculture news in Marathi and watch Agriculture videos on Agrowon. Get the latest updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Agriculture Jugad, and Farmer Success Stories.

ताज्या घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
www.agrowon.com