काजू प्रक्रिया लघू उद्योग

काजू प्रक्रिया लघू उद्योग
काजू प्रक्रिया लघू उद्योग

काजू प्रक्रियेमध्ये उद्योजकतेच्या मोठ्या संधी आहेत. १५० रुपये कच्च्या काजूपासून अंतिम उत्पादनाला ८०० रुपये प्रतिकिलो दर मिळू शकतो. किमान गुंतवणुकीतून चांगला नफा कमावण्याची संधी काजू उत्पादक पट्ट्यासोबत अन्य प्रदेशांतील शेतकऱ्यांनी साधायला हवी. मध्यम वर्गाची क्रयशक्ती वाढत असून, त्याबरोबर काजूची मागणीही वाढत चालली आहे. भारतात प्रामुख्याने काजू प्रक्रिया उद्योग हा केरळ आणि कर्नाटक, महाराष्ट्राच्या किनाऱ्यावरील भागांमध्ये मोठ्या प्रमाणात पसरलेला आहे. कच्च्या काजूची किंमत प्रतिकिलो १५० रुपये असून, अंतिम उत्पादनाची किंमत ८०० रुपयांपर्यंत पोचते. काजूचे अंतिम तयार उत्पादन ४० ते ५६ किलोपर्यंत मिळते. अगदी सरासरी ६०० रुपये मूल्यानुसार या प्रक्रिया उद्योगातून कच्चा माल ते प्रक्रियायुक्त उत्पादनाद्वारे उत्पन्न दुप्पटीपेक्षा अधिक मिळू शकते. कच्चा काजू दीर्घकाळापर्यंत साठवता येत असल्याने देशाच्या दूरवरील भागापर्यंत नेणे आणि प्रक्रिया करणे शक्य आहे. स्थानिक पातळीवर ग्राहकांना ताजे आणि उच्च प्रतीचे काजू उपलब्ध करता येऊ शकतात. सर्वात महत्त्वाचे म्हणजे प्रक्रिया अत्यंत सोपी असून, कमी व स्वस्त यंत्रसामग्रीच्या साह्याने एका खोलीतून हा उद्योग सुरू करता येतो. या कारणामुळे काजू उत्पादक नसलेल्या भागामध्येही असे उद्योग सुरू झाले आहेत. सर्वसामान्यपणे काजू प्रक्रिया उद्योगांमध्ये ९० टक्क्यापर्यंत महिलावर्ग काम करतो. या उद्योगातील यांत्रिकीकरणाचा वेग अत्यंत कमी आहे. कच्चा काजू भारतातील किनाऱ्यावरील प्रदेशातून मागवला जातो. त्याचप्रमाणे मोठ्या प्रमाणात प्रक्रिया करायची असल्यास आफ्रिका, व्हियतनाम अशा देशातूनही काजू आयात केला जातो. अर्थात, काजू उत्पादन असलेल्या भागांमध्ये काजू प्रक्रिया, त्या पूर्वीची खरेदी व नंतरच्या विक्री व्यवस्था सोप्या पडतात. काजू हे विविध प्रकारे आहारात समाविष्ठ आहेत. उदा. खारवलेले काजू, काजू बर्फी, काजू करी इ. काजू उद्योगातील अन्य एक उपपदार्थ म्हणजे काजूच्या बोंडापासून तयार केलेला द्रव. या द्रवपदार्थाची रंग उद्योगांमध्ये मोठी मागणी आहे. उत्पादन प्रक्रिया ः काजू उत्पादनाची प्रक्रिया बऱ्यापैकी स्थिरावलेली आहे. त्यात कच्चे काजू सूर्यप्रकाशामध्ये वाळवून पोत्यामध्ये साठवण केली जाते. असे कच्चे काजू बॉयलरमध्ये वाफेवर शिजवून मऊ केले जातात. त्यासाठी लहान आकाराचे बॉयलर उपलब्ध आहेत. वाफवलेल्या काजूबोंडावरील आवरण कुशल मजूरांच्या साह्याने हाताने चालवल्या जाणाऱ्या अवजाराने काढली जातात. आतील काजू पुन्हा कॅबिनेट ड्रायरमध्ये वाळवले जातात. त्यानंतर त्यावरील लालसर साल (त्याला तेस्ता असे म्हणतात.) काढली जाते. त्यानंतर काजू मिळतो. या काजूची रंग आणि कशाप्रकारे फुटला आहे, त्यावरून प्रतवारी केली जाते. बाजूला पडलेल्या काजू आवरणातून द्रवपदार्थ (CNSL) मिळवता येतो. या प्रक्रिया केंद्रांना भारतीय अन्न सुरक्षा आणि प्रमाणीकरण प्राधिकरण, २००६ चे निकष पाळावे लागतात. हे नियम भारतातील सर्व पदार्थांना लागू आहेत. नवीन प्रक्रिया केंद्रांनी हे निकष पूर्ण करून परवाना घेणे बंधनकारक आहे.

 • नवीन तंत्रज्ञानामध्ये काजूबोंडापासून काजू तोडून वेगळे करण्याची यंत्र उपलब्ध आहे. काजू बोंड बॉयलरमध्ये ३० मिनिटे वाफेवर शिजवल्यानंतर पुढील ६-८ तास मोकळ्या हवेमध्ये वाळण्यासाठी ठेवले जातात. त्यानंतर त्यावरील आवरण काढून आतील गुलाबी सालीसह (तेस्ता) असलेला काजू वेगळा केला जातो. त्यानंतर पुन्हा वाळवून त्यातील आर्द्रता ५ टक्क्यापर्यंत कमी केली जाते. ही प्रक्रिया ड्रायरमध्ये ६० अंश सेल्सिअस तापमानामध्ये ६ ते ८ तासामध्ये पार पाडली जाते. त्यावरील तेस्ता सहजपणे वेगळे करता येते. स्वच्छ आणि चमकदार काजू मिळतो.
 • १०० क्विंटल काजू बियांपासून ५० टक्क्यांपर्यंत काजू मिळू शकतात.
 • एका युनिटमध्ये एक बॉयलर, एक स्टिमर, दोन कटर, एक ड्रायर, सहा साल काढणारे यंत्र यांचा समावेश असतो. जमीन आणि खेळत्या भांडवलासाठी मोठी रक्कम लागू शकते.
 • कच्च्या काजूची किंमत १५० रुपये प्रतिकिलो असून, तयार काजूची किंमत ८०० रुपये प्रतिकिलोपर्यंत राहू शकते.
 • या माहितीनुसार प्रतिक्विंटल १५ हजार रुपये कच्च्या मालासाठी लागतात. त्यातून ५० किलो काजू मिळतात. या काजूपासून सुमारे ४० हजार रुपये मिळू शकतात. या प्रक्रियेतून सुमारे ६० किलो काजू आवरण मिळते. त्याला १०० प्रतिकिलो असा दर मिळतो.
 • म्हणजेच साधारणपणे १५ हजार रुपयाच्या कच्च्या मालाचे रूपांतर ४६ हजार रुपयांमध्ये होते. योग्यप्रकारे नियोजन आणि विक्री केल्यास काजू प्रक्रिया उद्योगांमध्ये उद्योजकतेच्या मोठ्या संधी आहेत.
 • काजू प्रक्रियेसंदर्भातील प्रशिक्षण डॉ. बाळासाहेब सावंत कोकण कृषी विद्यापीठामध्ये उपलब्ध आहे. त्याचप्रमाणे भारतीय कृषी संशोधन संस्थेच्या पुत्तर (कर्नाटक) येथील काजू संचलनालय येथेही संशोधन आणि प्रशिक्षणाचे काम केले जाते.
 • Read the latest agriculture news in Marathi and watch Agriculture videos on Agrowon. Get the latest updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Agriculture Jugad, and Farmer Success Stories.

  ताज्या घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

  Related Stories

  No stories found.
  Agrowon
  www.agrowon.com