नारळाच्या एकाच गर्भापासून अनेक फुटवे (क्लोन) मिळवणे शक्य

नारळाचे झाड हे सावकाश वाढणारे असून, त्याची पैदास करणे अवघड ठरते. त्यात आधुनिक पद्धतीने क्लोनिंग करणेही अवघड आहे. नारळाची रोपे वेगाने तयार करण्यासाठी बेल्जियम येथील कॅथलिक युनिव्हर्सिटी, लेव्यून येथील संशोधकांनी नारळ पैदाशीची नवी पद्धत विकसित केली आहे.
नारळाच्या एकाच गर्भापासून अनेक फुटवे (क्लोन) मिळवणे शक्य
नारळाच्या एकाच गर्भापासून अनेक फुटवे (क्लोन) मिळवणे शक्य

नारळाचे झाड हे सावकाश वाढणारे असून, त्याची पैदास करणे अवघड ठरते. त्यात आधुनिक पद्धतीने क्लोनिंग करणेही अवघड आहे. नारळाची रोपे वेगाने तयार करण्यासाठी बेल्जियम येथील कॅथलिक युनिव्हर्सिटी, लेव्यून येथील संशोधकांनी नारळ पैदाशीची नवी पद्धत विकसित केली आहे. नारळांचे जनुकीय गुणधर्म जोपासण्यासाठी या नव्या पद्धतीचा वापर करण्यात येणार आहे. जगभरामध्ये लागवडीखाली असलेल्या फळांमध्ये नारळ हे सहाव्या क्रमांकाचे फळ आहे. नारळाचे झाड हे कल्पवृक्ष मानले जाते. नारळाचे तेल, नारळ पाणी किंवा अन्य उत्पादनांची मागणी सातत्याने वाढत असली तरी नारळांची जैवविविधता मात्र वेगाने कमी होत आहे. नारळांची लागवड प्रामुख्याने सागरी किनाऱ्यालगतच्या भागामध्ये केली जाते. नारळावर येणारे विविध रोग, वातावरण बदलाचे संकट, वाढती समुद्रपातळी यांचा धोका वेगाने वाढत आहे. बेल्जियम येथील कॅथलिक युनिव्हर्सिटी, लेव्यून आणि आंतरराष्ट्रीय जैवविविधता संघटन आणि उष्ण कटिबंधीय संशोधन केंद्र (सीएट) यांनी एकत्रितपणे नारळाच्या पैदाशीसाठी वेगवान पद्धत विकसित केली आहे. यामुळे नारळांची जनुकीय विविधता जोपासणे शक्य होणार आहे. केयू लेव्यून यांच्या उष्ण कटिबंधीय पिके सुधार प्रयोगशाळेचे बार्ट पॅनिस आणि पीएच.डी.चे विद्यार्थी हॅन्स विल्म्स यांनी केळीसारख्या अन्य फळांच्या पैदाशीसाठी वापरल्या जाणाऱ्या संशोधनातून प्रेरणा घेत नारळावर काम सुरू केले. केळी आणि नारळ पिकामध्ये भिन्नता असली तरी या पिकातील काही वनस्पती संप्रेरके नारळांमध्येही उपयुक्त ठरू शकतील, अशा विश्‍वास पॅनिस यांना होता. नारळाची झाडे ही शेजारी फुटवे तयार करत नाही. ते त्यांची सर्व ऊर्जा ही एकाच फुटव्यावर केंद्रित करतात. त्यामुळेच त्यांची वाढ अधिक उंचीपर्यंत होऊ शकते. या नारळाच्या गुणधर्मामुळे त्याचे क्लोन तयार करणे आणि रोपांची साठवण करणे हे अवघड बनते. ...असे आहे तंत्र शास्त्रज्ञांनी प्रथम नारळाचा कोंब (गर्भ) वेगळा केला. त्याच्या वाढीच्या बिंदूवर संप्रेरकाचा वापर केला. यामुळे या गर्भातून एकच अंकुर किंवा फुटवा निघण्याऐवजी अनेक फुटवे निघाले. ते फुटवे थोडेसे बाजूला करत आणखी फुटवे वाढण्यासाठी जागा तयार केली. हे अधिकचे फुटवे योग्य पद्धतीने वाढण्यासाठी आवश्यक ती ऊर्जा त्याला दिली. संशोधक पॅनिस यांनी सांगितले, की अशा पद्धतीने नारळाची पैदास करता येईल, यावर कोणाचाच विश्‍वास बसत नव्हता. पण एक कल्पना आणि त्यावर सातत्याने काम करण्याच्या प्रक्रियेतून हे यश मिळाले आहे. ही पद्धत प्रथमच विकसित केली असून, मोठ्या प्रमाणात वेळ आणि खर्च वाचवणारी ठरणार आहे. एकाच नारळांच्या रोपापासून अनेक नवे फुटवे, रोपे तयार करता येतील. ती सर्व एकाच गर्भापासून तयार झाल्यामुळे मातृवृक्षाचेच जनुकीय गुणधर्म पुढे नव्या रोपांमध्ये येतील. या संशोधनाचे निष्कर्ष १५ सप्टेंबर रोजी प्रकाशित सायंटिफिक रिपोर्टस् मध्ये मांडण्यात आले आहेत. नारळातील नवी आव्हाने पेलण्यासाठी... या नव्या पद्धतीने पैदास वेग वाढवून नारळांची जनुकीय विविध (जैवविविधता) सुनिश्‍चित करण्याला प्रथम प्राधान्य देण्यात येणार असल्याचे शास्त्रज्ञांनी सांगितले. नारळाच्या प्रत्येक जातींची स्वतःची अशी अनेक वैशिष्ट्ये असून, ती जपण्यावर लक्ष केंद्रित केले जात आहे. काही जाती या एखाद्या रोगाला प्रतिकारक आहेत, तर काही जातींमध्ये उत्तम गुणधर्माचे तेल मिळते. काही जाती या उष्णता, दुष्काळ आणि वादळांचा अधिक सशक्तपणे सामना करू शकतात. हॅन्स यांनी सांगितले, की जैवविविधता बागांमध्ये नारळांच्या विविध जातींचे संगोपन केले जात आहे. मात्र जैवविविधता जपण्यामध्ये सर्वांत मोठी अडचण ठरत आहे, ती पाने पिवळे पडण्याच्या रोगाची. आमच्या नव्या तंत्रामध्ये नारळांचे फुटवे तयार करून ते वजा १९६ अंश सेल्सिअस तापमानामध्ये द्रवरूप नायट्रोजनमध्ये दीर्घकाळपर्यंत साठवता येऊ शकतात. या साठवणीच्या तंत्राला ‘क्रायोप्रिझर्व्हेशन’ असे म्हणतात. हे भविष्यासाठी अत्यंत महत्त्वाचे ठरणार आहे. कारण भविष्यामध्ये एखादा नवा रोग नारळावर आला तरी त्यापासून बचावासाठी प्रतिकारकतेची अनेक जनुके आवश्यक असतील. लहान शेतकऱ्यांना योग्य दरात मिळण्यासाठी... अनेक भागांमध्ये नारळाच्या बागा जुन्या झाल्या आहेत, त्यांचे उत्पादन कमी झाले आहे. नव्या बागांच्या लागवडीसाठी अधिक रोपांची आवश्यकता सातत्याने भासत राहणार आहे. अशा वेळी नवी रोपे कमी कालावधीमध्ये उपलब्ध होण्यासाठी हे नवे तंत्र उपयोगी ठरेल. कमी कालावधीमुळे खर्चातही बचत होऊन शेतकऱ्यांना परवडणाऱ्या दरामध्ये रोपांची उपलब्धता करणे शक्य होईल.

या संशोधनाच्या पेटंटसाठी अर्ज दाखल केला आहे. हे तंत्रज्ञान अधिक अचूक करण्यासाठी आणखी अभ्यास करण्याचे नियोजन असून, त्यासाठी आर्थिक निधी आवश्यक आहे. याचे पेटंट घेतले तरी उत्पादित होणारी रोपे लहान शेतकऱ्यांना परवडणाऱ्या दरातच उपलब्ध करण्याचा मानस संशोधक पॅनिस यांनी व्यक्त केला.  

Read the latest agriculture news in Marathi and watch Agriculture videos on Agrowon. Get the latest updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Agriculture Jugad, and Farmer Success Stories.

ताज्या घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.