पिकाच्या गरजेवेळीच पाणी देणारे ‘ग्रो स्ट्रीम तंत्र

सामान्य आणि अल्पभूधारक शेतकऱ्यांसाठी आधुनिक सिंचन तंत्रज्ञान अद्याप आवाक्याबाहेरच आहे. अशा वेळी पिकांची पाण्याची समजून वेळीच पुरवणा करण्यासाठी ‘ग्रो स्ट्रीम’ हे तंत्र अधिक उपयुक्त ठरू शकते.
पिकाच्या गरजेवेळीच पाणी देणारे ‘ग्रो स्ट्रीम तंत्र
पिकाच्या गरजेवेळीच पाणी देणारे ‘ग्रो स्ट्रीम तंत्र

आपण पिकाला पाणी कधी देतो? पिकाला गरज असताना की आपल्याला सोईस्कर असताना (वीज, मजूर यांच्या उपलब्धतेनुसार), हा प्रश्‍न आपण स्वतःला विचारून पाहा. त्यातून आपण पिकाला दिलेले पाणी वाया का जाते, याचे खरे उत्तर मिळू शकेल. पाटपाणी पद्धतीने जितके पाणी वाया जाते, त्यात ठिबक किंवा तुषार सिंचन पद्धतीमुळे मोठी बचत होते. मात्र वीज आणि अन्य समस्यांमुळे ते योग्य वेळी चालवणे शक्य होईलच असे नाही. अशा वेळी आधुनिक तंत्र असूनही सिंचनाचे योग्य व्यवस्थापन आणि नियोजन करता येत नाही. पिकाची पाण्याची नेमकी गरज समजून त्यानुसार सिंचन देण्यासाठी विविध आधुनिक तंत्रे सध्या वापरली जात आहेत. त्यात अलीकडे ड्रोनची वापर होऊ लागला आहे. सध्या आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर वाढत चालला असून, सधन शेतकरी मोठ्या क्षेत्रावरील पिकाच्या सर्वेक्षणासाठी आणि पाण्याची गरज जाणण्यासाठी ड्रोनचा वापर करू लागले आहे. मात्र सामान्य आणि अल्पभूधारक शेतकऱ्यांसाठी आधुनिक सिंचन तंत्रज्ञान अद्याप आवाक्याबाहेरच आहे. अशा वेळी पिकांची पाण्याची समजून वेळीच पुरवणा करण्यासाठी ‘ग्रो स्ट्रीम’ हे तंत्र अधिक उपयुक्त ठरू शकते. असे काम करते हे तंत्र ः पिकांना पाण्याचा ताण पडला किंवा गरज भासू लागली की मुळांच्या परिसरात (रायझोस्फिअरमध्ये) मुळांकडून विशिष्ट प्रकारची रसायने उत्सर्जित होतात. त्यांचे महत्त्वाचे काम असते, ते म्हणजे पाणी आणि आवश्यक ती अन्नद्रव्ये शोषणे. पिकांची गरज आणि या उत्सर्जनाचे प्रमाण बाह्य वातावरणानुसार बदलत असते. वेगवेगळ्या तापमान, वारे, पाऊस यांसह पिकाच्या वाढीच्या विविध अवस्थांनुसार त्यात योग्य ते बदल होत असतात. बाह्य वातावरणाशी जुळवून घेत योग्य तीच मागणी पिकांकडून केली जाते. हे सारे वनस्पतीच्या सेंद्रिय रसायनाद्वारे कार्यरत असते. या मागणीला साद देणारे व त्यानुसार आवश्यक तितका पाणी व अन्नद्रव्य पुरवठा करणारे ‘ग्रो स्ट्रीम’ ही सिंचन प्रणाली ‘रिस्पॉन्सिव्ह ड्रीप इरिगेशन’ या कंपनीने विकसित केली आहे. ग्रो स्ट्रीम सिंचन पद्धतीमध्ये लॅटरलमध्ये पोअर फिल्ड पॉलिमरचा वापर केला आहे. त्याद्वारे तहानलेल्या वनस्पतीकडून सोडलेल्या रसायनांचा वेध घेतला जातो. त्याविषयी माहिती देताना कंपनीचे संस्थापक जान गाऊल्ड यांनी सांगितले, की जेव्हा वनस्पतीकडून विशिष्ट रसायने सोडली जातात, त्या वेळी सूक्ष्म अशी छिद्रे असलेल्या लॅटरलमधून पाणी सोडले जाते. वनस्पतीकडून पाणी पुरेसे उचलले गेल्यानंतर त्यातून रसायने सोडणे आपोआप बंद होते. रसायने सोडणे बंद झाल्याबरोबरच त्वरित लॅटरलमधून पाणी सोडणेही थांबते. म्हणजेच पिकांची पाण्याची गरज जाणून त्या वेळेपुरते ड्रीप यंत्रणा सुरू राहते. या पद्धतीतून खतेही देणे शक्य आहे. इथे होतोय याचा वापर  वाळवंटी प्रदेशात वापर  कंपनी या तंत्रज्ञानाचा वापर अबू धाबी येथील शेतकरी वाळवंटी प्रदेशात स्थानिक भाज्यांच्या उत्पादनासाठी करत आहे. पारंपरिक ठिबक सिंचनाच्या तंत्रापेक्षा यामध्ये पाण्याची अधिक (सुमारे ५० टक्क्यांपर्यंत) बचत होत असल्याचा दावा केला आहे. लॉनशेतीमध्ये वापर  लॉस एंजलिस येथील मोठ्या शेतकऱ्यांसोबतही कंपनी सध्या काम करत आहे. त्यात मोठ्या क्षेत्रावर लॉन किंवा टर्फ गवतांमध्ये याचे प्रयोग केले जात आहेत. त्याविषयी माहिती देताना गाऊल्ड म्हणाले, की सध्या शहरी भागामध्ये सर्वत्र काँक्रीट आणि हार्ड स्केपचे प्राबल्य दिसते. झाडे व गवते लावण्याचे पर्यावरणासाठीचे महत्त्व सर्वांना माहिती असले तरी ते लावणे अनेक कारणामुळे शक्य होत नाही. त्यातील महत्त्वाचे कारण म्हणजे हिरवळ लावण्यासाठी व देखभालीसाठी पाण्याचा फार वापर होतो. अनेक ठिकाणी तितके पाणी उपलब्ध असतेच असे नाही. आधुनिक सिंचन पद्धतीपेक्षाही नव्या तंत्राचा वापर केला तर पाण्याची मोठी बचत होते. एका पथदर्शी प्रकल्पामध्ये पारंपरिक ठिबक सिंचनाच्या तुलनेमध्ये नव्या तंत्रज्ञानामुळे ३० ते ५० टक्के कमी पाणी लागत असल्याचे दिसून आले. १४ देशांपर्यंत पोहोचले तंत्र  पारंपरिक पाटपाणी पद्धतीचा सिंचनासाठी वापर आजही अनेक देशांमध्ये (अगदी विकसितही) केला जातो. ज्या ठिकाणी पाणी उपलब्ध आहे, तिथे पाण्याची किंमत शेतकऱ्यांच्या लक्षात येत नाही. जिथे पाण्याची टंचाई आहे, तिथे शेतकऱ्यांकडे नवे तंत्रज्ञान घेण्याची आर्थिक क्षमता नाही. अशी अडचण कंपनीसोबत येत आहे. सध्या कंपनी जगभरातील १४ देशांमध्ये काम करत आहे. त्यात झिम्बाब्वेच्या अल्पभूधारक शेतकऱ्यांपासून उतह येथील रहिवाशी भागातील लॉन निर्मितीपर्यंतची विविधता आहे. जिथे जिथे पाण्याची समस्या आहे, तिथे काम करण्याची कंपनीची इच्छा असल्याचे गाऊल्ड यांनी सांगितले. अनुभव... केनिया येथील हायड्रोपोनिक्स आफ्रिका लि. या कंपनीने वेगवेगळ्या पिकांमध्ये आणि हंगामामध्ये या ग्रो स्ट्रीम तंत्रज्ञानाचा वापर केला आहे. त्यांच्या मते, पाण्यामध्ये व विजेच्या वापरामध्ये मोठ्या प्रमाणात बचत शक्य झाली. तसेच पिकांना योग्य वेळी पाणी उपलब्ध होत असल्यामुळे त्यांची वाढ वेगाने होते. पक्वता वेळीच गाठली गेल्याने काढणीही लवकर होते. कंपनीला कांदा, थॉर्न मेलान या पिकांमध्ये ८० ते ८४ टक्के पाणी बचत, १४ ते १६ टक्के अधिक वेगाने वाढीसह उत्पादनामध्ये ५५ ते ७० टक्के वाढ असे अविश्‍वसनीय निष्कर्ष मिळाले आहेत. लेट्यूससारख्या पिकामध्ये पाण्याची बचतच ९८ टक्के इतकी झाली, तर उत्पादनामध्ये ५५ टक्के वाढ मिळाली.

Read the latest agriculture news in Marathi and watch Agriculture videos on Agrowon. Get the latest updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Agriculture Jugad, and Farmer Success Stories.

ताज्या घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
www.agrowon.com