टोमॅटो परागीभवनासाठी रोबो!

बेल्जियम येथील बायोबेस्ट ग्रुप आणि इस्राईल येथील अरुग्गा एआय फार्मिंग यांनी नुकत्याच एक करारावर स्वाक्षऱ्या केल्या. त्यानुसार बायोबेस्टने अरुग्गाच्या नव्या आर्थिक प्रकल्पामध्ये अमेरिका आणि कॅनडा येथील उत्पादन वितरणामध्ये भागीदारी करण्याचे मान्य केले.
टोमॅटो परागीभवनासाठी रोबो!
टोमॅटो परागीभवनासाठी रोबो!

बेल्जियम येथील बायोबेस्ट ग्रुप आणि इस्राईल येथील अरुग्गा एआय फार्मिंग यांनी नुकत्याच एक करारावर स्वाक्षऱ्या केल्या. त्यानुसार बायोबेस्टने अरुग्गाच्या नव्या आर्थिक प्रकल्पामध्ये अमेरिका आणि कॅनडा येथील उत्पादन वितरणामध्ये भागीदारी करण्याचे मान्य केले. अरुग्गा एआय फार्मिंग ही इस्राईलमध्ये २०१७ मध्ये स्थापन झालेली स्टार्टअप कंपनी आहे. ती प्रामुख्याने हरितगृह शेतीमधील विविध समस्यांवर यंत्रमानवाच्या किंवा कृत्रिम बुद्धिमत्तेच्या साह्याने समाधान शोधण्याचे काम करते. हरितगृहातील टोमॅटोमध्ये मधमाश्या आणि बंबलबी यांच्या कमी संख्येमुळे उद्‌भविणाऱ्या परागीभवनाच्या समस्येवर मात करण्यासाठी या कंपनीने प्रयत्न सुरू केले आहे. त्याविषयी माहिती देताना अरुग्गाचे कार्यकारी अधिकारी म्हणाले, की सध्या मधमाश्यांच्या अभावामुळे परागीभवनासाठी मानवी पद्धतीचा अवलंब केला जात आहे. आम्ही त्यासाठी परागीभवन करणारे रोबोट तयार केले असून, त्याचे चांगले निष्कर्ष मिळाले आहेत. मधमाश्या आणि मानवी परागीभवनाच्या तुलनेमध्ये यंत्रमानवाच्या साह्याने परागीभवन केलेल्या हरितगृहातून पाच टक्के अधिक उत्पादन मिळाले आहे. त्याच प्रमाणे टोमॅटो पिकामध्ये उद्‌भविणाऱ्या अन्य समस्यांवरही आम्ही काम करत आहोत. प्रायोगिक पातळीवरून आता व्यावसायिक पातळीवर आम्ही झेप घेत असून, आमचे तंत्रज्ञान अमेरिका आणि कॅनडामध्येही उपलब्ध करत आहोत. त्यासाठी बायोबेस्ट या कंपनी करार केला आहे. बायोबेस्ट ही कंपनी जागतिक पातळीवर जैविक नियंत्रण आणि परागीभवनाच्या क्षेत्रात काम करते. कंपनीचे कार्यकारी अधिकारी जीन मार्क वॅन्डूर्ने म्हणाले, की अरुग्गा या कंपनीच्या उद्योजकता आणि रोबोटिक पॉलिनेशन क्षेत्रातील निष्कर्षांनी आम्ही प्रभावित झालो आहोत. आम्ही गेल्या तीस वर्षांपासून जंगली मधमाश्याचे (बंबल बी) व्यावसायिक उत्पादन घेत आहोत. टोमॅटोसारख्या पिकांच्या परागीभवनामध्ये मधमाश्यामुळे अनेक फायदे झाले आहेत. मात्र या जैविक घटकांसोबतच पीक उत्पादनांची शाश्‍वती वाढविण्यासाठी यंत्रमानव आणि कृत्रिम बुद्धिमत्ता भविष्यात अत्यंत महत्त्वाची ठरत जाणार आहे. त्या दिशेने अरुग्गा कंपनीसोबतचा करार फायद्याचा ठरू शकतो. उत्तर अमेरिकेतील अत्याधुनिक टोमॅटो उत्पादनामध्ये अरुग्गाच्या तंत्रज्ञानाला चांगली मागणी राहू शकेल.

Read the latest agriculture news in Marathi and watch Agriculture videos on Agrowon. Get the latest updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Agriculture Jugad, and Farmer Success Stories.

ताज्या घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
www.agrowon.com