नव्या गहू जातीने पेलला क्षार, पाणथळ जमिनीचा ताण!

पंजाबमधील क्षारयुक्त आणि पाणथळ जमिनीमध्ये लागवड योग्य गहू जात केआरएल २१० ही अधिक उत्पादन देते. ताणाच्या स्थितीतही चांगला तग धरून वाढ करून घेत असल्याने ही जात शेतकऱ्यांमध्ये लोकप्रिय होत आहे. विस्ताराच्या प्रक्रियेत कार्यरत सर्व घटकांच्या सुनियोजित आणि शेतकऱ्यांच्या स्वयंस्फूर्त पुढाकारातून या जातीखाली क्षेत्र ९० हजार हेक्टरवर पोहोचले आहे.
नव्या गहू जातीने पेलला क्षार, पाणथळ जमिनीचा ताण!
नव्या गहू जातीने पेलला क्षार, पाणथळ जमिनीचा ताण!

पंजाबच्या नैर्ऋत्येकडील भागामध्ये जमिनी क्षारपड आणि पाणथळ होण्याची मोठी समस्या दिसून येत आहे. या भागातील भूजलाचा दर्जा सातत्याने घसरत असून, कालव्यातून होणाऱ्या पाण्याच्या अनियमित पुरवठ्याचा आणि वातावरणातील बदलांचा तीव्र परिणाम शेतीवर आणि पर्यायाने सर्वसामान्य शेतकऱ्यांच्या जीवनावर होताना दिसत आहे. गेल्या काही दशकांपासून सातत्याने होत असलेल्या क्षारयुक्त पाण्याच्या सिंचनासाठीच्या वापरामुळे समस्यांमध्ये वाढच होत आहे. या प्रदेशात प्रामुख्याने किन्नो आणि कपाशी या दोन पिकांचे शेती होते. ही दोन्ही पिके नगदी आणि चांगला पैसा मिळवून देणारी असल्याने शेतकरी कितीही अडचणी येत असल्या तरी सोडण्याचे नाव घेत नाहीत. त्यामुळे या पिकाखालील क्षेत्र तितकेच राहिल्याचे चित्र असले तरी एकूण उत्पादन वेगाने घटत चालले आहे. गेल्या पाच सहा वर्षांपासून शेतकऱ्यांना अन्य पिकांकडे वळविण्यासाठी विस्तार कार्यकर्ते आणि शास्त्रज्ञांकडून प्रयत्न सुरू आहेत. त्यासाठी २०१६ ते २०१८ या काळामध्ये एक अभ्यास करण्यात आला. या अभ्यासामध्ये फाजिल्का जिल्ह्यातील क्षारामुळे बाधित असलेल्या नऊ गावांतील ३४ शेतकरी निवडण्यात आले. गावामध्ये मामू खेडा, किकर खेडा, कांदवल्ला (अबोहार मंडल), आलमगढ, सैदावाली (बलौना मंडल) आणि श्री मुक्तसर साहिब (पान्निवाला, बॉडीवाला, शेरनवाला आणि पिंद (मलौत मंडल) यांची निवड केली होती. या अभ्यासातून क्षारयुक्त आणि पाणथळ जमिनीमध्ये शेतकऱ्यांना परवडणाऱ्या आणि शाश्‍वत अशा पीक पद्धतीचा विकास करण्याचा प्रयत्न करण्यात आला. या पीक पद्धतीमध्ये अधिक क्षारता आणि अन्य ताणांसाठी सहनशील किंवा जुळवून घेणाऱ्या पिकांचे निवड करण्यात आली. क्षारतेचे प्रमाण आणि त्यातून उद्भवणाऱ्या समस्या ः मातीच्या तपासणीतून मातीचे गुणधर्म जाणून घेण्यात आले. ही माती क्षारयुक्त, सोडिअम क्षारांचे अधिक प्रमाण असलेली होती. १) फाजिल्का येथील जमिनीचा वापर ज्या पिकांसाठी प्रामुख्याने झाला (उदा. भात -गहू, कपाशी- गहू, किन्नो फळबाग), त्यानुसार विद्युत वाहकता आणि सामू वेगवेगळे होते. त्यांचे प्रमाण अनुक्रमे ०.६-७.४ डेसिसायमन प्रति मीटर आणि ७.६-९.३ इतके होते. येथील भूजलाची क्षारता ०.७-२.१ डेसिसायमन प्रति मीटर आणि पाणीपातळी खोली ०.६०-१.५० मीटर इतकी होती. २) मुक्तसर साहिब जिल्ह्यात प्रामुख्याने भात गहू ही पीक पद्धती असून, माती आणि भूजलाची क्षारता ही तुलनेने अधिक आणि बदलती होती. विद्यूत वाहकता १.१-१०.४ डेसिसायमन प्रति मीटर, सामू ७.८ ते ८.७ आणि पाण्याची क्षारता १.७-३.४ डेसिसायमन प्रति मीटर इतकी होती. पाणी पातळी ०.८-२.० मीटर खोलीवर होती. शाश्‍वत माहिती आणि बियांचे नेटवर्क तयार करताना... २०१३ ते २०१५ या काळात मलौत परिसरामध्ये पाणथळ आणि क्षारयुक्त जमिनीमध्ये गहू पिकाच्या केआरएल २१० या जातींची कार्यक्षमता चांगली मिळाली होती. या परीसरातील प्रगतिशील शेतकऱ्यांनी स्वतःहून करनाल येथील केंद्रीय मृदा क्षारता संशोधन संस्थेला भेट देत या जातीचे बियाणे मिळवले होते. स्वतःच्या शेतामध्ये लागवड व बीजोत्पादन करून अन्य शेतकऱ्यांना वितरण करण्यामध्ये मोलाचा सहभाग नोंदवला होता. त्यांच्या अनुभवाचा आणि प्रयोगाचा फायदा २०१६ ते २०१८ या काळात अबोहार भागामध्ये सुनियोजित प्रात्यक्षिक क्षेत्र घेताना झाला. या प्रयोगामध्ये कार्यरत सर्व घटकांकडून (उदा. करनाल येथील शास्त्रज्ञ, प्रगतिशील शेतकरी, बियाणे उत्पादक, कृषी विभाग आणि कृषी विज्ञान केंद्र इ.) सर्व अनुभव, माहिती यांचे संकलन करण्यात आले. तसेच बियाण्यांचेही नेटवर्क तयार करण्यात आला. लवकरच गहू जात केआरएल २१० ही केवळ अभ्यास करणाऱ्या आलेल्या फाजिल्का आणि श्री मुक्तसर जिल्ह्यातच नव्हे, तर अन्य क्षारपड आणि पाणथळ असलेल्या लुधियाना, कपूरथाला, बर्नाला, अमृतसर आणि पतियाळासारख्या आजूबाजूच्या जिल्ह्यातील बहुतांश शेतकऱ्यांकडूनही उचलली गेली. शेती पातळीवरील परिणाम १) केआरएल २१० या गहू जातीने क्षारता आणि पाणथळ जमिनीमध्येही चांगले उत्पादन दिले. क्षारयुक्त जमिनीमध्ये उत्पादन - ४.४ ते ५.६ टन प्रति हेक्टर (सरासरी ५.१ टन प्रति हेक्टर) मध्यम ते उच्च क्षारयुक्त आणि पाणथळ होण्याची समस्या असलेल्या जमिनीमध्ये उत्पादन - ३.६ ते ४.१ टन प्रति हेक्टर. तुलनेसाठी अन्य स्थानिक लोकप्रिय जातींचे उत्पादन ः ३.३ ते ३.६ टन प्रति हेक्टर. २) जिथे क्षारांचे प्रमाण (विद्यूत वाहकता ३ डेसिसायमन प्रति मीटर) तुलनेने कमी होते, तिथे उत्पादनाचे प्रमाण लक्षणीय अधिक (६.५-६.८ टन प्रति हेक्टर) मिळाले. (छायाचित्र १ ड.) ३) केआरएल २१० या गहू जातीच्या उत्पादनाचा खर्च अन्य जातींच्या तुलनेमध्ये १५ टक्क्यांनी कमी आला. ४) गेल्या काही वर्षांमध्ये केआरएल २१० या गहू जातीचा प्रसार पंजाबातील अन्य जिल्ह्यांमध्येही चांगल्या प्रकारे होत आहे. ५) अमृतसर जिल्ह्यामध्ये वाटाणा आणि गहू या पीक पद्धतीमुळे शेतकऱ्यांना चांगला फायदा होत आहे. विशेषतः जमिनीची सुपीकता टिकवणे, चाऱ्याची समस्या सुटणे यासाठी अधिक फायदा होत आहे. ६) अमृतसर आणि लुधियाना, पतियाळा इ. अन्य जिल्ह्यांमध्ये केआरएल २१० जातीचे उत्पादन सामान्य स्थितीत ४.०-४.५ टन प्रति हेक्टर, पाण्याचा ताण असलेल्या स्थितीमध्ये ३.०-३.५ टन प्रति हेक्टर मिळाले. ७) या अभ्यासामध्ये शेतकऱ्यांनी केआरएल २१० जातीला चारपैकी तीन गुण दिले. कारण त्यांच्या मते तिची क्षारयुक्त, पाणथळ जमिनीमध्ये उच्च उत्पादनक्षमता आणि वातावरण बदलांच्या स्थितीतही उत्पादन देण्याची क्षमता महत्त्वाची आहे. ८) प्रयोग, प्रात्यक्षिके या सोबतच शेतकऱ्यांनी स्वतः घेतलेला पुढाकार यामुळे केआरएल २१० गहू जातीचे क्षेत्र वाढत चालले आहे. वेगवेगळ्या जिल्ह्यातील या जातीखालील जमिनीचे क्षेत्र ९० हजार हेक्टर असल्याचा दावा संशोधकांनी केला आहे. धोरणात्मक परिणाम जमिनीची वाढलेली क्षारता, पाणथळपणा अशा स्थितीतही सुनियोजित विस्तार पद्धती आणि शेतकऱ्यांचा स्वयंस्फूर्तपणा यांचा एकत्रित परिणाम मोठ्या प्रमाणात दिसून आला. केआरएल २१० या जातीमुळे शेतकऱ्यांच्या उत्पन्नात वाढ झाली. एकूणच धोरणात्मक पातळीवर क्षारपड, पाणथळ जमिनीच्या सुधारणेच्या प्रक्रियेत अशा सहनशील जातींचा समावेश करण्याची आवश्यकता आहे. (स्रोत ः भारतीय कृषी संशोधन परिषदे अंतर्गत केंद्रीय मृदा क्षारता संशोधन संस्था, करनाल.)

Read the latest agriculture news in Marathi and watch Agriculture videos on Agrowon. Get the latest updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Agriculture Jugad, and Farmer Success Stories.

ताज्या घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
www.agrowon.com