शेतीमध्ये ड्रोन तंत्रज्ञानाचा वापर

शेतीसमोरील समस्यांमध्ये बदलते हवामान, मजुरांची कमतरता, निविष्ठांचा वाढता खर्च, कमी होणारे सिंचनाचे पाणी यांचा समावेश होतो. या समस्यांवर डिजिटल तंत्रज्ञानाने कशा प्रकारे मार्ग काढता येईल, याबाबत संशोधक विचार करत आहेत. त्यामध्ये ड्रोन तंत्रज्ञान आश्‍वासक ठरणार आहे.
Use of drone technology in agriculture
Use of drone technology in agriculture

शेतीसमोरील समस्यांमध्ये बदलते हवामान, मजुरांची कमतरता, निविष्ठांचा वाढता खर्च, कमी होणारे सिंचनाचे पाणी यांचा समावेश होतो. या समस्यांवर डिजिटल तंत्रज्ञानाने कशा प्रकारे मार्ग काढता येईल, याबाबत संशोधक विचार करत आहेत. त्यामध्ये ड्रोन तंत्रज्ञान आश्‍वासक ठरणार आहे. पिकांच्या हाताळणीसाठी स्वयंचलित वाहनांची निर्मिती केली जात आहे. याद्वारे पीक हाताळणी, रोगनिदान करणे, पिकांची काढणी करणे, त्यांची वाहतूक करणे शक्य होईल़. त्याचाच पुढील भाग म्हणजे आकाशातून उडत जाणारे ड्रोन होय. पूर्वी सैनिकी कामांसाठी प्रामुख्याने याचा वापर होत असे. मात्र अलीकडे हे तंत्र तुलनेने सोपे आणि वापरण्यास सोईस्कर बनल्याने अन्य नागरी कामांसाठी वापरण्याच्या चाचण्या जगभर सुरू आहेत. एका आकडेवारीनुसार, सन २०१५ मध्ये सुमारे दहा लाख ड्रोनची जगभरात विक्री झाली होती. त्यात आता कितीतरी पटीने वाढ झाली आहे. परदेशात कृषी क्षेत्रातही ड्रोन तंत्रज्ञानाच्या वापराच्या विविध शक्यता पडताळून पाहिल्या जात आहेत. पाश्‍चात्त्य देशांमध्ये सलग व विस्तीर्ण क्षेत्रावर पसरलेल्या पिकांवर लक्ष ठेवण्यासाठी ड्रोन तंत्रज्ञानाचा वापर वाढत आहे. ड्रोनला जोडलेले कॅमेरे अत्यंत उच्च दर्जाचे असल्याने एका जागेवर बसून पिकांच्या वाढ, कीड-रोगाचा प्रादुर्भाव, सिंचन योग्य प्रमाणात पोचते किंवा नाही, अशा बाबींवर लक्ष ठेवता येते. फवारणीसाठी ड्रोन

  • ड्रोनमध्ये सध्या १० लिटर द्रावण फवारणीची क्षमता आहे. याद्वारे एकसारखी फवारणी शक्य होते. एका चाचणीतील निष्कर्षाप्रमाणे अशा फवारणीसाठी शेतकऱ्यांना एकरी ८०० रुपये मोजावे लागतात. शेतकऱ्यांना मजुरीही इतकीच लागते. मात्र ड्रोनच्या फवारणीमुळे शेतकऱ्यांची काम वेगाने होणार आहे.
  • -मजुरांमुळे शेतातल्या नाजुक पिकांची होणारी नासधूसही ड्रोन फवारणीमुळे होणार नाही.
  • सर्वेक्षणासाठी ड्रोन भारतात शेतीमध्ये फवारणी, मॅपिंग, पिकांचे निरीक्षण आणि जमिनीच्या मूलभूत घटकांचे मूल्यांकन करण्यासाठी ड्रोन वापरले जाऊ लागले आहे. ड्रोन व विविध प्रकारच्या सेन्सरच्या साह्याने जमिनीतील व पिकातील अन्नद्रव्यांची माहिती संकलित करता येते. संकलित केलेल्या या माहितीचे एकत्रित विश्‍लेषण केले जाते. पुढील टप्प्यामध्ये या माहितीला यांत्रिक शिकावूपणांची (मशिन लर्निंग) जोड देता येईल. यामुळे पिकांच्या गरजा जाणून, आपोआप योग्य प्रमाणात खते, कीटकनाशके आणि पाणी देता येऊ शकते. मर्यादा 

  • भारतामध्ये ड्रोन उत्पादक कंपन्या अद्याप परदेशी घटकांवर अवलंबून आहेत. भारतीय बनावटीच्या ड्रोनची निर्मिती हे आव्हान आहे.
  • ड्रोन निर्मितीचा खर्च मर्यादित ठेवणे हे दुसरे आव्हान असणार आहे. कारण भारत हा अल्पभूधारकांचा देश आहे. येथे अधिक महागडी यंत्रे शेवटच्या शेतकऱ्यांपर्यंत पोचवणे तसेही अवघड आहे.
  • ड्रोन तंत्रज्ञानाचा प्रसार वाढण्यासाठी एखाद्या विशिष्ट कामासाठी कमी खर्चात ड्रोनची निर्मिती केली गेली पाहिजे.
  • या तीन मर्यादांवर काम केले गेल्यास येत्या काही वर्षांत ड्रोन शेतकऱ्यांच्या शेतात काम करताना दिसतील.
  • वापराच्या शक्यता 

  • प्रत्येक हंगामात प्रत्येक पिकाचे पेरणी क्षेत्र अचूकपणे मोजता येईल.
  • ‘नॅनो मिस्ट टेक्नॉलॉजी’ वापरून ड्रोनद्वारे कीडनाशकांची फवारणी शक्य.
  • रोगासाठी अनुकूल हवामान आणि परिसरातील प्रादुर्भावानुसार शेतातील रोगांचे पूर्वानुमान कळणे शक्य.
  • छायाचित्रांद्वारे पानांवर लक्षणांवरून रोगाचे निदान करणे शक्य.
  • जंगलामध्ये बियांचे दुर्गम भागांपर्यंत पोचवण्यासाठी ड्रोन तंत्र उपयोगी ठरू शकते.
  • आपद्‍ग्रस्त परिसरामध्ये वेगाने जाऊन नुकसानीबरोबर जीवितहानीचा अंदाज घेणे शक्य. 
  • संपर्कः  गोपाळ रनेर, (कनिष्ठ अभियंता), ९८८११०३७८४ डॉ. अविनाश काकडे, (वरिष्ठ संशोधन सहायक), ८०८७५२०७२० (राष्ट्रीय कृषी उच्च शिक्षण प्रकल्प, वसंतराव नाईक मराठवाडा कृषी विद्यापीठ, परभणी.)

    Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

    ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

    Related Stories

    No stories found.
    Agrowon
    agrowon.esakal.com