सूक्ष्म हवामानासाठी वारा प्रतिबंधक सजीव कुंपण उपयुक्त

थंड किंवा उष्ण वाऱ्यामुळे पिकाचे किंवा पशुधनाचे मोठे नुकसान होते. हे टाळण्यासाठी वारा प्रतिबंधकांची उभारणी केली जाते. विविध प्रकारच्या झाडांचे सजीव कुंपण यासाठी अत्यंत उपयुक्त ठरते.
सूक्ष्म हवामानासाठी वारा प्रतिबंधक सजीव कुंपण उपयुक्त
सूक्ष्म हवामानासाठी वारा प्रतिबंधक सजीव कुंपण उपयुक्त

थंड किंवा उष्ण वाऱ्यामुळे पिकाचे किंवा पशुधनाचे मोठे नुकसान होते. हे टाळण्यासाठी वारा प्रतिबंधकांची उभारणी केली जाते. विविध प्रकारच्या झाडांचे सजीव कुंपण यासाठी अत्यंत उपयुक्त ठरते. मात्र त्याची उभारणी नेमक्या कशा प्रकारे केली पाहिजे, याची माहिती घेऊ.

महाराष्ट्राचा बहुतांश भाग हा कोरडवाहू आणि शुष्क प्रदेशात येतो. पाण्याचे दुर्भीक्ष आणि असुरक्षित पावसाळा यामुळे उन्हाळ्यात उन्हाचे चटके येथेच अधिक बसतात. शेती क्षेत्रातील नुकसानीसाठी पाणी हेच कारण ठरते. यासोबतच अलीकडील काही वर्षांमध्ये  वातावरण बदलाच्या स्थितीत गारपीट, थंडीची किंवा उष्णतेची लाट आणि वादळी वारे यांची भर पडली आहे. 

हवामानाची बदलती स्थिती  बंगालच्या उपसागरात आलेल्या ‘निवार’ चक्रीवादळाने तमिळनाडूमध्ये पूर परिस्थिती निर्माण केली होती आणि मोठ्या प्रमाणावर शेती पिकांचे व वित्तहानी झाल्याचे आपण पाहिले. ते निवळल्यानंतर पुन्हा कमी हवेच्या दाबाचे एक क्षेत्र बंगालच्या उपसागरात निर्माण झालेले असून, निवार प्रमाणेच तमिळनाडू, पुद्दुचेरी व दक्षिणेच्या प्रदेशांमध्ये १-३ डिसेंबरदरम्यान जोरदार पावसाची शक्यता भारतीय हवामान विभागाने वर्तविली आहे. या चक्रीवादळाचा परिणाम सर्वत्र वेगवेगळ्या पातळीवर दिसून आला. अनेक ठिकाणी ढगाळ वातावरण, जोरदार वारे आणि रात्रीच्या तापमानातील सततची चढ-उतार अशी हवामान स्थिती अनुभवास आली.  विविध प्रकारच्या वाऱ्यांमुळेही हवामानामध्ये बदल होतात. त्याचे परिणाम पिकांवर तीव्रतेने होत असतात. उदा. हिवाळ्यामध्ये (नोव्हेंबर ते फेब्रुवारी) थंड वारे आणि उन्हाळ्यात (मार्च ते जून) उष्ण वारे  सर्वसाधारपणे दरवर्षी वाहत असतात. या थंड किंवा उष्ण वाऱ्यांमुळे जवळपास जमिनीची धूप ४० मि. मि. पर्यंत होते (संदर्भ - नंदिनी व शक्तीनाथन, २०१७), तर पीक उत्पादनांमध्ये ५ ते ५० टक्‍क्‍यांपर्यंत घट येते. जोरदार वाऱ्यामुळे किंवा वादळी वाऱ्यामुळे केळी, ऊस, भाजीपाला आणि फळपिके यांचे ७० ते १०० टक्के नुकसान होते. (सुरेंद्र सिंग आणि सहकारी, २०१८). अशा वातावरण बदलांच्या स्थितीमध्ये पिकांच्या वाढीवर विपरीत परिणाम होतो. त्याचा अंतिम परिणाम उत्पादनाचा दर्जा घसरणे, उत्पादनामध्ये घट येणे असा होतो. हे नुकसान काही प्रमाणात तरी कमी करण्यासाठी वारा प्रतिबंधक सजीव कुंपण निश्चितच उपयोगी ठरू शकते. मात्र, सजीव कुंपणाची उभारणी करताना काही तत्त्वे लक्षात घेणे आवश्यक आहेत. 

 • आपल्या शेतामध्ये येणारे वारे कोणत्या दिशेकडून येतात,  याचाही अभ्यास असणे महत्त्वाचे आहे. परंतु आपल्याकडे सर्वसाधारणपणे हिवाळ्यामध्ये आग्नेय-ईशान्य दिशेकडून येतात तर उन्हाळ्यामध्ये नैऋत्य-वायव्य या दिशेकडून वारे येतात. त्यामुळे सजीव कुंपण लावताना त्याची ओळींची दिशा सर्वसाधारणपणे पूर्व व पश्चिम बाजूने उत्तर ते दक्षिण अशी लागवड केलेली असावी. (छायाचित्र अ, ब पहा.)
 • सर्वसाधारणपणे सजीव कुंपणामुळे वारा प्रतिबंधक वृक्षाच्या उंचीच्या प्रमाणात वारा जाणाऱ्या दिशेकडील १५ ते २५ पट क्षेत्राचे संरक्षण होते, तर वाहणारा वारा येणाऱ्या दिशेकडील बाजूचे जवळपास पाच पट क्षेत्राचे संरक्षण होते. (आकृती १ व २ आणि फोटो अ व ब पहा.)
 • पिकाचे संरक्षण 
 • पीक आणि पशुधन या दोहोंसाठी थंडीची हुडहुडी किंवा उन्हाचे चटके, तीव्रता यांचा फटका बसू शकतो. तसेच संरक्षित शेतीसाठी उभारल्या जाणाऱ्या हरितगृह किंवा शेडनेट, पशुधनांसाठी उभारलेले गोठे, रेशीम शेतीसाठी उभारलेले शेड यांचे वेगाने वाहणाऱ्या वाऱ्यापासून संरक्षण करणे आवश्यक ठरते. त्याच प्रमाणे पिकामध्ये आवश्यक ते सूक्ष्म वातावरणाच्या निर्मितीसाठीही सजीव कुंपण उपयुक्त ठरते. 
 • वारा ज्या दिशेने येतो, त्या दिशेला वाऱ्याची दिशा असे म्हणतात. वारा ज्या दिशेला जातो, त्या दिशेला वारा जाण्याची दिशा असे म्हणतात. आपल्याला वारा ज्या दिशेकडून येतो, म्हणजेच वाऱ्याच्या दिशेला वारा प्रतिबंधक सजीव कुंपणाची लागवड करावी लागते. ही लागवड करताना आपले शेत किंवा प्रभावित क्षेत्राचे झाडांच्या ओळीपासून किती अंतरावर आहे, हे अत्यंत महत्त्वाचे ठरते.
 • सजीव कुंपणासाठी वृक्षलागवड करताना...     निवडलेली झाडे ही पाणी किंवा अन्नद्रव्ये या दृष्टीने मूळ पिकाशी स्पर्धा करणारी नसावीत.      शक्यतो झाडांची उंची, पर्णभार आणि त्याचे वयोमान या गोष्टीचा विचार करून निवड करावी.     या झाडांपासून प्रत्यक्ष शेतीक्षेत्राला काही तरी फायदा व्हावा. उदा. बीज, जनावरांना चारा, शेती किंवा विक्रीसाठी उपयुक्त लाकूड अथवा मानवी आहारासाठी फळे किंवा भाजीपाला मिळावा. यावरील फुलोऱ्यामुळे मधमाशीपालन शक्य व्हावे. म्हणजेच मधाद्वारे उत्पन्न सुरू होते.      शेती परिसरात पडलेल्या पालापाचोळ्यामुळे सेंद्रिय खत उपलब्ध व्हावे.      मुख्य पिकांवरील कीड व रोगांसाठी ही झाडे यजमान (होस्ट) किंवा खाद्य (अल्टरनेट होस्ट) नसावीत.      केवळ एकाच प्रकारच्या झाडांची लागवड करण्याऐवजी आपल्या परिसरातील जैवविविधता जोपासण्यास प्राधान्य द्यावे. त्यातून विविध प्रकारचे उपयोगी किटक, पक्षी, सजीव यांना आश्रयस्थान मिळते. 

  प्रयोगाचे निष्कर्ष  २०१७ मध्ये नंदिनी व शक्तीनाथन या संशोधकांनी १४ देशांतील ६७६ शेतांमधील वारा प्रतिबंधक सजीव कुंपणाचा अभ्यास केला. त्यात आढळून आलेल्या महत्त्वाच्या बाबी पुढील प्रमाणे,  सोयाबीन आणि मका पिकात १२ ते १३ टक्के वाढ फक्त वारा प्रतिबंधक सजीव कुंपणाची लागवड केल्याने झाली. याचे कारण म्हणजे वारा प्रतिबंधक सजीव कुंपणाची लागवड केल्याने पिकाचा विकास होण्याकरिता उपयुक्त असे सूक्ष्म वातावरण निर्माण होते. त्याचा फायदा पिकांच्या उत्पादन वाढीसाठी होतो. सूक्ष्म हवामानामध्ये मृद बाष्पाची वाढ, जमिनीचे आणि हवेतील तापमान स्थिर राहणे, सापेक्ष आर्द्रता व कार्बन डायऑक्साइड याची पातळी योग्य राहणे असे परिणाम दिसतात. यामुळे पिकांची वाढ आणि विकास चांगला होतो. यामुळे फुले - फळे लवकर लागणे, तसेच योग्यवेळी परिपक्व होणे यास मदत होते. 

   ः डॉ. प्रल्हाद जायभाये, ७९८०६८४१८९ (कृषी हवामान शास्त्रज्ञ आणि प्राचार्य, कृषी तंत्र विद्यालय, जालना, अंतर्गत वसंतराव नाईक मराठवाडा कृषी विद्यापीठ, परभणी.

  Read the latest agriculture news in Marathi and watch Agriculture videos on Agrowon. Get the latest updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Agriculture Jugad, and Farmer Success Stories.

  ताज्या घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

  Related Stories

  No stories found.
  Agrowon
  www.agrowon.com