प्रयोगशीलतेला दिली तंत्रज्ञानाची जोड

प्रयोगशीलता आणि तंत्रज्ञान वापर या दोन बाबी शेतीत अत्यंत महत्त्वाच्या आहेत. वखारी (ता. जि. जालना) येथील निवृत्ती घुले यांनी खरपुडी येथील कृषी विज्ञान केंद्राच्या माध्यमातूनराबविल्या जाणाऱ्या सुधारित तंत्र प्रकल्पात सहभाग घेतला. त्यातून शेती व्यवस्थापनात बदल करूनत्यानुसार किफायतशीर शेती करणे त्यांना शक्य झाले आहे.
प्रयोगशीलतेला दिली तंत्रज्ञानाची जोड
-निवृत्ती घुले यांच्या शेतातील स्वयंचलित हवामान यंत्र.

प्रयोगशीलता आणि तंत्रज्ञान वापर या दोन बाबी शेतीत अत्यंत महत्त्वाच्या आहेत. वखारी (ता. जि. जालना) येथील निवृत्ती घुले यांनी खरपुडी येथील कृषी विज्ञान केंद्राच्या माध्यमातून राबविल्या जाणाऱ्या सुधारित तंत्र प्रकल्पात सहभाग घेतला. त्यातून शेती व्यवस्थापनात बदल करून त्यानुसार किफायतशीर शेती करणे त्यांना शक्य झाले आहे.   वखारी (ता. जि. जालना) येथील निवृत्ती रंगनाथ घुले यांची वडिलोपार्जित पाच एकर शेती आहे. त्यात पूर्वी कपाशी, मूग, बाजरी आदी पिके व तीही पारंपरिक पद्धतीनुसार घेतली जायची. सुधारित तंत्रज्ञानाचा अवलंब सुरू केल्यानंतर पीक पद्धती व एकूणच शेती व्यवस्थापनात बदल करणे त्यांना शक्य झाले. कपाशी, भुईमूग, सोयाबीन व विविध भाजीपाला पिकांचे बीजोत्पादन ते घेतात. सिंचनासाठी दोन विहिरी व बोअर असे स्रोत आहेत. कपाशीचे अपेक्षित उत्पादन घेण्यात हातखंडा असलेले शेतकरी म्हणून निवृत्तीरावांनी ओळख मिळवली आहे. सुधारित तंत्राचा अवलंब सुमारे २० वर्षांपूर्वी शेतीत उतरलेल्या निवृत्तीरावांनी कपाशी पीक कायम ठेवले. मात्र लागवडीची पद्धत बदलली. पूर्वीची चार बाय चार फूट अंतरावरील लागवड चार बाय सव्वा फूट व त्यानंतर पाच बाय सव्वा फुटांवर आणली. गुलाबी बोंड अळीचे आक्रमण होऊ लागल्यापासून कपाशीचे क्षेत्र तीन एकरांहून कमी करून ते दीड एकरावर आणले आहे. बीजोत्पादन व तंत्रज्ञान सन २०१८ पासून दोडका, भोपळा, वांगी, भेंडी आदी फळभाज्यांचे बीजोत्पादन निवृत्तीराव बारमाही घेतात. दहा गुंठ्यांपासून सुरू केलेला हा प्रयोग आता जवळपास चार एकरांपर्यंत पोहोचला आहे. कपाशीची फरदड न घेता डिसेंबरनंतर त्या क्षेत्रात बीजोत्पादन घेण्यात येते. दोन फूट रुंद, एक फूट उंच गादीवाफ्यावर (बेड) शेणखत, बेसल डोस, ठिबक, त्याद्वारे खते व मल्चिंग असे नियोजन असते. एकूण व्यवस्थापनातून उत्पादनात २० ते ४० टक्‍क्‍यांपर्यंत वाढ होत असल्याचे ते सांगतात. प्रकल्पात सहभाग सन २०१२ च्या दरम्यान निवृत्तीरावांनी ‘डब्ल्यूडब्ल्यूडब्ल्यू’ संस्थेच्या ‘बेटर कॉटन इनिशिएटिव्ह (बीसीआय) या प्रकल्पात सहभाग घेतला. खरपुडी (जालना) कृषी विज्ञान केंद्राच्या समन्वयातून हा प्रकल्प राबवण्यात आला. गावातील अन्य शेतकरीही त्यात सहभागी झाले. त्या अंतर्गत स्वयंचलित हवामान यंत्र, ‘ड्रीप ऑटोमेशन सुविधा बसविण्यात आल्या आहेत. तंत्रज्ञान स्वीकाराचे झालेले फायदे

 • किडी-रोगांची आगाऊ सूचना मिळाल्याने नियंत्रण उपाय वेळेत करणे शक्य झाले.
 • फवारण्यांत बचत झाली.
 • पाऊस किती पडला हे समजल्याने रब्बी हंगामाचे नियोजन करता आले.
 • लागवड पद्धतीत बदल झाला.
 • पूर्वी गोण्यांच्या प्रमाणात खत न देता त्यांच्या मात्रा जाणून घेऊन प्रमाणशीर वापर सुरू केला.
 • किडी-रोगांची ओळख व आर्थिक नुकसान पातळी ओळखून शिफारशीत कीडनाशकांचा वापर सुरू केला.
 • ठिबकच्या माध्यमातून पाण्याचा कार्यक्षम वापर होऊ लागला.
 • कोणत्याही ठिकाणी असताना पिकाच्या गरजेनुसार मोबाईलमधील ‘ॲप’चा वापर करून सिंचनाचे नियोजन करता आले.
 • जमिनीचे आरोग्य सांभाळण्याची सवय लागली.
 • कपाशीची केवळ शाकीय वाढ महत्त्वाची नाही तर फळफांद्या, बोंडांची संख्या याकडे विशेष लक्ष दिले.
 • सन २०१९ पासून केव्हीकेतर्फे राबविल्या जाणाऱ्या एकात्मिक कीडनियंत्रण कार्यक्रमांतर्गत
 • वखारी गावात जवळपास २०० एकरांवर एकरी १६ कामगंध सापळे लावण्यात आले.
 • ‘मास ट्रॅपिंग’चा हा प्रयोग गुलाबी बोंड अळीच्या नियंत्रणासाठी करण्यात आला.
 • हवामान केंद्रांची उभारणी जालना जिल्ह्यातील २०९ गावांमध्ये शाश्‍वत पद्धतीने कापूस शेती प्रकल्पासंदर्भात काम सुरू आहे. या अंतर्गत हवामानाचा लहरीपणा, पावसातील अनियमितता आदी आव्हानांवर उपाय शोधण्यात येत आहेत. त्याचाच भाग म्हणून स्वयंचलित हवामान केंद्रे जिल्ह्यातील १९ गावांमध्ये बसविण्यात आली आहे. त्याद्वारे पर्जन्यमान, तापमान, आर्द्रता आदी घटकांची माहिती तसेच पुढील सात दिवसांचा अंदाज शेतकऱ्यांना देण्यात येतो. या सेवेचा लाभ २०९ गावातील सुमारे ४० हजार शेतकऱ्यांना होत आहे. स्वयंचलित सिंचन यंत्रणा जिल्ह्यातील सुमारे १०० शेतकऱ्यांकडे ‘ड्रीप ऑटोमेशनचे प्रात्यक्षिकरूपी मॉडेल कार्यान्वित करण्यात आले आहे. त्या आधारे शेतकरी सिंचन व्यवस्थापन करतात. शेतकऱ्यांना वीज पंप सुरू करण्यासाठी रात्री शेतात जाण्याची गरज भासत नाही. मजूर आणि वेळेचीही बचत होते आहे. ॲपची सुविधा प्रकल्पांतर्गत ‘कॉटन डॉक्‍टर जालना’ ॲप विकसित केले आहे. त्यासाठी ४० हजार शेतकऱ्यांच्या शेताचे ‘जिओ टॅगिंग’ केले आहे. प्रत्येक शेतकऱ्याला त्याचा ‘लॉग इन आयडी’ दिला आहे.त्यानुसार जमिनीचे आरोग्य, ओलावा, कीड- रोगांची परिस्थती, हवामान अंदाज, बाजारभाव आदी माहिती पाहता येते. ‘टेक्‍स्ट’, व्हॉइस मेसेज, छायाचित्रे, व्हिडिओ यांच्या माध्यमातून शंका विचारून तज्ज्ञांकडून त्यावर उत्तरे मिळवता येतात. ..... संपर्क- निवृत्ती घुले, ९९२३३८९५८४ सचिन गायकवाड, ८६६८७१०१६२ (बीसीआय’ प्रकल्प व्यवस्थापक, जि. जालना)

  Read the latest agriculture news in Marathi and watch Agriculture videos on Agrowon. Get the latest updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Agriculture Jugad, and Farmer Success Stories.

  ताज्या घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

  Related Stories

  No stories found.
  Agrowon
  www.agrowon.com