शेतीत यांत्रिकीकरण रूजवलेले चौधरी

ममुराबाद (ता.. जि. जळगाव) येथील मनोज सदाशिव चौधरी चार वर्षांपासून रुंद वरंबा सरी म्हणजेच बीबीएफ यंत्राद्वारे खरिपात कापूस, उडीद, सोयाबीन तर रब्बीत हरभरा, गहू आदी पिके घेत आहेत. या यंत्राच्या वापराने अतिपाऊस किंवा प्रतिकूल हवामानात चांगले उत्पादन घेण्याबरोबर मातीची सुपीकता टिकवणे, बियाण्यात व उत्पादन खर्चात बचत करणे शक्य झाले आहे.
बीबीएफ यंत्राचा वापर.
बीबीएफ यंत्राचा वापर.

ममुराबाद (ता.. जि. जळगाव) येथील मनोज सदाशिव चौधरी चार वर्षांपासून रुंद वरंबा सरी म्हणजेच बीबीएफ यंत्राद्वारे खरिपात कापूस, उडीद, सोयाबीन तर रब्बीत हरभरा, गहू आदी पिके घेत आहेत. या यंत्राच्या वापराने अतिपाऊस किंवा प्रतिकूल हवामानात चांगले उत्पादन घेण्याबरोबर मातीची सुपीकता टिकवणे, बियाण्यात व उत्पादन खर्चात बचत करणे शक्य झाले आहे. ममुराबाद (ता  जि.जळगाव) येथील मनोज सदाशिव चौधरी यांची १२ एकर शेती आहे. भाडेतत्वावर ते सुमारे ४० एकर शेती कसतात. दोन कूपनलिका, दोन कृषीपंप, छोटा व मोठा असे दोन ट्रॅक्टर्स त्यांच्याकडे आहेत. तीस वर्षांपासून ट्रॅक्टर व ट्रॅक्टरचलित यंत्रणा ते हाताळतात. परिसरात सर्वप्रथम त्यांनी ट्रॅक्टरचलित रोटाव्हेटर घेतला. आत्तापर्यंत सात मोठे ट्रॅक्टर वापरले असून त्यातील बिघाड ओळखणे, दुरुस्ती करणे यात ते पारंगत आहेत. तीन वर्षे तांत्रिक शिक्षण व दोन वर्षे रसायन अभियांत्रिकी पदविकेचे शिक्षण त्यांनी घेतले आहे. वयाच्या अठराव्या वर्षापासून ते ट्रॅक्टर चालवितात. बारमाही दोन ट्रॅक्टरचालक त्यांच्याकडे आहेत. बीबीएफ यंत्राचा वापर रुंद वरंबा सरी पद्धतीने अर्थात ‘बीबीएफ’यंत्राद्वारे सुमारे चार वर्षांपासून खरिपात कापूस. उडीद, सोयाबीन व रब्बीत हरभरा, गहू आदी पिके चौधरी घेत आहेत. ममुराबाद येथील कृषी विज्ञान केंद्राचे प्रमुख डॉ. हेमंत बाहेती, विषय विशेषज्ञ (कृषी अभियांत्रिकी) वैभव सूर्यवंशी, विषय विशेषज्ञ (विस्तार) विशाल वैरागर, विषय विशेषज्ञ किरण जाधव यांचे मार्गदर्शन त्यांना लाभते. ‘बीबीएफ’ या ट्रॅक्टरचलित यंत्राला चार दाते आहेत. अलीकडे पाच दात्यांचे यंत्रही उपलब्ध झाले आहे. विविध पिकांत वापर शक्य मिनी ट्रॅक्टरचलित यंत्र सुमारे पाच फुटांचे आहे. यंत्रात पेरणीच्या दात्यांवर स्वतंत्र बियाणे संचय पेट्या (कंपार्टमेंटस) असतात. यामुळे यंत्राच्या मदतीने एकाच वेळी आंतरपीक पेरणीही शक्य होते. कापूस, तूर, मूग, उडीद, मका, बाजरी, ज्वारी, भुईमूग, सोयाबीन, तीळ अशा विविध पिकांमध्ये या तंत्राचा वापर करता येतो. कापसाचे साडेतीन एकर, उडीद, सोयाबीन प्रत्येकी पाच एकर असा त्यांचा यंत्रवापर आहे. हेच यंत्र पेरणीसह आंतरमशागत व फवारणीसाठीचेही कामही करते. उडीद, सोयाबीन या पिकांना खते देण्यासाठी बीबीएफ यंत्रात काही बदल केले आहेत. लागवड अंतरानुसार कापूस पिकातही या यंत्राच्या मदतीने खते देणे शक्य होते. खर्चात मोठी बचत यंत्राच्या मदतीने दिवसभरात चांगल्या वाफसा स्थितीत एक हेक्टरवर आंतरमशागत करणे चौधरी यांनी शक्य झाले आहे. बैलजोडीच्या साह्याने आंतरमशागतीसाठी जो वेळ व खर्च लागतो त्या तुलनेत वेळ व उत्पादन खर्चात ५० टक्के बचत झाली आहे. भाडेतत्त्वावरील एक हेक्टर क्षेत्रात सोयाबीन किंवा हरभरा पिकातील आंतमशागतीसाठी सुमारे पाच ते सहा हजार रुपये खर्च येतो. पण ‘बीबीएफ’मुळे हा खर्च निम्म्यावर आला आहे. सोयाबीनच्या वेळेस मजूरटंचाई असते. या काळातही हे यंत्र दिलासादायक ठरल्याचे चौधरी सांगतात. अतिपावसात पिकाचा बचाव चौधरी यांची जमीन काळी कसदार आहे. अतिपावसामुळे त्यात पाणी साठले तर हंगामाचा बराचसा कालावधी वाया जाण्याची भीती असते. उत्पादनही ६० ते ७० टक्के कमी येते. या समस्येवरही बीबीएफ यंत्रणा मात करणारी आहे. वरंब्यानजिकच्या सरीतून पावसाचे पाणी वाहून जाते. पावसात अनेकदा मातीचा वाहून जाणारा सुपीक थर वाचविण्याचे कामही ‘बीबीएफ’ तंत्र करते. तसेच पाऊस कमी असला तरीदेखील ‘बीबीएफ’ने पेरणी केलेल्या सोयाबीन किंवा अन्य पिकांत पाण्याचा फारसा ताण सुरवातीला जाणवत नाही. बियाण्यात बचत, उत्पादनात वाढ प्रचलित पद्धतीत सोयाबीन पिकात एकरी ३० किलोपर्यंत बियाणे लागते. काही शेतकरी एकरी ३५ किलोपर्यंत बियाणे वापरतात. परंतु ‘बीबीएफ’ तंत्राद्वारे एकरी २० ते २२ किलो बियाणे लागते. त्यादृष्टीने एकरी ८ ते १० किलोपर्यंत बियाणे बचत करणे शक्य झाले. त्यावरील सुमारे २५ टक्के खर्च वाचविता आला. हरभरा व कपाशीच्या बियाण्यातही अशीच बचत करणे शक्य झाले. दोन वर्षे अति पाऊस असताना किंवा प्रतिकूल हवामानातही सोयाबीनचे एकरी पाच क्विंटल, उडदाचे एकरी चार तर हरभऱ्याचे एकरी १० क्विंटलपर्यंत उत्पादन घेणे चौधरी यांना शक्य झाले आहे. अतिपावसात कपाशीचे एकरी सात क्विंटल उत्पादन गेले दोन हंगाम मिळाले आहे. यंदाही अति पाऊस झाला असताना एकरी सात क्विंटलपर्यंत उत्पादन मिळेल अशी चौधरी यांना अपेक्षा आहे. ट्रॅक्टरचलित फवारणी व फिल्टर मिनी ट्रॅक्चरचलित एचटीपी पंपाद्वारे फवारणी करण्यासाठी स्वतंत्र सांगाडा तयार करून ३० फूट लांबीच्या लवचिक नळ्या जोडल्या आहेत. पंपाचा ड्रम पाण्याने भरण्यासाठी १२ व्होल्ट क्षमतेचे दोन पंप लावले आहेत. यात ट्रॅक्टर सुरू न ठेवता ड्रम पाण्याने भरला जातो. यात एक लिटरपर्यंत इंधनबचत होते. हे पंप एका संस्थेकडून मागविले आहेत. काही वर्षांपूर्वी तलावातील पाणी उपसा करतेवेळी त्यातील गाळ व कचरा वेगळा करण्यासाठी ‘फिल्टर’ चौधरी यांनी तयार केला होता. ऊस लागवड व आंतरपीक पेरणी यंत्रही विकसित केले होते. या प्रयोगशीलतेची दखल विविध संस्थांनी घेतली आहे. कृषी विभागाने त्यांना संशोधक शेतकरी म्हणून गौरविले आहे. मनोज चौधरी- ९०२२०५९४९४, ९४२२१९३०६५

Read the latest agriculture news in Marathi and watch Agriculture videos on Agrowon. Get the latest updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Agriculture Jugad, and Farmer Success Stories.

ताज्या घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
www.agrowon.com