यांत्रिकीकरणातून शेती केली सुलभ, यंत्रांची स्वनिर्मिती देखील.

परभणी जिल्ह्यातील सनपुरी येथील ओंकारनाथ शिंदे यांनी गंभीर झालेल्या मजूरटंचाईची समस्या ओळखून विविध यंत्रांचा वापर सुरू केला. कल्पकतेतून कमी खर्चात यंत्रांची निर्मिती केली.आज व्यावसायिक व हंगामी पिकांची शेती त्यातून सोपी, सुलभ केली आहे.
यांत्रिकीकरणातून शेती केली सुलभ, यंत्रांची स्वनिर्मिती देखील.
पहिल्या छायाचित्रात बैलगाडीचलित फवारणी यंत्र व दुसऱ्या छायाचित्रात रिपरला जोडलेल्या पत्र्याव्दारे कापणी केलेले सोयाबीन जमा करण्यास मदत होते.

परभणी जिल्ह्यातील सनपुरी येथील ओंकारनाथ शिंदे यांनी गंभीर झालेल्या मजूरटंचाईची समस्या ओळखून विविध यंत्रांचा वापर सुरू केला. कल्पकतेतून कमी खर्चात यंत्रांची निर्मिती केली.आज व्यावसायिक व हंगामी पिकांची शेती त्यातून सोपी, सुलभ केली आहे. सनपुरी (ता. जि. परभणी) येथील ओंकारनाथ आनंदराव शिंदे यांनी प्राणिशास्त्र विषयात पदवी घेतली आहे. काही काळ विविध ठिकाणी नोकरीही केली. पण तेथे मन रमले नाही. सन २०१८ पासून ते पूर्णवेळ घरची शेती करीत आहेत. आई वडील, भाऊ यांच्यासह १० सदस्यांचे एकत्रित कुटुंब आहे. शिवारात तीन ठिकाणी मिळून ४५ एकर मध्यम ते भारी जमीन आहे. दोन विहीरी आहेत. अडीच किलोमीटरवरील दुधना नदीवरून पाइपलाईनव्दारे पाणी आणले आहे. सुमारे ३० एकरांत खरिपात सोयाबीन, तूर, मूग, रब्बीत हरभरा, ज्वारी, गहू व हळद, आले आदी व्यावसायिक पिके असतात. सुमारे साडे अकरा एकरांवर फळबाग आहे. त्यात ३.५ एकर पेरू (सरदार), आंबा (केसर) ४ एकर, सीताफळ (एनएमके गोल्डन) ३ एकर, लिंबू (साई सरबती) १.५ एकर आदींचा समावेश आहे. पेरूचे उत्पादन सुरु झाले आहे. परभणी येथील मार्केटमध्ये विक्री होते. यांत्रिकीकरणातून सुलभता शिंदे यांचे क्षेत्र मोठे आहे. पारंपारिक शेतीत चार सालगडी व दोन बैलजोड्यांची गरज भासायची. वेळप्रसंगी रोजंदरावरील मजूर बोलवावे लागत. त्यावर मोठा खर्च होत असे. परंतु अलीकडील काळात वेळेवर आणि पुरेशा प्रमाणात मजुर मिळणे अवघड झाले आहे. त्यामुळे नुकसान होत आहे. यावर उपाय म्हणून शिंदे यांनी यांत्रिकीकरणावर भर दिला. टप्प्याटप्याने बैलचलित, ट्रॅक्टर चलित यंत्रांचा वापर सुरु केला. स्वकल्पना व कौशल्यातून फवारणी पंप तसेच अन्य अवजारांची निर्मिती केली. सुमारे दहा लाख रुपये खर्च केला. आता स्वतःची अवजार बॅक त्यांनी तयार केली आहे. त्यात लहान-मोठी मिळून सुमारे ३० पर्यंत यंत्रे असावीत. त्यात ३८ एचपीचा ट्रॅक्टर, पॉवर टिलर, ट्रॅक्टरचलित नांगर, वखर, रोटाव्हेटर, तिऱ्ही, प्रचलित पेरणी यंत्र, बीबीएफ यंत्र, हळदीसाठी बेड मेकर, प्लॅंटर, बैलगाडीवरील फवारणी यंत्र, हस्तचलित सायकल कोळपे, रिपर, कडबा कुट्टी यंत्र, शेंडे कापणी यंत्र, तूर बडवणी, ट्रॅक्टरचलित मळणी यंत्र आदींचा समावेश आहे. रिपरव्दारे सोयबीन, हरभरा, गहू, करडई आदींची काढणी करता येते. आता केवळ एक बैलजोडी व सालगडी आहे. बीजोत्पादन २५ वर्षांपासून बियाणे कंपनीसाठी वसंतराव नाईक मराठवाडा कृषी विद्यापीठाने विकसित केलेल्या मूग, उडीद, तूर, सोयाबीन, तूर, रब्बी ज्वारी, करडई आदींचे बीजोत्पादन कार्यक्रम घेतात. त्यामुळे खुल्या बाजाराच्या तुलनेत २५ टक्के जादा दर मिळतो. अलीकडील वर्षांत तूर अधिक सोयाबीन ही पद्धती किफायतशीर ठरत असल्याचा अनुभव आहे. त्यामुळे दरवर्षी ६ ते ८ एकर त्याचे क्षेत्र असते. तंत्राचा वापर

 • तीन वर्षांपासून सलग सोयाबीनची पेरणी बीबीएफ तंत्राने होते. ट्रायकोडर्मा, रायझोबियम, पीएसबी आदी जीवाणूसंवर्धकांचा वापर होतो.
 • तूर अधिक सोयाबीन पद्धतीत ट्रॅक्टरचलित पेरणी यंत्राव्दारे दोन ओळीतील अंतर १८ इंच ठेवण्यात येते. तुरीच्या एक किंवा दोन ओळीनंतर सोयाबीनच्या आठ ओळींची पेरणी होते. सन २०२१ मध्ये तुरीच्या दोन ओळीनंतर सोयाबीनच्या आठ ओळी अशी पध्दत वापरली.
 • कीड व्यवस्थापनासाठी कामगंध सापळ्यांचा वापर होतो.
 • कमी पावसामुळे जमिनीत कमी ओलावा झालेल्या परिस्थितीत सोयाबीन काढणीनंतर तुरीच्या दोन जोडओळीतील मोकळ्या जागेत सऱ्या ओढून एकाडएक सरीव्दारे पाणी दिले जाते. तूर,
 • हरभऱ्याचे शेंडे खुडण्यात येतात. त्यामुळे फळफांद्याची संख्या वाढते. परिणामी अधिक उत्पादन मिळते.
 • हळदीची गादीवाफ्यावर (बेड) लागवड होते. करतात. दोन बेडसमध्ये पाच फूट अंतर असते. लागवड, माती लावणे, आंतरमशागत, काढणी आदी कामे यंत्राव्दारे होतात.
 • कल्पनेतून साकारलेली अवजारे शिंदे यांनी स्वकल्पनेतून बैलगाडीवरील फवारणी यंत्राची निर्मिती केली. त्यात सिंगल पिस्टन पंप ठेवून लांब लोखंडी नळीवर लावलेल्या दहा नोझल (प्रत्येक बाजूस पाच) पिकांत १० ते २० फूट पट्ट्यात फवारणी करता येते. दिवसभरात सुमारे १० एकरांत केवळ एका मनुष्याकरवी हे काम होते.तुरीसारखे पीक उंच वाढले असतानाही उभा व आडवा सांगाडा पद्धतीने फवारणी साध्य होते. जोडीओळीतील मोकळ्या जागेत बैलगाडी चालवणे शक्य होते. यात इंधनाचीही ५० ते ७५ टक्के बचत होते. जुन्यातिऱ्हीचा वापर करून १० हजार रुपये खर्चात हळद लागवड आणि काढणी असे टू. इन वन’ यंत्र तयार केले आहे. नव्या यंत्राची किंमत एक लाख रुपयांपर्यंत आहे. रिपरव्दारे सोयाबीनची कापणी होते. त्याच्या एका बाजूस पत्रा लावला आहे. त्यामुळे कापणी केलेल्या सोयाबीनचे छोटे ढीग होतात. त्यामुळे सोयाबीन जमा करणे सोपे होते. यांत्रिकीकरणाचे झाले फायदे

 • अवजारांत सुधारणा करून वापर. त्यातून खर्चात २ ते ३ लाख रुपये बचत.
 • वेळ आणि मजूरबळही कमी लागते.
 • पूर्वी मजुरांकरवी हळद लागवडीसाठी एकरी ९ ते १० हजार रुपये खर्च यायचा. आता त्याच कामासाठी एकरी दोन हजार रुपयांपर्यंत खर्च येतो.
 • फळबागेतील आंतरमशागतीची कामेही साध्य होतात.
 • ओंकारनाथ व बंधू दीप दोघेही ट्रॅक्टर व यंत्र चालवितात. त्यामुळे मजुरांवरील अवलंबित्व कमी झाले आहे.
 • एकूण व्यवस्थापन सुलभ झाल्याने उत्पादनही वाढले आहे. हळदीचे एकरी ३० क्विंटलपर्यंत, तूर ८० ते १० क्विंटल, सोयाबीन १० क्विंटल असे उत्पादन मिळते.
 • विक्री व्यवस्थापन जैविक निविष्ठांचा अधिकाधिक वापर होतो. ‘आत्मा’ अंतर्गत हरितक्रांती सेंद्रिय शेती शेतकरी गटामार्फत हळद पावडर, धान्य, डाळी, फळांची थेट विक्री होते. विविध धान्य महोत्सव तसेच पुण्यातील एका व्यासपीठामार्फत पुणे, मुंबई आदी ठिकाणी सेंद्रिय शेतमालाची विक्री होते. पुरस्काराने गौरव वसंतराव नाईक मराठवाडा कृषी विद्यापीठ तसेच २०१९ मध्ये ॲग्रोवनच्या औरंगाबाद येथील कृषी प्रदर्शनातील युवा शेतकरी पुरस्काराचे शिंदे मानकरी ठरले आहेत. सन २०१७-१८ चा वसंतराव नाईक कृषिभूषण (सेंद्रिय शेती) पुरस्कारही त्यांना जाहीर झाला आहे. संपर्क- ओंकारनाथ शिंदे- ७५८८०८१२४८

  Read the latest agriculture news in Marathi and watch Agriculture videos on Agrowon. Get the latest updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Agriculture Jugad, and Farmer Success Stories.

  ताज्या घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

  Related Stories

  No stories found.
  Agrowon
  www.agrowon.com