अन्नप्रक्रिया यंत्रनिर्मितीतील सावंत यांचा ब्रॅण्ड

सिंधुदुर्ग जिल्ह्यातील कुडाळ येथील प्रकाश सावंत यांनी अन्नप्रकियेसाठी लागणाऱ्या विविध दर्जेदार यंत्रांच्या निर्मितीत आपले नाव कमावले आहे. शेतकरी, उद्योजक, कृषी विद्यापीठ, कृषी विज्ञान केंद्रे यांच्याकडून त्यांच्या यंत्रांना मागणी राहते. महाराष्ट्रासह गोवा व अन्य राज्यांतही त्यांच्या यंत्रांचा प्रसार झाला आहे.
अन्नप्रक्रिया यंत्रनिर्मितीतील सावंत यांचा ब्रॅण्ड
डावीकडे फणस कापण्यासाठीचे व उजवीकडे पल्पर यंत्र.

सिंधुदुर्ग जिल्ह्यातील कुडाळ येथील प्रकाश सावंत यांनी अन्नप्रकियेसाठी लागणाऱ्या विविध दर्जेदार यंत्रांच्या निर्मितीत आपले नाव कमावले आहे. शेतकरी, उद्योजक, कृषी विद्यापीठ, कृषी विज्ञान केंद्रे यांच्याकडून त्यांच्या यंत्रांना मागणी राहते. महाराष्ट्रासह गोवा व अन्य राज्यांतही त्यांच्या यंत्रांचा प्रसार झाला आहे.   कुडाळ (जि. सिंधुदुर्ग) येथील प्रकाश सावंत हे नाव अन्नप्रकियेसाठी लागणाऱ्या विविध दर्जेदार यंत्रांच्या निर्मितीसाठी १५ ते २० वर्षांपासून प्रसिद्ध आहे. कोलझर (ता. सावंतवाडी) हे सावंत यांचे मूळ गाव. मात्र व्यवसायाच्या उद्देशाने ते कुडाळ येथे स्थायिक झाले आहेत. बारावीपर्यंत शिक्षण घेतल्यानंतर त्यांनी रोजगाराच्या शोधात मुंबईची वाट धरली. तेथे साधने व साहित्य विषयातील अभ्यासक्रम पूर्ण केला. काही वर्षे खासगी कंपनीत नोकरी केली. मात्र मुंबईत मन न रमल्याने ते गावी परतले. त्यानंतर कुडाळ येथे भांडी बनविण्याचा कारखाना सुमारे आठ वर्षे चालवला. त्यातील तांत्रिक समस्यांमुळे व्यवसाय परवडणे अशक्य झाले. दरम्यान कोकण रेल्वेच्या कामाला सुरवात झाली. तेथील अधिकाऱ्यांना विविध गेजेस बनविणाऱ्या तांत्रिक व्यक्तीची गरज होती. अधिकाऱ्यांनी ही ‘ऑफर’ सावंत यांना दिली. मग रेल्वे विभागाला विविध यंत्रे गरजेनुसार बनवून दिली. प्रकल्प पूर्णत्वाकडे जात असताना रेल्वे अधिकाऱ्यांनी आपल्यासोबत काम करावे अशी इच्छाही व्यक्त केली. परंतु सावंत यांनी कुडाळमध्ये स्वतःचा व्यवसाय सुरू करण्याचा निर्णय घेतला. अन्नप्रक्रिया उद्योगात वाटचाल यंत्रनिर्मितीतील कौशल्य व व्यावसायिक अनुभव अशा प्रदीर्घ अनुभवाची शिदोरी आता सावंत यांच्याकडे होती. त्यांनी एक बाब हेरली. प्रकियेअभावी कोकणातील बहुतांशी फळे वाया जातात किंवा दर कमी मिळतात. त्यांच्यावर प्रकिया केल्यास रोजगार निर्मिती होईल, मूल्यवर्धन होईल. त्यादृष्टीने आपण यंत्रनिर्मितीकडे वळावे असे त्यांना वाटले. निर्णय पक्का झाल्यावर कुडाळ ‘एमआयडीसी’ जागा घेतली. सागर इंजिनिअरिंग वर्क्स नावाने मागणी व गरजेनुसार विविध यंत्रे तयार करण्यास व पुरवण्यास सुरवात केली. सावंत यांच्या उद्योगावर दृष्टीक्षेप-

 • सन १९९५ पासून विविध फळप्रक्रिया यंत्रे बनविली जातात. यंत्र तयार केल्यानंतर विक्रीपूर्वी त्याच्या चाचण्या घेतल्या जातात. काही उदाहरणे पुढीलप्रमाणे.
 • पल्प काढण्याचे यंत्र- आंबा, जांभूळ, फणस, टॉमेटो आदींचा पल्प काढता येतो.
 • प्रति तास १२५ किलो प्रकिया अशी त्याची क्षमता आहे. त्याची विविध मॉडेल्स तयार केली आहेत.
 • कोकम कटिंग मशिन- रातांब्याचे ‘कटिंग’ करून त्यातील ८० टक्के बी आणि रस वेगळे करण्याचे काम हे यंत्र करते. प्रति तासाला ५०० ते ८०० किलोवर प्रकिया होऊ शकते.
 • काजूबोंडू क्रशर मशिन- यात काजुबोंडुचा रस काढला जातो. प्रति तासाला एक टन बोंडुवर प्रकिया केली जाते. या यंत्राला गोवा राज्यातील शेतकऱ्यांकडून मोठी मागणी आहे.
 • आवळा कटिंग मशिन- प्रकिया उद्योगातील अनेक मंडळींकडून अशा यंत्राची मागणी केली जात होती. सावंत यांनी उत्तम दर्जाची व्यावसायिकांच्या गरजेनुसार त्याची निर्मिती केली.
 • यामध्ये आवळा कीस आणि बी वेगवेगळे होण्याची सोय आहे. आवळा मावा, सुपारी सह विविध प्रकिया उत्पादने बनविण्यासाठी हे यंत्र उपयुक्त ठरते.
 • सुपारी सोलण्याचे मशिन- ताशी २५ ते ३० किलो सुपारी सोलण्याचे काम करते.
 • -इलेक्ट्रीक ड्रायर- प्रकिया उद्योगात यास खूप महत्त्व आहे. आंबा वडी, पोळी, आवळा कॅण्डी, मावा,काजूगर, पापड, सांडगी मिरची यासह विविध खाद्यपदार्थांसाठी त्याचा वापर होतो.
 • बॉयलर- काजू बी उकडण्यासाठी याचा वापर होतो.
 • स्टीम जॅकेट कॅटल- विविध फळांचा रस गरम करण्यासाठी हे यंत्र उपयोगी पडते.
 • -आवळा कॅण्डी यंत्र- आवळ्याचे आठ तुकडे या यंत्राद्वारे होतात. शिवाय बी वेगळी होते.
 • पूर्वी आवळा हाताने किसावा लागायचा. आता यंत्राद्वारे ‘क्रश’ करता येतो. हे यंत्र अलीकडेच
 • विकसित करण्यात आले आहे. प्रति तासाला ६० किलोवर प्रकिया होते.
 • बास्केट प्रेस- विविध फळांचे रस काढण्यासाठी त्याचा वापर होतो. तासाला २५ किलोवर प्रकिया होते.
 • याशिवाय ताशी १०० किलोपासून एक टनांपर्यंत प्रकिया होणारी अन्य यंत्रेही बनविली जातात.
 • आश्‍वासक उलाढाल पूर्वी दहा लाखांचे कर्ज बँकेकडून घेतले. आजही बॅंकेत १० लाखांची पत तयार केल्याचे सावंत सांगतात. वर्षाला सुमारे ३० ते ४० पल्पर्स, कोकम कटिंगही तेवढेच, बोंडू क्रशर यंत्रे (गोव्यातून अधिक मागणी) ३० अशा संख्येने शेतकऱ्यांना विक्री होते. डॉ. बाळासाहेब सावंत कोकण कृषी विद्यापीठ, किर्लोस कृषी विज्ञान केंद्र, गोव्यातील संशोधन केंद्र, फळसंशोधन केंद्र वेंगुर्ला, औरंगाबाद, धारवाड येथील विद्यापीठ, कारवार आदी ठिकाणाहूनही यंत्रांना मागणी असल्याचे सावंत सांगतात. वर्षाला ९० ते ९५ लाख रुपयांपर्यंत व्यवसायातून उलाढाल होते. स्वतःचा प्रक्रिया उद्योग बाजारपेठेतील संधी ओळखून सावंत यांनी कुडाळ येथे माऊली ॲग्रो फूडस या नावाने प्रकिया उद्योग सुरू केला आहे. आंबा, काजू, आवळा, चिकू, जांभूळ, करवंद, कोकम आदी फळांपासून उत्पादनांची निर्मिती केली जाते. दापोली येथील कृषी विद्यापीठातील विद्यार्थ्यांना या उद्योगात कार्यानुभवासाठी पाठविले जाते. नवउद्योजकांनाही प्रशिक्षण दिले जाते. सावंत यांना जिल्हा उद्योगरत्न यासह विविध संस्थांनी पुरस्काराने सन्मानित केले आहे. सुमारे १८ स्थानिकांना या उद्योगातून रोजगार उपलब्ध झाला आहे. सावंत यांच्या व्यवसायाला केंद्रीय मंत्री नारायण राणे, खासदार सुनील तटकरे, जलसंपदामंत्री जयंत पाटील, माजी राज्यमंत्री रवींद्र चव्हाण, माजी खासदार सुधीर सांवत, माजी पालकमंत्री दीपक केसरकर यांच्यासह विविध कृषी विद्यापीठातील अधिकाऱ्यांनी भेटी दिल्या आहेत. संपर्क- प्रकाश सावंत- ९४२२६३२८३८

  Read the latest agriculture news in Marathi and watch Agriculture videos on Agrowon. Get the latest updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Agriculture Jugad, and Farmer Success Stories.

  ताज्या घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

  Related Stories

  No stories found.
  Agrowon
  www.agrowon.com