रोबोटिक तणनियंत्रण पकडतेय वेग

पिकांच्या ओळीतून फिरत अत्यंत अचूकपणे फक्त तणांची काढणी या ‘हुश्शार’ रोबोकडून शक्य होते. (स्रोत ः स्टिव्हन फेन्निमोर)
पिकांच्या ओळीतून फिरत अत्यंत अचूकपणे फक्त तणांची काढणी या ‘हुश्शार’ रोबोकडून शक्य होते. (स्रोत ः स्टिव्हन फेन्निमोर)

जगभरातील संशोधन संस्था आणि कंपन्यांमध्ये सुरू आहे संशोधन पिकांमधील तणांचा समूळ नायनाट करण्यासाठी रोबोटिक्स तंत्रज्ञान अत्यंत फायद्याचे ठरणार आहे. यामध्ये रसायनांचा वापर नसल्याने सर्व प्रकारच्या सेंद्रिय, नैसर्गिक शेतीमध्ये त्यांचा वापर शक्य आहे. विशेषतः ज्या पिकांमध्ये तण काढणी अत्यंत जिकिरीची मानली जाते, अशा भाजीपाला पिकांसाठी त्यांची खास निर्मिती केली जात आहे. पिकांची पेरणी आणि काढणीसाठी बहुतांश पिकांमध्ये यंत्राची उपलब्धता होत आहे.

पिकातील आंतरमशागतीच्या कामामध्ये यांत्रिकीकरणाने जोर पकडला आहे. अशा स्थितीमध्ये पिकांच्या दोन ओळीतील तणांचे नियंत्रण करण्यासाठी ट्रॅक्टर किंवा बैलचलित यंत्रे उपलब्ध झाली आहेत. मात्र, दोन रोपांतील तणांच्या नियंत्रणासाठी प्रामुख्याने अनुकूल अशा तणनाशकांवर अवलंबून राहावे लागते. सेंद्रिय शेतीमध्ये तणनाशकांचा वापर शक्य नसल्याने मानवी कष्ट आणि कालावधी वाढतो. त्याच एकूणच शेतीमध्ये मजुरांची उपलब्धता ही समस्या जगभर भेडसावत आहे. परिणामी सेंद्रिय शेतीमध्ये खर्च वाढतो. यावर मात करण्यासाठी दोन ओळीत आणि त्याच वेळी दोन रोपातील तणांचे निर्मूलन अत्यंत काटेकोरपणे करण्यासाठी रोबोटिक विडर उपयुक्त ठरणार आहे.

रोबोटिक विडरच्या निर्मितीमध्ये जगभरातील संशोधन संस्था आणि कंपन्यांचे प्रयत्न सुरू आहेत. ‘युनिव्हर्सिटी ऑफ कॅलिफोर्निया’ येथील विस्तार तज्ज्ञ स्टिव्हन फेन्निमोर यांनी सांगितले, की लेट्यूस, ब्रोकोली, टोमॅटो आणि कांदा यासारख्या भाजीपाला पिकामध्ये तणांचा प्रादुर्भाव एक मोठी समस्या ठरते. तुलनेने मका, सोयाबीन आणि गहू यासारख्या पिकांमध्ये सुरवातीचा काही काळ तणनियंत्रण केल्यानंतर पिकांच्या वाढीमुळे तणांच्या वाढीला फारशी संधी राहत नाही. त्याच प्रमाणे भाजीपाला पिकामध्ये वापरण्यायोग्य तणनाशकांचे प्रमाणही कमी आहे. अशा वेळी हाताने तणनियंत्रण करण्याशिवाय पर्याय राहत नाही. ते सातत्याने अधिक खर्चिक होत चालले आहे. हाताने खुरपून तण काढणीचा वेग अत्यंत कमी असतो. त्यामुळे रोबोटिक विडरच्या मागणीमध्ये वेगाने वाढ होत आहे. गेल्या दहा वर्षापासून रोबोटिक विडरच्या निर्मितीसाठी आम्ही कार्यरत आहोत. या तंत्रज्ञानाने बऱ्यापैकी अचूकता गाठली असून, आता ते व्यावसायिक होण्यासाठी तयार झाले आहे. फेन्निमोर हे विद्यापीठातील शास्त्रज्ञ आणि कंपनीच्या अभियंत्यासोबत काम करत आहेत. त्यांनी नव्याने विकसित केलेल्या विडरच्या चाचण्या घेतल्या आहेत. हे संशोधन आणि त्याचे निष्कर्ष नुकत्याच झालेल्या ‘अमेरिकन सोसायटी ऑफ अॅग्रोनॉमी’च्या वार्षिक बैठकीमध्ये मांडले आहेत.

नव्याने विकसित केलेल्या रोबोटिक विडरची वैशिष्ट्ये ः

  • यामध्ये अत्यंत लहान आकाराचे ब्लेड वापरले असून, ते मातीमध्ये घुसून मुळासह तण उपटून काढते. या क्रियेमध्ये पिकांना कोणतीही इजा होत नाही.
  • तणांची व पिकांची ओळख पटविण्यासाठी त्यांच्यातील फरक आणि त्यांचे पॅटर्न यांचे प्रोग्रॅम या विडरमध्ये भरलेले आहेत. अर्थात, यात अचूकतेसाठी आणखी प्रयत्न करण्यात येत आहेत.
  • पीकनिहाय पॅटर्न वेगळे असून, ते तयार करण्याचे काम सुरू आहे.
  • सध्या इलेक्ट्रॉनिक क्षेत्रामध्ये वेगाने बदल होत असून, त्याचा फायदा या रोबोटिक्स क्षेत्रालाही होत आहे.
  • खर्च ः सध्याच्या रोबोटिक विडरच्या किमती अधिक  (१.२० ते १.७५ लाख डॉलर) आहेत. त्यामुळे हे विडर अद्यापही सामान्य शेतकऱ्यांच्या आवाक्याबाहेर आहेत. मात्र, मजुरी आणि दीर्घकालीन गुंतवणूक या अर्थाने विचार करत मोठे फार्म किंवा शेतकरी नक्कीच या तंत्रज्ञानाकडे आकर्षित होत आहेत.

    Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

    ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

    Related Stories

    No stories found.
    Agrowon
    agrowon.esakal.com