
Bovine Pregnancy Test Kit बऱ्याचदा गाय-म्हैस माजावर आल्यानंतर पशुपालक जनावर गाभण राहण्याच्या सर्व प्रक्रियांचे पालन करतात. मात्र, काही ना काही कारणांमुळे जनावर गाभण राहत नाही. आपलं जनावर गाभण (Animal Preganancy) राहिले आहे की नाही हे पशुपालकाला समजत नाही. जेव्हा पशुपालकाला जनावर गाभण राहिले नाही हे समजते, तोपर्यंत जनाराचा गाभण राहण्याचा काळ निघून गेलेला असतो.
अशावेळी जर पशुपालकाला आपले जनावर गाभण राहिले आहे की नाही हे जर वेळीच समजले, तर त्याला आर्थिक नुकसान टाळता येवू शकते. कोणतीही गाय-म्हैस माजावर आल्यानंतर वेळीच गाभण राहिली नाही, तर पशुपालकाला आर्थिक नुकसान सोसावे लागते. कारण जोपर्यंत गाय-म्हैस गाभण राहून पिल्लू जन्माला घालत नाही, तोपर्यंत ती दूध देत नाही. परिणामी पशुपालकाची मेहनत आणि खर्च वाया जातो.
जनावरांच्या गर्भधारणेबाबत पशुपालक कायम चिंता व्यक्त करताना दिसतात. कारण ग्रामीण भागात जनावराची गर्भधारणा तपासणी सुमारे ३ते ४ महिन्यांनी केली जाते, जी पशुपालकांसाठी नुकसानकारक असोत. जनावराची गर्भधारणा २० दिवसांनी तपासली, तर त्यांना फायदा होऊ शकतो. कारण जर जनावर गाभण राहिले नसेल तर त्यावर वेळीच उपाययोजना करता येतात.
जनावराच्या गर्भधारणेची स्थिती समजावी, यासाठी केंद्रीय म्हैस संशोधन संस्था, हिसार (सीआयआरबी) आणि भारत सरकारच्या बायोटेक्नोलॉजी विभागाने 'प्रेग डी कीट' तयार केले आहे. या किटच्या मदतीने आता पशुपालकाला आपले जनावर गाभण राहिले की नाही, हे समजणार आहे.
केवळ १० रुपयांच्या या किटच्या मदतीने पशुपालक स्वत: घरच्या घरी जनावराच्या गर्भधारणेची तपासणी करू शकणार आहे. संस्थेचे वरिष्ठ शास्त्रज्ञ डॉ. अशोक बल्हारा यांच्या मते लवकरच हे किट बाजारात विक्रीसाठी उपलब्ध होणार आहे.
गर्भधारणा तपासणी प्रक्रिया -
प्रेग डी किट एक जैव रासायनिक प्रक्रिया आहे. जनावराच्या गर्भधारणेची तपासणी करण्यासाठी या किटवर गाय किंवा म्हशीचे मुत्र टाकावे लागते. जनावर गाभण राहिले असल्यास किटचा रंग गडद लाल किंवा जांभळा होतो. परंतु जर किटचा रंग पिवळा किंवा हलका दिसत असेल, तर जनावर गाभण राहिले नाही, असे समजावे.
जनावर आजारी असल्यास तपासणीचा निष्कर्ष अचूक येईल , अशी शक्यता कमी असते. तपासणी करतेवेळी जनावराच्याय मुत्राचे तापमान २० ते ३० अंश सेल्सिअसपर्यंत असणे आवश्यक आहे.
अलिकडेच सीआयआरबीने नागालँड येथील मिथुन या डोंगराळ गोवंशावर प्रेग डी किटची यशस्वी चाचणी केली आहे. मिथुन हा प्राणी ईशान्येकडील डोंगराळ भागात मोठ्या प्रमाणात आढळतो. समुद्रसपाटीपासून तीन हजार मीटर उंचीवरही याचे संगोपन केले जाते.
Read the latest agriculture news in Marathi and watch Agriculture videos on Agrowon. Get the latest updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Agriculture Jugad, and Farmer Success Stories.
ताज्या घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.