ब्राझीलच्या शिष्टमंडळाची इफ्कोच्या नॅनो युरिया प्रकल्पाला भेट

नॅनो युरिया लिक्विड हा कृषी संशोधनाचा एक नवा आविष्कार आहे. पिकांमधील पोषक घटकांच्या वाढीसाठी त्याचा वापर केला जातो. याशिवाय या नॅनो युरियाचा पर्यावरणावर दुष्परिणाम होत नाही.
Nano Fertilizer
Nano Fertilizer Agrowon

गुजरातमध्ये काटोल येथे (गांधीनगर) इंडियन फार्मर्स फर्टिलायझर कोऑपरेटिव्ह लिमिटेडतर्फे (IFFCO) एक नॅनो फर्टिलायझर निर्मिती प्रकल्प उभारण्यात आला आहे. ब्राझीलच्या शिष्टमंडळाने नुकतीच या नॅनो फर्टिलायझर निर्मिती प्रकल्पाला भेट दिली.

अँजेलो मॉरिशियो, फ्रॅंक ओलिव्हिएरा यांच्या नेतृत्वाखालील या शिष्टमंडळात ब्राझीलच्या कृषी मंत्रालयाचे अधिकारी, ब्राझीलच्या भारतीय दूतावासातील अधिकाऱ्यांचा समावेश होता. ब्राझीलच्या शिष्टमंडळाने इफ्कोच्या नॅशनल ॲक्रिडिटेशन बोर्ड फॉर टेस्टिंग अँड कॅलिब्रेशन लॅब्रॉटरीजने (NABL) संमती दिलेल्या प्रयोगशाळेला आणि नॅनो जैवतंत्रज्ञान संशोधन (Nano Biotechnology Research) या संशोधन आणि विकास केंद्रालाही (R&D Centre) भेट दिली.

इफ्को (IFFCO) या भारतीय शेतकऱ्यांच्या सहकारी तत्वावरील खतनिर्मिती क्षेत्रातील संस्थेने ब्राझिलमधील सहकारी संस्था ब्राझिलियन कोऑपरेटिव्हसोबत (OCB) मिळून एक सहकार्य करार केला आहे. या सहकार्य कारारानुसार ब्राझीलमधील सहकार क्षेत्रातील अनेक विधायक उपक्रम भारतात राबवले जाणार आहेत. याचाच एक भाग म्हणून इफ्कोने ब्राझीलच्या सहकार्याने गुजरातमध्ये एक नॅनो फर्टिलायझर निर्मिती प्रकल्प उभारला आहे.

या प्रकल्पात तयार करण्यात आलेल्या नॅनो युरियाचे प्रात्यक्षिक कसे घेतले जाणार आहे, याची सविस्तर माहिती इफ्कोच्या अधिकाऱ्यांनी या शिष्टमंडळाला दिली. इफ्कोचे विपणन संचालक योगेंद्र कुमार आणि काटोल येथील प्रकल्पातील सर्व अधिकारी यावेळी उपस्थित होते.

इफ्कोने इंडियन कौन्सिल ऑफ ॲग्रीकल्चर रिसर्चच्या (ICAR) मदतीने नॅनो युरियाची देशभरातील १५ हजार ठिकाणी प्रात्यक्षिके घेतली आहेत. त्यानंतरच या नॅनो युरियाला केंद्रीय खते, रसायने मंत्रालयाची अंतिम संमती देण्यात आली आहे.

काटोल येथील प्रकल्पात इफ्को दिवसाकाठी दीड लाख बाटल्या नॅनो युरियाची निर्मिती करणार आहे. जून २०२१ पासून या प्रकल्पातून तयार झालेल्या १ कोटीहून अधिक बाटल्या नॅनो युरिया शेतकऱ्यांनी विकत घेतल्या आहेत.

नॅनो युरिया लिक्विड (Nano Urea Liquid) हा कृषी संशोधनाचा एक नवा आविष्कार आहे. पिकांमधील पोषक घटकांच्या वाढीसाठी त्याचा वापर केला जातो. याशिवाय या नॅनो युरियाचा पर्यावरणावर दुष्परिणाम होत नाही. माती, पाणी आणि हवेचे प्रदूषण टाळून उत्पादनवाढीला चालना देणारे नॅनो युरिया हे एक सुरक्षित व शाश्वत खत आहे. भारत, ब्राझील सहकार्याचा पुढचा टप्पा म्हणून काटोलच्या प्रकल्पातील नॅनो युरिया ब्राझीलमध्येही वापरण्यात येणार असल्याचे या शिष्टमंडळाने म्हटले आहे.

Read the latest agriculture news in Marathi and watch Agriculture videos on Agrowon. Get the latest updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Agriculture Jugad, and Farmer Success Stories.

ताज्या घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
www.agrowon.com