
श्रीतेज यादव, जयंता टिपले
पेट्रोफायलम स्कालारे (एंजल मासा) (angel fish) ही एक गोड्या पाण्यातील सुंदर आणि लोकप्रिय माशाची प्रजाती आहे. हा मासा (Fish) प्रामुख्याने उष्णकटिबंधीय दक्षिण अमेरिकेतील ॲमेझॉन (Amazon), ओरिनोको नदीच्या (Orinoco River) पात्रात सापडतो.
आपल्याकडील स्थानिक मत्स्यालय (aquarium) किंवा पाळीव प्राण्यांच्या दुकानात गोड्या पाण्यातील एंजल मासे विक्रीस उपलब्ध असतात. हे मासे उंच, टोकदार पंख आणि त्यांच्या चमचमीत खवल्यामुळे ओळखू येतात. गोड्या पाण्यातील मत्स्यालयाच्या छंदातील ही सर्वात लोकप्रिय प्रजाती आहे.
प्रजननशील माशाची निवड ः
- सर्वप्रथम मत्स्यालय किंवा पाळीव प्राण्यांच्या दुकानातून किमान दहा ते बारा एंजल माशांच्या जोड्या आणाव्यात.
- यामध्ये नर, मादी ही प्रौढ पाहिजेत. यासाठी माशाची लांबी १५ सेंमी किंवा त्यापेक्षा मोठी पाहिजे.
नर, मादीची ओळख ः
१) नराचे शरीर वर्तुळाकार असते. ते प्रौढ झाल्यावर त्यांच्या डोक्यावर फुगवटा तयार होतो. पोटाकडील पंख काटेदार आणि टोकदार असतात आणि त्यांच्याकडे टोकदार, पातळ प्रजनन नळी असते.
२) मादी माशीचे पोट आणि पाठीवरील भाग अधिक टोकदार आणि कोनासारखे असतात.
३) मादीचे डोके नरापेक्षा गुळगुळीत व अधिक गोलाकार असते.
टाकीची रचना आणि सजावट ः
१) सर्व मासे १२० लिटर पाणी क्षमता असलेल्या मत्स्य टाकीमध्ये सोडावेत. मत्स्य टाकी ही जावा फर्न, अमेझॉन स्वॉर्ड या सारख्या मोठ्या पानाच्या जलीय वनस्पतीने सजवावी. कारण मादी पानांवर किंवा काचेवर अंडी चिकटविते.
२) टाकीतील पाणी स्वच्छ राहण्याकरिता मत्स्य टाकीमध्ये फिल्टर किंवा प्राणवायू तयार करणारे यंत्र बसवावे. कारण या माशाला स्वच्छ आणि ताजे पाणी लागते. पाण्यामध्ये अमोनियाचे प्रमाण कमी असावे. पाण्याचा सामू ६ ते ७ असावा. मत्स्य टाकीतील तापमान हे किमान २२ अंश सेल्सिअस ठेवावे.
३) टाकीमध्ये मासे सोडल्यानंतर त्यांना दिवसातून दोन वेळा जिवंत स्वरूपाचे खाद्य द्यावे. उदा. रक्त अळी, टुबिफेक्स, डासाची अळी.
४) सर्व परिस्थिती मत्स्य टाकीमध्ये तयार केल्यानंतर एखादी जोडी सर्वांपासून वेगळी फिरताना दिसेल. हे क्रिया सुरू होण्याकरिता बराच कालावधी लागू शकतो. कदाचित ही जोडी अंडी सुद्धा देतील. अंडी टाकीच्या काचेवर किंवा दगडावर चिटकलेली दिसतात.
नर आणि मादी दोघेही आपल्या अंड्याची काळजी घेताना दिसतात. असे दिसल्यास त्वरित बाकीच्या माशांना वेगळे करावे.
५) पहिल्यांदाच प्रजननाची वेळ असल्यामुळे मासे शक्यतो यशस्वी होईल की नाही हे सांगता येत नाही. काही वेळा पूर्ण अंडी हे वंध्यत्वाच्या कारणामुळे त्यामधून पिल्ले बाहेर येणार नाहीत.
प्रजनन टाकीची रचना:-
- जेव्हा आपल्याला प्रजननशील माशाची जोडी भेटते तेव्हा ती ७० लिटर क्षमता असलेल्या मत्स्य टाकीमध्ये सोडावी.
- मत्स्य टाकी जावा फर्न, अमेझॉन स्वॉर्ड या सारख्या मोठ्या पानाच्या जलिय वनस्पतीच्या साहाय्याने सजवावी, कारण मादी
पानांवर अंडी चिकटविते. जर या वनस्पती मिळाल्या नाहीत तर त्याऐवजी दगड, पाण्यातील लाकूड किंवा काचे सारखेच गुळगुळीत असणारे पृष्ठभाग ४५ अंशाचा कोन होईल असे ठेवावे.
- मत्स्य टाकीतील तापमान हे किमान २५ ते २८ अंश सेल्सिअस इतके ठेवावे. यामुळे प्रजनन क्रियेला चालना मिळेल.
- मत्स्य टाकीत फिल्टर किंवा प्राणवायू तयार करणारे यंत्र २४ तास सुरू असावे.
प्रजनन झाल्यावर पिल्ल्यांची काळजी ः
- मादी एकावेळेस ५०० ते १००० अंडी देते. अंडी दिल्यावर लगेचच नर आपले शुक्राणू या अंड्यावर सोडतो.
- अंडी दिल्यानंतर नर आणि मादी मासा आपल्या अंड्याची काळजी घेताना आणि अंड्यावर हवा मारताना दिसतात. तसेच खराब आणि सडलेले अंडी मासे खाऊन टाकतात. या काळात दोन्ही वेळेस माशांना जिवंत स्वरूपाचे खाद्य देणे टाळावे. सुक्या स्वरूपाचे खाद्य द्यावे.
- अंडी दिल्यानंतर दोन ते तीन दिवसांनंतर अंड्यामधून पिल्ले वळवळ करताना दिसतात. तरी सुद्धा पिल्ले पृष्ठभागावर चिटकून बसलेले असतात आणि नर आणि मादी दोघेही त्यांचे संगोपन करतात. पुढील दोन दिवसात ते चक्राकार पद्धतीने पोहताना दिसतात.
त्यांच्या पोटाला अंड्यातील पिवळा बलक पिशवी असल्याने ती पोहतात. त्यानंतर २ दिवसांनंतर ते पूर्णतः मोकळे त्यांच्या नर आणि मादीच्या बाजूला पोहताना दिसतात. अशा वेळेस नर आणि मादी माशाला वेगळे करावे.
त्यांना पहिल्या दोन दिवस इन्फोसोरिया हे जिवंत खाद्य द्यावे. त्यापुढील काळात त्यांना नुकतेच जन्मलेले अर्टिमिया हे जिवंत खाद्य द्यावे.
- एका महिन्यात पिल्लांचा आकार नाण्याएवढा होतो. होते. तेव्हा या पिल्लांना जिवंत टुबिफेएक्स हे खाद्य द्यावे. जेव्हा पिल्ले दोन महिन्यांची होतात. तेव्हा त्यांची विक्री करावी.
- वेगळे केलेले नर आणि मादी मासे हे त्यापुढील एका आठवड्यात पुन्हा एकदा प्रजनंनाकरिता तयार असतात. मादी परत अंडी देऊ शकते.
जयंता टिपले, ८७९३४७२९९४ (सहाय्यक प्राध्यापक (अतिथी व्याख्याता), जलीय प्राणी आरोग्य व्यवस्थापन विभाग, मत्स्य विज्ञान महाविद्यालय, उदगीर,जि.लातूर)
Read the latest agriculture news in Marathi and watch Agriculture videos on Agrowon. Get the latest updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Agriculture Jugad, and Farmer Success Stories.
ताज्या घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.