BT Maize : बीटी मक्याचा अलक्ष्य कीटकांवर फारसा परिणाम नाही

बीटी मका पिकांमध्ये बॅसिलस थुरिंजिएन्सिस जिवाणूतील प्रथिनांचा समावेश केला असून, त्यामुळे पिकावर येणाऱ्या खोड पोखरणारी कॉर्न बोरर, कॉर्न रूटवर्म आणि महत्त्वाच्या किडीपासून बचाव होतो.
Maize
MaizeAgrowon

जनुकीय सुधारित पिकांच्या (BT Crop) संदर्भात जगभरामध्ये अद्यापही शंकेचे वातावरण आहे. पर्यावरणवाद्यांकडून धोक्याचे इशारे सातत्याने पुढे येत असल्यामुळे अमेरिकन कृषी विभागाच्या (United State Department Of Agriculture) कृषी संशोधन सेवेतील शास्त्रज्ञ आणि त्यांच्या स्विस सहकाऱ्यांनी जनुकीय सुधारित मका (BT Maize) पिकांसंदर्भात झालेल्या संशोधनाच्या सर्वांत मोठ्या माहितीसाठ्याचे विश्‍लेषण केले आहे. त्यातून बीटी मका या पिकामुळे लक्ष्य नसलेल्या (अलक्ष्य) कीटक (Pest) आणि अन्य सजीवांवर अत्यल्प परिणाम होत असल्याचे पुढे आले आहे. या अभ्यासाचे निष्कर्ष ‘एन्व्हायर्न्मेंटल एव्हिडन्स’मध्ये प्रकाशित करण्यात आले.

बीटी मका पिकांमध्ये बॅसिलस थुरिंजिएन्सिस जिवाणूतील प्रथिनांचा समावेश केला असून, त्यामुळे पिकावर येणाऱ्या खोड पोखरणारी कॉर्न बोरर, कॉर्न रूटवर्म आणि महत्त्वाच्या किडीपासून बचाव होतो. १९९६ मध्ये पहिल्यांदा बीटी मका पिकाला अमेरिकेमध्ये मंजुरी मिळाली होती. मात्र त्यामुळे उपयुक्त कीटक आणि लक्ष्य नसलेल्या सजीवांना हानी पोहोचण्याची शक्यता सातत्याने व्यक्त केली जात होती. या संदर्भात केले जाणारे प्रयोग आणि त्याची व्याप्ती मर्यादित असतानाही त्याची उदाहरणे दिली जात होती.

या बाबतची दीर्घकालीन आणि सर्व उपलब्ध संशोधनांमधून माहितीसाठ्याचे विश्लेषण करण्याचे काम अमेरिकन कृषी विभागाच्या मारिकोपा (अॅरिझोना) येथील ‘एरिड लँड्स अॅग्रिकल्चरल रिसर्च सेंटर’चे संचालक आणि कीटकशास्त्रज्ञ स्टीव्ह नारान्जो व त्यांचे सहकारी ज्योर्ज रिमिस आणि मायकेल मेइस्सले यांनी केले आहे. या अभ्यासासाठी त्यांनी १२ बिबिलोग्राफिक्स डेटाबेस, १७ विशेष वेबपेजेस आणि विविध संदर्भ क्षेत्रातून मिळालेल्या ७८ रिव्ह्यू लेख अशा विस्तीर्ण माहितीसाठ्याचे विश्‍लेषण केले.

Maize
जाणून घ्या मका लागवडीचे सुधारित तंत्रज्ञान

त्या विषयी माहिती देताना स्टीव्ह नारान्जो म्हणाले, की १९९७ ते २०२० या काळातील बीटी मक्यासंदर्भात प्रकाशित हजारो संशोधने गोळा केली. त्यातही रासायनिक कीडनाशकांद्वारे विविध किडींचे नियंत्रण करणाऱ्या पारंपरिक मका पिकाच्या तुलनेमध्ये बीटी मक्यामुळे लक्ष्य नसलेल्या सजीवांवर (उदा. संधिपाद प्राणी (arthropod), गांडुळे, सूत्रकृमी) होणाऱ्या परिणामांचा दावा करणाऱ्या संशोधनावर भर देण्यात आला. इतक्या मोठ्या प्रमाणातील सर्व संशोधनाचे शास्त्रीय पद्धतीने विश्‍लेषण केल्यानंतर बीटी मका पिकांमुळे अपृष्ठवंशीय कीटकांवर उदा. लेडी बर्ड बीटल, फुलावरील अन्य कीटक, लेसविंग इ. वर कोणताही नकारात्मक परिणाम दिसून आला नाही. मात्र मका पिकांमध्ये कॉर्न बोररला भक्ष बनविणाऱ्या ब्रॅकोनिडिई प्रजातीच्या परोपजीवी वास्प माश्यांची संख्या कमी होत असल्याचे दिसले.

Maize
Maize Production : मका उत्पादन वाढीसाठी सात जिल्ह्यात उपक्रम

या माहितीसाठ्यामध्ये संशोधनासाठी जैवतंत्रज्ञान कंपन्यांतील शास्त्रज्ञ लेखक किंवा त्यांच्याकडून आर्थिक मदत मिळालेली आहे का, आणि त्यामुळे निष्कर्षामध्ये फेरफार तर झालेले नाहीत ना, हा मुद्दाही विचारात घेण्यात आला. त्याविषयी भाष्य करताना मायकेल मेइस्सले यांनी सांगितले, की त्यातही आश्चर्याची बाब म्हणजे बीटी मका पिकाचे लक्ष्य नसलेल्या सजीवांवर नकारात्मक परिणाम होत नसल्याची बहुतांश संशोधने ही अन्य खासगी क्षेत्राच्या मदतीवर झालेली दिसतात, त्यातही त्यांना जैवतंत्रज्ञान कंपन्यांचे पाठबळ असल्याचे दिसत नाही.

अत्यल्प नकारात्मक परिणाम ः

या अभ्यासामध्ये उच्च दर्जाच्या संशोधनांची माहिती घेतली होती. विशेषतः एकूण संशोधनापैकी ७५ टक्के ही पीअर रिव्ह्यूड जर्नलमधून घेण्यात आली आहेत. या अभ्यासामध्ये १२० संशोधनामध्ये २३३ प्रयोग आणि ७२७९ अपृष्ठवंशी प्राण्यांचा समावेश होतात. या अभ्यासातून कीडनियंत्रणासाठी वापरल्या जाणाऱ्या जनुकीय सुधारित (बीटी) मका पिकाचा अन्य अलक्ष्य अपृष्ठवंशी प्राण्यावर तुलनेने अत्यल्प नकारात्मक परिणाम होतात. इथे तुलनेसाठी किडींच्या नियंत्रणासाठी विस्तृत क्षमतेच्या (ब्रॉड स्पेक्ट्रम) कीडनाशकांचा वापर करत असलेल्या मका पिकाचा विचार केला असल्याचे शास्त्रज्ञांनी सांगितले. हा संपूर्ण माहितीसाठा ‘बीएमसी रिसर्च नोट्स’ मध्ये प्रकाशित करण्यात आला आहे.

Read the latest agriculture news in Marathi and watch Agriculture videos on Agrowon. Get the latest updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Agriculture Jugad, and Farmer Success Stories.

ताज्या घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
www.agrowon.com