सोयाबीन पेरणीवेळी घ्यावयाची काळजी

जमिनीची मशागत चांगली झालेली असल्यास माती जास्त भुसभुशीत होते. अशा ठिकाणी पेरणी करताना बियाणे १० सेंमीपर्यंत खोल पडण्याची शक्यता असते.
Soybean
SoybeanAgrowon

डॉ. खिजर बेग

जमिनीची मशागत (Cultivation) चांगली झालेली असल्यास माती जास्त भुसभुशीत होते. अशा ठिकाणी पेरणी करताना बियाणे (Seed) १० सेंमीपर्यंत खोल पडण्याची शक्यता असते. अशा प्रकारे बियाणे खोल पडल्यास त्याची उगवण कमी होते. सोयाबीनची पेरणी (Soybean Sowing) करताना बियाणे ३-४ सेंमी पेक्षा खोल पडणार नाही, याची काळजी घ्यावी.

-वाणाची निवड करताना आपल्या भागासाठी प्रसारित करण्यात आलेल्या वाणाचीच निवड करावी.

-जर पहिल्या पावसावर पेरणी केली आणि त्यानंतर चांगल्या सरी पडल्या नाहीत तर उगवणाऱ्या बियाण्याची मर होते. त्यामुळे मॉन्सूनचा पाऊस १० दिवसांमध्ये ८० ते १०० मिमी झाल्यानंतरच पिकाची पेरणी करावी. विशेषत: कोरडवाहू परिस्थितीमध्ये पेरणीसाठी समाधानकारक पाऊस पडल्याशिवाय पेरणीची घाई करू नये.

- स्वत:च्या घरचे किंवा दुसऱ्या शेतकाऱ्याकडील सोयाबीन पिकाचे बियाणे अथवा बाजारातून बियाण्याची बॅग विकत घेतली तरी त्यांची उगवणक्षमता चाचणी करावी. बियाण्याची उगवण समाधानकारक असल्याची खात्री पेरणीपूर्वी ८ ते १० दिवस आधी चाचणी करूनच करावी.

-पेरणी करताना बियाण्याची उगवणक्षमता ७० टक्के किंवा त्यापेक्षा अधिक असल्यास प्रति एकरी २६ किलो बियाणे वापरावे. यापेक्षा कमी उगवणक्षमता असल्यास प्रत्येक एक टक्का कमी उगवणीसाठी ४०० ग्रॅम बियाणे अधिक वापरावे. याप्रमाणे ६० टक्के उगवणीसाठी जवळपास ३० किलो बियाणे लागेल. ज्या बियाण्याची उगवण ६० टक्क्यांपेक्षा कमी असल्यास असे बियाणे पेरणीसाठी वापरू नये.

-पेरणी करताना बियाण्यास सर्वप्रथम कीटकनाशक, त्यानंतर बुरशीनाशक व शेवटी जिवाणू संवर्धक या क्रमाने बीजप्रक्रिया करावी. बियाणे बाजारातील असो की स्वतःजवळचे बीजप्रक्रिया केल्याशिवाय सोयाबीन पिकाची पेरणी करू नये.

-सोयाबीनसोबत तूर आंतरपीक घ्यावे. त्याकरिता आपल्या बैलाद्वारे पेरणी करीत असल्यास ४:२ (सोयाबीनच्या ४ ओळीनंतर तुरीच्या २ ओळी) आणि ट्रॅक्टरद्वारे पेरणी करीत असल्यास ६:१, ५:२ किंवा लहान पेरणीयंत्राद्वारे पेरताना ४:१ या सोयाबीन व तुरीच्या ओळींच्या प्रमाणात आंतरपिकाची पेरणी करावी. पावसाचा खंड अथवा जास्त पडणाऱ्या पावसामुळे निर्माण होणारी जोखीम आंतरपीक पद्धतीमुळे कमी होते.

-रुंद वरंबा सरी पद्धतीने पेरणी केल्यास पावसाचा खंड अथवा अति पाऊस या दोन्ही परिस्थितीमध्ये फायदा होतो. त्यामुळे हवामानाचे अंदाज पाहता रुंद वरंबा सरी पद्धतीनेच पेरणी करावी.

-सर्व शेतकऱ्यांनी पुढील वर्षी लागणारे बियाणे आपल्या शेतात चालू हंगामामध्ये तयार करावे. एकदा बाजारातून प्रमाणित किंवा सत्यतादर्शक बियाणे विकत घेतल्यास पुढील तीन वर्षे त्यापासून तयार झालेले बियाणे वापरता येते. सोयाबीनचे बियाणे सरळ वाण प्रकारातील आहेत. (संकरित वाण नव्हेत.) त्यामुळे दरवर्षी बियाणे खरेदी करण्याची आवश्यकता नाही. उगीच नवीन बियाणे खरेदी करून आपला उत्पादन खर्च वाढवू नये.

-सोयाबीन पिकाची पेरणी करताना रासायनिक खताची मात्रा पेरणीसोबतच द्यावी. पेरणीनंतर कोणत्याही खताची मात्रा पिकास देण्याची आवश्यकता नाही. जर पेरणीनंतर नत्रयुक्त खताची मात्रा सोयाबीनला दिली तर पिकाची वाढ जास्त होते. मात्र त्यास फुले व शेंगांची संख्या कमी राहते.

डॉ. खिजर बेग, ७३०४१२७८१०

(सहयोगी संचालक (बियाणे), वसंतराव नाईक मराठवाडा कृषी विद्यापीठ, परभणी)

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com