संवर्धित शेतीसाठी तंत्रामध्ये बदल आवश्यक

ज्यांच्याकडे भाताला उन्हाळ्यात गरजेप्रमाणे ओलित करण्याची सुविधा आहे त्यांनी पावसाळ्याऐवजी उन्हाळी भात शेती करावी. खरिपात कापूस, तूर पिकाच्या जमिनीची कोणतीही पूर्वमशागत करू नये. फक्त १५० सें.मी.वर टोकण करणे सुलभ जाईल अशी काकर मारून घ्यावी. योग्य वेळी हाताने टोकण करून घ्यावी. शक्‍यतो निंदणी अगर डवरणी करू नये.
संवर्धित शेतीसाठी तंत्रामध्ये बदल आवश्यक
Paddy Agrowon

उन्हाळी भातशेतीचे नियोजन ः

बहुतेक शेतकरी फेरपालटाच्या वर्षी पावसाळ्यात भातशेती (Paddy Farming) करतात. पावसाळ्याशेवटी भात कापणी (Paddy Harvesting) झाल्यावर परत उसाची लागवड (Sugarcane Cultivation) करतात. भातपिकाला उसापेक्षा पाणी जास्त लागते. ज्यांच्याकडे भाताला उन्हाळ्यात गरजेप्रमाणे ओलित करण्याची सुविधा आहे त्यांनी पावसाळ्याऐवजी उन्हाळी भात शेती करावी. यासाठी डिसेंबरअखेर ऊस तुटून जाणे गरजेचे आहे. त्यानंतर पाचट जाळावे. खोडवे उगवून येण्यास वाव द्यावा. १५ जानेवारीनंतर ग्लायफोसेट तणनाशकाने खोडवे मारून टाकावेत. लागवडीचे क्षेत्र आणि सऱ्यांची संख्या मोजावी.

१) आपण सर्वसामान्यपणे वापरत असलेल्या भात बियाण्यापेक्षा २५ टक्के बियाणे कमी करावे. उसाच्या दोन सऱ्यांसाठी किती ग्रॅम भात बियाणे लागेल याचा अंदाज करावा आणि त्या मापाचे एक भांडे घ्यावे. अर्धे जाताना व अर्धे येताना सरीत समान प्रमाणात बियाणे विस्कटावे.

२) पॉवर टिलरचे बाजूचे दात काढून सरीच्या तळात बसतील तितकेच दात ठेवावेत. हलकी कोळपणी केल्याप्रमाणे दात फिरवून भात बियाणे मातीत मिसळावे. यानंतर पॉवर टिलरच्या दोन टायरमध्ये वरंबा ठेवून एका सरीत दोन वेळा टायर फिरवून हललेली माती परत बसवून सरीला पाणी द्यावे. गहू टोकण केल्यापेक्षा विस्कटून चांगला येतो. त्याचप्रमाणे भातदेखील चांगला येतो.

३) पावसाळ्यात सरीत जास्त पाणी होण्याचा धोका असल्याने भात वरंब्याच्या बगलेला टोकण करणे फायदेशीर ठरते. उन्हाळ्यात हा धोका नाही. भात टोकणीचा मोठा खर्च आहे. मजुरांना तुम्ही देत असलेल्या पगारापेक्षा वैरण किती मिळते याचे महत्त्व वाढल्याने भात टोकणीसाठी मजूर मिळविणे दिवसेंदिवस अवघड होत चालले आहे. विस्कटून भातशेतीत टोकणीच्या मजुरांची गरज संपुष्टात येते. सरीने पाणी देणे अतिशय सुलभ जाते. उन्हाळी हंगामात तीज जात घेत असलेल्या पावसाळ्यातील दिवसापेक्षा २५ ते ३० दिवस जास्त लागतात. यामुळे फक्त हळव्या जाती लावणे सोईस्कर होते.

४) उन्हाळी भातशेतीत तणाचा त्रास पावसाळ्याच्या तुलनेत खूप कमी असतो. रोग, किडीचे प्रमाण नगण्य असते. उत्पादन दुप्पट, तर उत्पादनखर्च ५० टक्के होतो. यामध्ये फक्त पाणी व्यवस्थापन सांभाळणे महत्त्वाचे आहे. आता आम्ही म्हणतो, ज्यांना शक्‍य आहे त्यांनी उन्हाळी भात शेती करावी आणि पावसाळ्यात जमीन पड टाकावी. तण वाढवावे, तणनाशकाने मारावे आणि पुढील ऊस अगर हिवाळी किंवा उन्हाळी पीक घ्यावे. जमीन सुपीक करण्याचे काम पावसाळ्यात अति उत्तम होते. थोडा योग्य तांत्रिक विचार करून पीक व्यवस्थापनाचे नियोजन फायदेशीर ठरते.

तूर, कापूस, मूग, उडीद, सोयाबीन पिकासाठी तंत्र ः

मराठवाडा, पश्‍चिम विदर्भातील तूर आणि कापूस ही लांब अंतरावरील महत्त्वाची पिके. या लांब अंतरावरील पिकाच्या मधल्या पट्ट्यात पहिल्या दोन-अडीच महिन्यांत पार होणारी मूग, उडीद अगर सोयाबीनसारखी अल्प मुदतीची पिके घेतली जातात. शेतकऱ्यांना अल्प मुदतीने पैशाची गरज असते ती या मिश्र पिकातून काही प्रमाणात भागविली जाते. यामुळे ४ ते ६ ओळी मिश्र पिकांच्या आणि १ ते २ ओळी मुख्य पिकाच्या अशी प्रामुख्याने पेरणीची रचना असते. या भागात जमीनधारणा मोठी आहे. पूर्वी बैलाकडून आणि आता ट्रॅक्‍टरने पूर्वमशागत करण्याची प्रथा आहे. पेरणी बैलाच्या पाभरीने किंवा ट्रॅक्‍टरच्या यांत्रिक पेरणी यंत्राने केली जाते.

१) आता प्रामुख्याने बी.टी. कपाशी जातीची लागवड होते. हे बियाणे महाग असल्याने त्यासाठी काकर पाडून हाताने टोकण केली जाते. तूर मात्र बऱ्याच वेळा घरचेच बियाणे असल्याने पेरणी यंत्रामागे सरता

लावून पेरणीची प्रथा आहे. या भागात फिरून निरीक्षण केल्यानंतर असे लक्षात आले, की तूर पेरणी गरजेपेक्षा नेहमीच दाट केली जाते. विरळणी करणे शक्‍य होत नाही अगर विरळणीचे महत्त्व शेतकऱ्यांना वाटत नाही. त्यामुळे तुरीची झाडे २-३ फूट वाढतात. करंगळीसारखी जाडीची राहतात. येथील बहुतांशी क्षेत्र कोरडवाहू आहे. महाराष्ट्रात असणारे ८०-८२ टक्के कोरडवाहू क्षेत्र याच भागात आहे.

२) पाऊस लवकर गेला तर तूर शेंगा लागण्यास सुरुवात झाल्यानंतर चांगल्या भरेपर्यंत व फूल-फळधारणा शेवटपर्यंत पूर्ण होण्यासाठी गरजेचा ओलावा खात्रीचा न मिळाल्याने पिकाचे उत्पादन कमी आहे. कपाशीचेही असेच होते. पात्या लागायला सुरुवात झाल्यानंतर थोड्याच दिवसांत ओलावा संपुष्टात आल्यास पिकाचे उत्पादन घटते. मुख्य पिकाच्या उत्पादनाची शाश्‍वती नसल्याने शेतकऱ्यांचा मिश्र पिकावर जोर असतो. ही झाली सध्याची परिस्थिती.

पीक लागवड नियोजनात सुधारणा ः

आता आपल्याला यात काय सुधारणा करणे शक्‍य आहे, याचा अभ्यास करावयाचा आहे. यासाठी पुढील विषय महत्त्वाचे ठरतात.

१) जमिनीची धूप थांबविणे.

२) फुकटात सेंद्रिय कर्ब व्यवस्थापन.

३) मूलस्थानी जलसंवर्धन.

४) प्रत्येक पिकाच्या झाडाखाली त्याच्या मुळापाशी त्याला आयुष्य पूर्ण होईपर्यंत मोफत पाणी उपलब्धता.

५) पूर्वमशागत खर्च शून्यावर अगर अत्यल्प.

६) आंतरमशागत बंद. तणनाशकाने गरजेपुरते तणनियंत्रण.

७) यंत्राने कापणी, मळणी.

८) उत्पादनात शाश्‍वतता.

९) जमिनीच्या सुपीकतेत दरवर्षी सुधारणा.

कापूस आणि तूर पिकातील संवर्धित शेती तंत्र ः

- मिश्र पीक घेण्यामागे मध्यम मुदतीने काही पैसे मिळावेत हा उद्देश असतो. तो नेमका साध्य होतो का याचा अभ्यास होणे गरजेचे वाटते. मिश्र पीक घेण्यासाठी संपूर्ण जमिनीची पूर्वमशागत, डवरणी अगर कोळपणी, निंदणी अगर भांगलणी अगर तणनाशक फवारणी करणे भाग पडते. यावर होणाऱ्या खर्चाचा विचार केल्यास मिश्र पिकातून आपण नेमके काय मिळवितो, असा प्रश्‍न निर्माण होतो.

- संपूर्ण जमिनीची मशागत करण्यासाठी मागील पिकाची खोलवर गेलेली मुळे यंत्राने उपसून जमिनीबाहेर काढली जातात. मूग अगर उडीद पिकाचे जमिनीखालील अवशेष कमी कर्ब/नत्र गुणोत्तराचे असल्याने लवकर कुजतात व त्याचे खतही जलद संपून जाते. सोयाबीन कापून जमा करून ते मजुराकरवी मळणी यंत्रावर न्यावे लागते. यामुळे मनुष्यबळाचे काम वाढते.

- मिश्र पीक निघाल्यावर मधली जमीन उघडी पडते. तेथे वरील जमिनीचा थर वाळत गेल्याने भेगा पडू लागतात. या भेगांतून खालच्या थरातील ओलावा उडून जाऊ नये म्हणून सातत्याने डवरणी अगर कोळपणी करून भेगा मुजविण्याचे काम शेवटपर्यंत करावे लागते. बऱ्याच वेळा मिश्रपिके काढणीला आली असता पाऊस पडल्याने पिकाचे नुकसान होते अगर प्रत बिघडते.

- मुगासारखे पीक सर्वांत प्रथम हाती लागते. त्यांच्या शेंगा माणसे लावून हाताने वेळेत तोडाव्या लागतात. तसे न झाल्यास पाऊस आल्यास मुगाला मोड येतात. शेंगा झाडावरच फुटतात. या कामाला मोठ्या प्रमाणावर मनुष्यबळ लागते. ते हंगामात वेळेवर उपलब्ध होत नाही. आता बऱ्याच वेळा शेंगा तोडणीचे काम वाट्याने करावे लागते.

- हंगामअखेर शेतकऱ्याच्या परड्यात अगर बांधावर पराटीचे काड अगर तूरकाड्याचे ढीग फेकून दिलेले अगर जळणासाठी साठविलेले आढळतात. आता काही ठिकाणी जाळण्यासाठी हे अवशेष खरेदी केले जातात व त्यातून वीजनिर्मिती केली जाते.

- मोठ्या पावसात पाणी आडवे वाहून जाते. याबरोबर मोठ्या प्रमाणात जमिनीची धूप होते. यामुळे सुपीकतेची काय हानी होते यावर प्राथमिक चर्चाही केली जात नाही. अनेक वेळा लहान-मोठी घळणे रानात पडतात. यामुळे नुकसान होते याची कल्पना अनेकांना असते; परंतु उपाय माहीत नसल्याने हे असे चालायचेच असे गृहीत धरले जाते.

- मी उत्तम बागायतीची सुविधा असलेला शेतकरी आहे. आम्ही बागायतवाले १८ टक्के आणि ८२ टक्के कोरडवाहू शेतकरी. आपल्या तंत्राचा फायदा कोरडवाहू शेतीला करून देता येईल का, यावर सतत चिंतन चालू झाले.

- या भागाला भेट देण्याची संधी अनेक वेळा मिळाल्याने या शेतीचा थोडाफार अभ्यास करता आला. मी एका कोरडवाहू क्षेत्रातील मित्राला विचारले, की त्या भागाच्या नेमक्‍या काय अडचणी आहेत? त्याने उत्तर दिले - चिपळूणकर, हे गप्पा मारून, चर्चा करून काहीच कळणार नाही. प्रत्यक्ष जाऊन स्वतः अभ्यास करावा लागेल. हे एक आव्हान होते आणि ते मी स्वीकारले होते. सरावाने आता पूर्वीपेक्षा लवकर अडचणी लक्षात येत होत्या. याला कारण शेतीतील पायाभूत विज्ञानाचा माझा सखोल अभ्यास झाला होता. कोणत्याही परिस्थितीसाठी उपयोजित तंत्र तयार करीत असता या ज्ञानाचा खूप चांगला उपयोग सातत्याने होत होता.

- तूर आणि कापूस या पिकात मिश्रपीक घेणे बंद करणे गरजेचे आहे. आपल्याला लवकर तयार होऊन पैसे देणारी पिके पाहिजे असतील तर एकूण क्षेत्रापैकी काही भाग वेगळा करून तेथे फक्त मुख्य पीक म्हणून या जवळ अंतरावरील पीक करावे. तूर व कापसाच्या क्षेत्रात फक्त तूर व कापूस लागवड करावी. जवळ अंतरावरील पिकाच्या क्षेत्राची फक्त पूर्वमशागत करून पेरणी यंत्राने ते पेरावे.

- कापूस, तूर पिकाच्या जमिनीची कोणतीही पूर्वमशागत करू नये. फक्त १५० सें.मी.वर टोकण करणे सुलभ जाईल अशी काकर मारून घ्यावी. योग्य वेळी हाताने टोकण करून घ्यावी. मूग, उडीद, सोयाबीन पिकात तण उगवू नयेत यासाठी शिफारशीत तणनाशकाची फवारणी करावी. शक्‍यतो निंदणी अगर डवरणी करू नये. कापूस पिकाच्या दोनही बाजूंना ३० सें.मी. असा ६० सें.मी अंतराच्या पट्ट्यात पेरणीनंतर २५ दिवसांनंतर शिफारशीत तणनाशक फवारावे. तूर पिकासाठी शिफारशीत तण आणि कडधान्यासाठीचे तणनाशक कापसाप्रमाणेच, परंतु पेरणीनंतर उगवणपूर्व फवारावे. मुख्य पिकाच्या दोन ओळींत मिळणाऱ्या ८० ते ९० सें.मी. पट्ट्यात तण मुक्त वाढू द्यावे. हे तण युक्तीने वाढवायचे आहे.

- कापूस अगर तूर पिकाची सुरुवातीची वाढ सावकाश असते. त्या मानाने तणांची वाढ जोमदार असते. तण वाढून पिकावर झाकण मारून पिकाचे ऊन अडवू नये अशा पद्धतीने तण वाढविणे आवश्यक आहे. एखादे तण वाढून पिकाला झाकण होत असेल तर त्वरित कापून तेथेच टाकावे. १.५ ते २ महिन्यांनी उलटा वखर मारून तण झोपवावीत अगर ब्रश कटरने कापून टाकावीत. झोपविलेल्या तणावर तणनाशक मारावे अगर कापून टाकलेल्या तणाला थोड्या दिवसांत कोवळी फूट येईल त्यावर तणनाशक फवारणी करून तणे मारावीत. पाण्याचे जास्त दुर्भिक्ष असेल तर कापलेल्या तणानंतर येणाऱ्या कोवळ्या फुटीवर तणनाशक न मारता हिरवे आच्छादन तसेच राखावे. मधील गवताची १.५ ते २ महिन्यांत भरपूर वाढ होते. त्याचप्रमाणे जमिनीखाली मोठ्या प्रमाणावर मुळांच्या जाळ्यात पाणी साठविले जाते. याच काळात पिकाची जोमदार वाढ सुरू झालेली असते.

- या दोनही पिकांत फुले व शेंगा त्याचप्रमाणे पात्या व कैऱ्या येण्याचा कालावधी उशिरा सुरू होतो. त्यानंतर पाऊस लवकर गेल्यास उघड्या जमिनीत पिकाची वाढ खुंटते, तर तणाच्या पट्ट्यातील पाण्यामुळे या पिकाला शेवटपर्यंत गरजेइतका ओलावा मिळू शकतो.

- काही शेतकऱ्यांनी कळविले आहे, की आज पाऊस गेला तर ५० ते ६० दिवस पुढे पिकाच्या गरजेचा ओलावा मिळतो यामुळे झाडाच्या पूर्ण क्षमतेइतके उत्पादन मिळते. पिकाच्या मधील पट्ट्यामुळे धूप १०० टक्के बंद. पाण्याचा थेंब पडल्याजागीच मुरतो. पाणी आडवा वाहत नाही. मूलस्थानी जलसंवर्धन होते त्यामुळे भूजल पातळी वाढण्यासाठी मदत मिळते.

Read the latest agriculture news in Marathi and watch Agriculture videos on Agrowon. Get the latest updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Agriculture Jugad, and Farmer Success Stories.

ताज्या घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
www.agrowon.com