Agriculture : फळबागेमध्येही संवर्धित शेती शक्य...

भावी काळात गरजेइतके शेणखत कधीच उपलब्ध होणार नाही. उपलब्ध झाल्यास ते दर्जेदार असणार नाही. यासाठी फळबागेलाही स्वतःच्या गरजेचे सेंद्रिय खत स्वतःच तयार करण्यास शिकवणे गरजेचे आहे. तसा फळबागेच्या उत्पादन तंत्रात बदल करावा लागेल.
Fruit Crop
Fruit CropAgrowon

एकेकाळी फळबाग (Orchard Farming) लावणे म्हणजे आर्थिक प्रगतीचा मार्ग होता. जसजशा बागायतीच्या सोयी वाढत गेल्या तसतशा सर्वच फळबागांखालील क्षेत्र मोठ्या प्रमाणात वाढले. बहुतेक वेळा बाजारात मागणीपेक्षा पुरवठा जास्त असल्याने तेजीची शक्‍यता खूप कमी झाली आहे. फळ उत्पादनातही चढउतार दिसतात. कीड, रोगांचे प्रमाण वाढलेले आहे. व्यवस्थापनासाठी भरपूर प्रमाणात कीडनाशकांच्या (Pesticide) फवारण्या वाढल्या आहेत. इतर पिकांच्या तुलनेत फळे गुणवत्तेवर विकली जात असल्याने चांगला दर्जा मिळविण्यासाठी भरपूर सेंद्रिय खत (Organic Fertilizer) म्हणजे शेणखत कंपोस्टचा वापर केला पाहिजे ही कित्येक वर्षांपासून चालत आलेली परंपरा आहे. उपलब्ध एकूण शेणखतापैकी सर्वांत जास्त खत फळबागेत वापरले जाते. ज्या भागात फळबागांचे प्रमाण भरपूर आहे तेथे सभोवताली १०० ते १५० किलोमीटरवरून खत गोळा करून पुरवठा करण्याचा मोठा व्यवसाय सुरू झाला आहे.

शेणखत फक्त जमिनीच्या पृष्ठभागावर फोकून टाकून वापरता येत नाही; ते मातीत मिसळणे गरजेचे असते. यासाठी बहुतेक फळबागेत पावसाळ्यापूर्वी दोन ओळींमधून हलकी नांगरणी करून हे खत मातीत मिसळतात. आंतरमशागत करण्यामागे जसे सेंद्रिय खत मातीत मिसळण्याचा उद्देश असतो, तसे बाग तणमुक्त ठेवण्यासाठीही मशागत करण्याची प्रथा आहे. गेल्या काही वर्षांत सर्व प्रकारच्या खतांचे दर प्रचंड वाढले आहेत. असे महाग खत विकत घेऊन बागेत वापरण्याबाबत शेतकऱ्यांची अशी मानसिकता असते, की त्या खतातील जास्तीत जास्त अन्नघटक पिकाला मिळावेत. तणांनी ते खाल्ल्यास फुकट जातील. पीक तणमुक्त ठेवण्यामागे असा शेतकऱ्यांचा उद्देश असतो.

Fruit Crop
उती संवर्धित रोपांच्या निर्यातीसाठी केंद्राचे प्रोत्साहन

फळबागेत संवर्धित शेतीचे नियोजन ः

१) संवर्धित शेतीच्या अभ्यासानंतर प्रचलित पारंपरिक तंत्रात खूप बदल करणे गरजेचे वाटते. कोणतेही पीक उत्तम येण्यासाठी जमिनीत सेंद्रिय कर्बाची पातळी चांगली असणे गरजेचे आहे. यात आता आणखी थोडी सुधारणा करणे गरजेचे आहे.

२) नुसताच सेंद्रिय कर्ब भरपूर असण्याबरोबर तो उच्च दर्जाचा असणे हे जास्त महत्त्वाचे आहे. यासाठी आमचे निरीक्षण असे आहे, की हा सेंद्रिय कर्ब वनस्पतीच्या जमिनीवरील भागापासून तयार झालेला नको. जमिनीच्या खालच्या भागापासून तयार झालेला असावा. कोणतीही फळबाग सेंद्रिय कर्ब तयार करत नाही, मात्र वापर सर्वांत जास्त करते. पर्यावरणाच्या दृष्टीने हे चुकीचे आहे.

३) भावी काळात गरजेइतके शेणखत कधीच उपलब्ध होणार नाही. उपलब्ध झाल्यास ते दर्जेदार असणार नाही. यासाठी फळबागेलाही स्वतःच्या गरजेचे सेंद्रिय खत स्वतःच तयार करण्यास शिकवणे गरजेचे आहे. तसा फळबागेच्या उत्पादन तंत्रात बदल करावा लागेल. तरच वरीलप्रमाणे चांगले सेंद्रिय खत बागेला मिळेल. आता हे झाले काहीसे पायाभूत विज्ञान. याचे उपयोजित विज्ञानात रूपांतर करून आपल्याला प्रत्येक फळबागेसाठी स्वतंत्र उपयोजित तंत्रज्ञान तयार करावे लागणार आहे.

Fruit Crop
संवर्धित शेतीसाठी तंत्रामध्ये बदल आवश्यक

द्राक्ष शेतीतील नियोजन ः

आपल्या राज्यात द्राक्ष हे प्रमुख फळपीक आहे. द्राक्ष बागायतदार जमिनीची सुपीकता टिकविणे आणि दर्जेदार उत्पादन मिळविण्यासाठी मोठ्या प्रमाणावर शेणखत, कंपोस्टचा वापर करतात. परिसरात पशुपालन फारसे नसल्याने बाहेरून १०० ते १५० कि.मी.च्या परिसरातील शेणखत गोळा करून बागायतदारांना पुरवठा करण्याचा मोठा व्यवसाय तयार झाला आहे. द्राक्ष बागायतदार जो दर देऊन शेणखत, कंपोस्ट खत खरेदी करू शकतो ते इतर पिकाचे शेतकरी खरेदी करू शकत नाहीत. प्रति ४० गुंठ्यांसाठी ३० ते ५० हजार रुपये या सेंद्रिय खतावर खर्च करणारे शेतकरी आहेत. यामुळे परिसरातील हजारो हेक्‍टर जमीन सेंद्रिय खतापासून वंचित राहतात. या ठिकाणी इतर हंगामी पिकाखालील जमिनी खराब करून हे काम चालू आहे. यावर कोठेच फारशी चर्चा होत नाही.

२) दिवसेंदिवस या घटकांच्या वापरावरील खर्च वाढत चालला आहे. शेतकऱ्यांना तो डोईजडही होत आहे; परंतु सेंद्रिय खत म्हणजे शेणखत, कंपोस्टचा वापर अशा विचारांचा पगडा शेतकऱ्यांच्या डोक्‍यावर आजही कायम आहे. या घटकांच्या वापरावरील होणारा खर्च कमी करणारे मार्ग आपल्याला शोधावे लागणार आहेत.

३) भू-सूक्ष्मजीवशास्त्राच्या नियमाप्रमाणे जागेला कुजणे, दीर्घकाळ कुजत राहते, जैववैविध्यातून सेंद्रिय खत, चार बांधाच्या आत गरजेइतके सेंद्रिय खत अगदी फुकटात निर्माण करण्यास शिकले पाहिजे.

द्राक्ष शेतीत खरड छाटणी आणि गोडी छाटणी अशा दोन छाटण्यांतून खूप मोठ्या प्रमाणावर जैवभार उपलब्ध होतो. यात लवकर, मध्यम व दीर्घ मुदतीने कुजणारा असा तीनही प्रकारचा जैवभार मोठ्या प्रमाणात असतो. खरड छाटणीत काष्ठमय जैवभार जागेलाच भरपूर उपलब्ध होत असतो. हे सर्व घटक जागेलाच कुजवायचे आहेत. जसा पडला तसाच कुजविणे, बोधात चर मारून चरात टाकणे आणि रोटाव्हेटरने चुरा करून आच्छादन स्वरूपात कुजविणे असे काही मार्ग आहेत.

Fruit Crop
संवर्धित शेतीतून शाश्‍वत शेती

४) पावसाळा सुरू होण्यापूर्वी काडी तयार होऊन त्याचा शेंडा मारण्याचे काम पूर्ण झालेले असते. त्यानंतर पुढे बागेतील कामे काही प्रमाणात कमी होतात. आता छाटणीचा जैवभार कुजविणे म्हणजे फक्त एकाच प्रकारच्या वनस्पतीचा जैवभार कुजविणे, बागेमध्ये फेरपालट, विविध वनस्पतींपासून तयार झालेले सेंद्रिय खत यासाठी पावसाळ्यात दोन ओळींत तणे वाढवावीत. तणे मोठी करावीत. पुढे एखाद्या अवजाराने आडवी करून तणनाशकाने मारावीत. या काळात बागेत कीडनाशकाच्या फवारण्या आणि खुडा काढण्याचे काम चालू राहते. काम सुलभपणे करता येण्यासाठी बागेमध्ये काही पट्टे ब्रश कटरने तणे कापून काम सुलभ करण्यासाठी मोकळे करावेत.

५) बहुतेक बागायतदार मधील पट्टा स्वच्छ ठेवणे पसंत करतात. पावसाळ्यापूर्वी बागेची आंतरमशागत करतात. ताग, धैंचा, बाजरीसारखे हिरवळीचे खत तयार करून गाडतात. यापाठीमागे सेंद्रिय खत तयार करणे आणि तणनियंत्रण असा दुहेरी उद्देश असतो.

६) तणापासून आपण उत्तम प्रकारचे सेंद्रिय खत बागेला मिळवून देऊ शकतो ही कल्पना फारशी शेतकऱ्यांत रुजलेली नाही. द्विदल कडधान्यवर्गीय हिरवळीच्या खताच्या मर्यादेचा अभ्यास यापूर्वी केला आहे. आपोआप मिळणाऱ्या तणांपासून खत यावर शेतकऱ्यांनी अभ्यास करणे गरजेचे आहे. इथे तणाचे बी खरेदी करावे लागत नाही, पेरावे लागत नाही. तुमच्या शेतामध्ये आपोआप वाढणारी तणे हे तुमच्या शेतीसाठी तयार झालेले निसर्गाने तयार केलेले मिश्रण असते. बागेतील मधल्या पट्यात विविध एकदल, द्विदल तणे वाढत असतात. बहुतेक वेळा अनेक जातीची गवतवर्गीय तणे वाढत असतात. पहिल्या वर्षी काहीशी खुरट्या गवताच्या जाती वाढतील. जसजशी शेतात सेंद्रिय घटकांची टक्केवारी वाढत जाईल तसतसे आपोआप मोठी उंच येणाऱ्या अनेक तणांच्या जाती तेथे वाढू लागतील.

७) आपल्याला तणे मोठी व जून करून जागेलाच तणनाशकाने झोपवून मारायची आहेत. तणे मोठी वाढल्यास त्याची मुळे खोलवर जातात, जमिनीची मशागत होते. तणे कोणत्या वेळी मारावीत याबाबत अनेक विचारप्रवाह आहेत. काही लोकांचे म्हणणे आहे गोडी छाटणी फळधारणा होईपर्यंत काही प्रमाणात जिवंत तणे असणे फायदेशीर आहे. तणांमुळे पावसाळ्यातील अनुकूलतेमुळे बागेत जो अतिरिक्त नत्र उपलब्ध होतो तो तणांनी फस्त केल्यामुळे पर्ण देठातील नत्राचे प्रमाण नियंत्रित राहते. याचा परिणाम खुडा कमी येणे, फवारण्या कमी होणे व टाकलेल्या अन्नद्रव्याचे जैविक स्थिरीकरण झाल्याने रासायनिक खत वापरात काहीशी बचत होऊ शकते.

८) तणे जागेला कुजल्याने कुजण्याच्या क्रियेचे सर्व लाभ जमिनीला व पिकाला मिळतात. या क्रियेतून मिळणाऱ्या संजीवकामध्ये काही प्रमाणात जीए, ६बीए, अमिनो आम्ले द्राक्ष वेलीस मिळू शकतात, त्यावरील खर्च कमी करता येणे शक्‍य आहे.

९) द्राक्ष हे पीक बहुतेक अवर्षण प्रवण पट्ट्यात घेतले जाते. तेथे काही वर्षांनंतर सामू, क्षारता आणि निचऱ्याचे प्रश्‍न निर्माण होतात. अशा जमिनीत दर्जेदार उत्पादन मिळत नाही. जागेला सेंद्रिय पदार्थ कुजविल्याने जमिनीचे शुद्धीकरण होते. अशा जमिनीतील फळांचे उत्पादन दर्जेदार मिळते. शेतकऱ्यांमध्ये जास्तीत जास्त उत्पादन कसे मिळेल याचे वेड आहे. सातत्याने दर्जेदार फळ उत्पादन करून त्याचा ब्रॅण्ड बाजारात विकसित करणे गरजेचे आहे. यातूनही कमी खर्चात चांगले उत्पन्न मिळू शकते.

द्राक्ष हे माझे स्वतःचे पीक नाही. वेळोवेळी इतरांच्या शेतीला भेट देत असता जे शिकायला मिळाले त्यातून लेखन केले आहे. यातून काही चुका होऊ शकतात. द्राक्ष बागायतदारांनी याबाबत काही पट्यात प्रयोग करून आपले अनुभव मांडणे आवश्यक आहे. या चर्चेतून संवर्धित शेतीला चालना मिळेल.

--------------------------

संपर्क ः प्रताप चिपळूणकर, ८२७५४५००८८ (लेखक कोल्हापूर जिल्ह्यातील प्रयोगशील शेतकरी आहेत.)

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com