नर वंध्यत्व उत्परिवर्तन तंत्रातून नव्या वाल जातींचा विकास

वाल हे शेंगावर्गीय भाजीपाला पीक असून, त्यामधून प्रथिने, कर्बोदके, जीवनसत्त्व आणि सूक्ष्म अन्नद्रव्यांची उपलब्धता होते. ही शेंगावर्गीय पिके नत्राच्या स्थिरीकरणामध्ये मोलाची भूमिका निभावत असल्यामुळे जमिनीची सुपीकता वाढवतात.
नर वंध्यत्व उत्परिवर्तन तंत्रातून नव्या वाल जातींचा विकास
BeansAgrowon

नागपूर ः ‘अंकुर सीड्स प्रा. लि. (Ankur Seeds Pvt Ltd) या बीज उद्योगातील भाजीपाला पैदासकार डॉ. मनोज एस. फालक (Dr. Manoj Falak) यांनी भारतीय वाल (Indian Bean) पिकांमध्ये स्थिर जनुकीय नर वंध्यत्व उत्परिवर्तन प्रणाली वापराचा यशस्वी प्रयोग केला आहे. त्यांनी या तंत्राला परपरागीकरणावर आधारित संकराची जोड दिली आहे. ही कंपनी पूर्वीपासूनच संकर पद्धतीचा यशस्वी व्यावसायिक वापर करत आहे. या आधुनिक पद्धतीने प्रथिनांने परिपूर्ण असलेल्या दोन संकरित जाती -अंकुर डॉली आणि अंकुर ४२७ विकसित केल्या आहेत.

वाल हे शेंगावर्गीय भाजीपाला पीक असून, त्यामधून प्रथिने, कर्बोदके, जीवनसत्त्व आणि सूक्ष्म अन्नद्रव्यांची उपलब्धता होते. ही शेंगावर्गीय पिके नत्राच्या स्थिरीकरणामध्ये मोलाची भूमिका निभावत असल्यामुळे जमिनीची सुपीकता वाढवतात. हे वालाचे दोन्ही संकरित वाण प्रकाशासाठी असंवेदनशील, दुष्काळासाठी सहनशील आणि रोगांसाठी चांगले प्रतिकारक आहेत. ते तुलनेने तीव्र परिस्थितीमध्येही चांगल्या प्रकारे वाढू शकतात.

कंपनीचे संशोधन आणि विकास विभागाचे प्रमुख डॉ. आश्‍विन काशीकर यांनी सांगितले, की आशिया आणि आफ्रिकेतील लोकांच्या अन्न आणि पोषकतेच्या सुरक्षिततेच्या दृष्टीने अंकुर कंपनी कार्यरत असून, कृषी क्षेत्रामध्ये सध्या होत असलेल्या सुधारणा आणि भविष्यातील तंत्रज्ञानांतील फरक कमी करण्यासाठी कार्यरत आहे. शेतकरी आणि ग्राहक दोघांच्या दृष्टीने अधिक चांगल्या जाती वेगाने विकसित करण्यासाठी हे नवे तंत्र अधिक उपयुक्त ठरणार आहे.

वनस्पतीमधील नर वंध्यत्वाविषयी...

१८ व्या शतकामध्ये शास्त्रज्ञ जोसेफ गोट्टलियेब कोलरुएटर यांनी पहिल्यांदा वनस्पतींमधील नर वंध्यत्वाची नोंद घेतली. त्यांनी वेगवेगळ्या प्रजाती विशेषतः संकरित प्रजातींतील परागकोशांमध्ये ही समस्या जाणवत असल्याचे नोंदवले. आजवर सुमारे १५० वनस्पती प्रजातींमध्ये सायटोप्लाझ्मिक मेल स्टरिलिटी ओळखण्यात यश आले आहे.

वनस्पतींमध्ये वंध्यत्वाचे तीन प्रकार नैसर्गिकरीत्या दिसून येतात.

१) पेशीच्या केंद्रकाच्या पातळीवरील बदलांमुळे येणारे वंध्यत्व.

२) पेशीतील मायटोकॉन्ड्रीयल पातळीवरील वंध्यत्व.

३) पर्यावरणातील परिणामामुळे निर्माण होणारे वंध्यत्व

जनुकीय नर वंध्यत्व (जीएमएस) तंत्र नेमके काय आहे?

हे संकरातून पैदास प्रक्रिया वेगवान करणारे एक साधन आहे. या तंत्रामध्ये वनस्पतीच्या पुनरुत्पादन यंत्रणेतील नर भागाचा विकास जनुकीय पातळीवर खुंटवला जातो. यात केंद्रकाच्या पातळीवर बदल केले जातात. त्यामुळे या वनस्पतीच्या फुलामध्ये पुंकेसर निर्मितीची प्रक्रिया कमी होते किंवा थांबते. यामुळे अशा फुलांमध्ये अन्य अपेक्षित जातींचे संकर करण्याची प्रक्रिया तुलनेने सोपी होते.

- वंध्यत्व प्राप्त झालेल्या वनस्पतींची ओळख साध्या डोळ्याने पटवता येते. त्यामुळे ५० टक्के पीक वाया जाण्याची शक्यता कमी होते.

-पारंपरिक संकराच्या पद्धतीमध्ये परागीकरण हे हाताच्या साह्याने करावे लागते. या नर वंध्यत्व असलेल्या पिकांमध्ये हे काम वेगाने होऊ शकते.

- या तंत्राने खर्चामध्ये मोठी बचत होते.

पैदास प्रक्रियेमध्ये आणखी एक तंत्र वापरले जाते, ते म्हणजे सायटोप्लास्मिक मेल स्टरिलिटी (सीएमएस). यात पेशीला ऊर्जा पुरवण्यामध्ये महत्त्वाची भूमिका निभावणाऱ्या मायटोकॉन्ड्रीयाच्या पातळीवरच नर वंध्यत्व विकसित केले जाते.

एन्व्हायर्न्मेंट सेन्सिटिव्ह जेनिक मेल स्टरिलिटी (ईजीएमएस) म्हणजे काय?

वनस्पतींमध्ये नर पुनरुत्पादक अवयव हे मादी अवयवांच्या तुलनेमध्ये पर्यावरणामध्ये अधिक उघडे असतात. त्यांच्यावर पर्यावरणातील विविध घटकांचे विपरीत परिणाम होण्याची शक्यता

अधिक राहते. त्यामुळे या प्रकारच्या नर वंध्यत्वाचा उपयोग पैदास प्रक्रियेमध्ये करताना योग्य त्या वातावरणामध्ये रोपांची वाढ केली जाते. त्यामुळे त्या रोपातील नर घटक वंध्य राहतात. त्यात अपेक्षित जातींच्या नर घटकांचे परागीकरण केल्यामुळे कोणत्याही भेसळीशिवाय अपेक्षित जातींचे उत्पादन मिळवता येते. हे तंत्र भात पिकासाठी उपयुक्त असल्याचे मानले जात असले तरी तत्त्वतः अन्य पिकांमध्येही वापरणे शक्य आहे.

नर वंध्यत्व असलेल्या रोपांमध्ये बिया तयार होऊ शकतात, कारण त्यामध्ये मादी घटक हे कार्यान्वित होऊ शकतात. मात्र मादी वंध्यत्व असलेल्या रोपांमध्ये बिया तयार होत नाहीत.

या तिन्ही प्रकारांमध्ये नर वंध्यत्वाचे मूळ वेगवेगळे असले तरी त्यांचा मार्ग आणि लक्षणे एकसारखी असू शकतात. उदा. भात पीक हे अशा संकरासाठी प्रारूप पीक म्हणून महत्त्वाचे ठरू शकते.

नर वंध्यत्व उत्परिवर्तन

पेशी केंद्रकाच्या पातळीवर बदल करून नर वंध्यत्व आणले जाते.

रोपांची निर्मिती केली जाते.

त्यातून नर वंध्यत्व लाइन वेगळी केली जाते.

उर्वरित रोपांमध्ये पुनरुत्पादन क्षमता तशीच ठेवली जाते.

नर वंध्यत्व आणलेली रोपे (ए) आणि पुनरुत्पादनक्षमता असलेली लाइन (बी) यांचे संकर केले जाते.

त्यातून नवी जात विकसित केली जाते.

Read the latest agriculture news in Marathi and watch Agriculture videos on Agrowon. Get the latest updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Agriculture Jugad, and Farmer Success Stories.

ताज्या घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
www.agrowon.com