
गौरव सोमवंशी
ब्लॉकचेन तंत्रज्ञान (Blockchain Technology), क्रिप्टोकरन्सी या शब्दांची आजकाल मोठी चर्चा होत असते. ब्लॉकचेन तंत्रज्ञान झपाट्याने लोकप्रिय होत आहे. ते एक उदयोन्मुख तंत्रज्ञान (Latest Agriculture Technology ) आहे. आर्टिफिशियल इन्टेलिजन्स (Artificial Intelligence) (AI), इंटरनेट ऑफ थिंग्ज (IOT) याच्या जोडीला ब्लॉक चेन तंत्रज्ञाना यांना उदयोन्मुख तंत्रज्ञान म्हणून ओळखलं जातं. (Blockchain Technology Use In Agriculture)
ज्या प्रमाणे आणि ज्या प्रमाणात इंटरनेटमुळे आपल्या जीवनात बदल घडवून आणला, तितक्याच प्रगल्भतेने जर कोणते तंत्रज्ञान भविष्यात बदल घडवून आणायचे सामर्थ्य राखत असेल तर ते म्हणजे ब्लॉकचेन तंत्रज्ञान. हे तंत्रज्ञान समजून घेताना आपल्याला अगोदर त्याचा इतिहास समजून घ्यावा लागेल.
मानवजातीच्या प्रगतीचा इतिहास आपण पाहिला तर विज्ञान किंवा तंत्रज्ञानापेक्षा आपण अकौंटिंगला (हिशेबनिसाचे काम) जास्त श्रेय द्यायला हवं. जितक्या सोप्या वा विश्वासार्ह पद्धतीने आपल्याला आर्थिक व्यवहार घडवून आणता येतात तितक्याच वेगाने आर्थिक विकास शक्य होतो, हे एक साधं-सोपं गणित आहे. चौदाव्या शतकात जेव्हा इटलीमध्ये आंतरराष्ट्रीय व्यापार वाढू लागला तेव्हा आर्थिक व्यवहार तत्परतेने वा योग्य पद्धतीने व्हावा यासाठी नवीन उपक्रम सुरु झाले, ज्यामध्ये पैसे पाठ्वण्यापासून ते उसने घेणे हे सगळं आलं. तेव्हा सुरुवातीला बाकांवर बसून हे सगळं काम करीत, आणि इटलीमध्ये बाकांना 'बँका' असं म्हणतात, म्हणून पुढे जाऊन याच कामाला आणि संस्थेला 'बँक' हे नाव पडलं. शेकोड वर्षे मग बँकांची ताकद आणि त्यांच्या कामाचा आवाका वाढत गेला, आणि त्याचसोबत काही त्रुटी सुद्धा आढळून आल्या. नको त्या लोकांना आणि नको त्या प्रकल्पांमध्ये पैसे उसने देणे, आणि प्रामाणिक वा गरजू लोकांपर्यंत कोणतीही आर्थिक सुविधा न पुरवता येणं हे त्या त्रुटींमध्ये मोडतं.
या गोष्टींना कंटाळून नव्वदच्या दशकात एक स्वतंत्र चलन बनवता येईल का असा विचार पुढे आला. या चलनावर कोणत्याच सरकारचा किंवा बँकेचा हस्तक्षेप नसेल आणि जे कोणालाही मिळवता येईल. या तंत्रक्रांती चळवळीचे नाव 'सायफरपंक' चळवळ असं होतं. इथूनच मग २००८ साली बिटकॉइन या डिजिटल चलनाची संकल्पना मांडण्यात आली. हा संपूर्ण प्रकल्प 'ब्लॉकचेन' तंत्रज्ञानावर आधारित होता. इंटरनेटद्वारे कोणतीही माहितीची किंवा आर्थिक व्यवहारांची देवाणघेवाण होत असतांना जो विश्वास तुम्हाला बँकांकडून किंवा सरकारकडून मिळतो तोच जर तुम्हाला गणिताकडून मिळाला तर? याच प्रश्नाचे उत्तर म्हणजे ब्लॉकचेन.
इंटरनेट हा माहिती इकडून तिकडे पाठविण्यासाठीचा उत्तम मार्ग आहे, पण ती माहिती खरी आहे की खोटी हे सांगायला इंटरनेट अपुरे पडते हे ही तितकच खरं आहे. अशा वेळेस ब्लॉकचेन तंत्रज्ञान मदतीला पुढे सरसावते. आणि कोणत्याही तिसऱ्या व्यक्ती किंवा संस्थेवर विश्वासार्ह माहितीसाठी अवलंबून न राहता कामं होण्याची शक्यता निर्माण होत असेल तर ती खऱ्या अर्थाने तंत्रक्रांती म्हणावी लागेल.
-------------
gaurav@emertech.io
(लेखक ब्लॉकचेन तंत्रज्ञानाचे अभ्यासक असून उदयोन्मुख तंत्रज्ञानाच्या क्षेत्रात कार्यरत आहेत.)
Read the latest agriculture news in Marathi and watch Agriculture videos on Agrowon. Get the latest updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Agriculture Jugad, and Farmer Success Stories.
ताज्या घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.